सौ. पुष्पा चिंतामण जोशी
✈️ मी प्रवासीनी ✈️
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १६ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️नाईलकाठची नवलाई ✈️
मुंबईहून निघालेले विमान बहारीनला बदलून आम्ही कैरोला जाणाऱ्या विमानात चढलो. शालेय वयात ‘इजिप्त ही…… देणगी आहे’ यात ‘नाईल’ हा शब्द भरून मिळविलेला एक मार्क आठवू लागला. जगप्रसिद्ध पिरॅमिड्स, वाळवंटी प्रदेश ही वैशिष्ट्ये डोळ्यापुढे आली.नाईलच्या साक्षीने बहरलेल्या तिथल्या प्राचीन, प्रगत संस्कृतीची स्मृतिचिन्हे बघण्यासाठी आम्ही कैरोच्या विमानतळावर उतरलो.
मानवी इतिहासाला ज्ञात असलेली ही सर्वात प्राचीन संस्कृती सुमारे सहा हजार वर्षांची जुनी. किंग मिनॅसपासून जवळजवळ तीन हजार वर्षे एकाच राजघराण्याची इजिप्तवर सत्ता होती. सूर्यदेव ‘रे’ याला महत्त्वाचे स्थान होते. कालगणनेसाठी शास्त्रशुद्ध कॅलेंडर होते. लिहिण्यासाठी चित्रलिपी होती. पिरॅमिडच्या आकृतीत एखादी वस्तू ठेवल्यास ती जास्त दिवस चांगली राहते, हे आता विज्ञानानेसुद्धा सिद्ध झाले आहे. आश्चर्य वाटते ते चार हजार वर्षांपूर्वी लक्षावधी मजुरांच्या साहाय्याने एकावर एक सारख्या आकाराचे अडीच टन वजनाचे दगड ठेवून जवळजवळ चाळीस मजले उंच असा तंतोतंत पिरॅमिडचा आकृतीबंध त्यांनी कसा बांधला असेल? यावरून लक्षात येतं की गणित, भूमिती, इंजीनियरिंग, आर्किटेक्चर, विज्ञान,कला शास्त्र या साऱ्या विषयात ते पारंगत होते. राज्यात सुबत्ता आणि स्थैर्य होते आणि ही सर्व शतकानुशतके भरभरुन वाहणाऱ्या नाईलची देणगी आहे याबद्दल ते कृतज्ञ होते.
मृत्यूनंतर मानवाचे काय होते? या आदिम प्रश्नाचा वेध प्रत्येक संस्कृतीत घेतला गेला व आपापल्या परीने त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नही झाला. इजिप्तशियन कल्पनेप्रमाणे माणूस मृत्यूनंतर पक्षीरूप धारण करून आकाशात हिंडत राहतो व जेव्हा दयेची देवता( God of love) इसिस(ISIS) त्याला नवीन आयुष्याची किल्ली देईल( key of life) त्या वेळी तो जिवंत होतो. तो जिवंत झाल्यावर त्याला सर्व गोष्टी आठवाव्यात म्हणून त्यांच्या चित्रलिपीमध्ये पिरॅमिडच्या भिंतीवर सारी माहिती लिहीत असत. शिवाय तोपर्यंत त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू खाणे, पाणी, खेळ सर्व भिंतीवर कोरून ठेवलेले असे. तीन हजार वर्षे राज्य करून हे राजघराणे लयाला गेले. नंतर ग्रीक राजा अलेक्झांडर(Alexander the Great) याने इजिप्तवर ताबा मिळवून तिथे ग्रीक संस्कृती आणली. थोडा काळ रोमन संस्कृती होती. त्यानंतर मुस्लिम धर्माचे आक्रमण झाले. आज इजिप्त संपूर्ण अरबस्तानमध्ये महत्त्वाचे स्थान टिकवून आहे. साधारण एक कोटी लोकसंख्येपैकी ९०टक्के लोकवस्ती नाईलच्या काठाने राहते.
पिरॅमिड किंवा टूम्बसृ्( Tombs ) सहाजिकच राजघराण्यातील व्यक्तींसाठी असत. मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या शरीरातील सर्व अवयव काढून वेगवेगळ्या जारमध्ये भरत. नंतर शरीर स्वच्छ करून त्याला सिडार वृक्षाचे तेल चोपडले जाई.मग बॅ॑डेजसारख्या पट्ट्या पट्ट्या शरीरभर गुंडाळून ते शरीर नीट एकाच्या आत एका पेटीमध्ये ठेवले जात असे. कैरो म्युझियममध्ये अशा काही माणसांच्या, पक्षांच्या, प्राण्यांच्या ममीज आम्ही पाहिल्या. पिरॅमिड्समध्ये भरपूर सोनेनाणे सापडते असे लक्षात आल्याने मध्यंतरीच्या निर्नायकी काळात चोर- दरोडेखोरांनी, रानटी टोळ्यांनी भरपूर लुटालूट केली. सुदैवाने १९२२ साली ब्रिटिश आर्किऑलॉजीस्ट कार्टर यांना एकोणिसाव्या वर्षी मृत्यू पावलेल्या ‘तुतानखामेन’ या राजाची कबर(Tomb) जशीच्या तशी मिळाली. वाळूच्या डोंगराखाली संपूर्ण झाकली गेल्यामुळे ती लुटालूटीतून वाचली होती.कैरो म्युझियममध्ये ठेवलेल्या त्या कबरीतील अमूल्य वस्तूंचा खजिना पाहून डोळे दिपतात. ११५ किलो सोन्याचा त्या राजाचा मुखवटा अजूनही झळझळीत आहे. देखणी मुद्रा, तेजस्वी डोळे, सोन्याची खोटी दाढी, दोन- दोन राजमुकुट, सोन्याच्या चपला, सोन्याचे पलंग, सिंहासने,रथ, त्याचा खेळ, त्याचे दागिने, त्याच्या ममीवर असलेले संपूर्ण सोन्याचे, शरीराच्या आकाराचे आवरण, ती ममी ज्या पेट्यांमध्ये ठेवली होती त्या सोन्याच्या तीन प्रचंड पेट्या सारेच अद्भुत आहे. मिडास राजाची गोष्ट समोर साकार झाल्यासारखी भासत होती.
भाग-१ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈