सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मी प्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी क्रमांक- १६ – भाग ३  ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ नाईलकाठची नवलाई ✈️

लक्झर इथे व्हॅली ऑफ किंगमध्ये तुतान खामेनची लुटारूंच्या नजरेतून वाचलेली टूम्ब मिळाली. त्यातील अमूल्य खजिना आता  कैरो म्युझियममध्ये आहे. तिथल्या दुसऱ्या दोन Tomb  मधील तीन हजार वर्षांपूर्वीचे कोरीवकाम व त्यातील रंग अजूनही सतेज आहेत. लाल, पिवळा, निळा, हिरवा, निळीसारखा  असे नैसर्गिक रंग चित्रलिपीसाठी आणि चित्रांसाठी वापरले आहेत. पन्नास फूट उंच छतावर तीस फूट लांबीची आकाशाची देवता कोरून रंगविली आहे. तिने तिच्या दोन्ही भूजांनी आकाश तोलून धरले आहे अशी कल्पना आहे. तिच्या पायघोळ, चुणीदार,निळीसारख्या रंगाच्या घागऱ्यावर चमचमणारी नक्षत्रे, चांदण्या पाहून आपण थक्क होतो. राजासाठी पालखी, २४ तासांचे २४ नोकर कोरलेले आहेत. प्रत्येक खांबाच्या कमानीवर पंख पसरलेला रंगीत गरुड आहे. भिंतीवर रंगीत चित्रलिपी कोरली आहे.

‘क्वीन हरशेपसूत’  हिचे देवालय पाहिले. इजिप्तवर राज्य करणारी ही एकमेव राणी! बावीस वर्षे तिने पुरुषी ड्रेस, एवढेच नव्हे तर राजाची खूण असलेली कृत्रिम सोनेरी दाढी लावून राज्य केले. तीन मजले उंच असलेले तिचे देऊळ डोंगराला टेकून उभे आहे. इथेही पुनर्बांधणी केली आहे. गाय रूपात असलेल्या हॅथर या देवतेची चित्रे सीलिंगवर व इतरत्र कोरली आहेत. या राणीने प्रथमच दूर देशातून तऱ्हेतऱ्हेची रोपे मागवून बगीच्या करण्याचा प्रयत्न केला होता.

साडेतीन हजार वर्षापूर्वी लक्झर येथे एक अति भव्य देवालय बांधण्यात आले. अमन या मुख्य देवतेच्या वर्षारंभाच्या उत्सवासाठी याचे भले मोठे आवार वापरले जात असे. चार राजांच्या कालखंडात हे बांधले गेले. रामसेस (द्वितीय) या राजाचे पन्नास फुटी सहा पुतळे इथे आहेत. आस्वान इथल्या खाणीतून आणलेल्या गुलाबी रंगाच्या ग्रॅनाईटने केलेले हे सारे काम अजूनही चकाकते आहे. राजाचे तोंड आणि सिंहाचे अंग असलेले बावीस बैठे पुतळे दुतर्फा बसविले आहेत. खांबांवर केलेले कोरीवकाम व त्यावरील रंगकाम बऱ्याच ठिकाणी चांगले राहिले आहे. कोरीव  चित्रांमध्ये सूर्यदेवाचे आकाशातील भ्रमण कोरले आहे. देवळाबाहेर अजूनही असलेल्या तलावातील पाणी धार्मिक कृत्यांसाठी वापरले जात असे. करनाक येथील देवालय तर यापेक्षाही भव्य आहे. सारेच भव्य आणि अतिभव्य!

काळाच्या उदरात काय काय गडप झाले  कोण जाणे! पण जे राहिले आहे त्यावरूनही त्या वैभवशाली गतकाळाची कल्पना येऊ शकते.कैरोजवळ असलेले तीन भव्य पिरॅमिड्स म्हणजे मानवनिर्मित भव्य पर्वतच  वाटतात. फक्त मधल्या पिरॅमिडच्या टोकाला पूर्वी असलेला गुळगुळीतपणा दिसतो. बाकी सारे दगड वाऱ्यापावसाने व मानवाच्या लालसेने उघडे पडले आहेत. त्यांच्या पुढ्यात Sphinx म्हणजे राजाचे तोंड असलेले सिंहाचे प्रचंड शिल्प आहे. त्याच्या नाकाचा तुर्की लोकांनी नेमबाजीच्या सरावासाठी उपयोग करून ते विद्रूप करून ठेवले आहे.कैरोमध्येच सलाहदिनची मशीद आहे .या मशिदीचा घुमट पारदर्शक दगडाने बांधलेला आहे. आतील दोन अर्धगोलाकार घुमट, हंड्यांमधील दिव्यांनी उजळले होते.  तिथे जवळच सुलतानाच्या किल्ल्यावर चर्च बांधले आहे. अलेक्झांडर दी ग्रेट याने वसविलेले राजधानीचे शहर अलेक्झांड्रिया इथे गेलो. तेथील उत्खननात ॳॅम्फी थिएटर सापडले. अलेक्झांड्रिया बंदरामधून बोटींना मार्गदर्शन करणाऱ्या दीपगृहाचा दगडी , भव्य खांब समुद्र तळाशी गेला आहे.कॅटाकोम्ब इथे  रोमन व ग्रीक राजांनी इजिप्तशिअन राजांप्रमाणे स्वतःसाठी बांधलेले Tomb  आहेत.

भूमध्य समुद्राच्या (मेडिटरियन सी) हिरव्या, निळ्या, फेसाळणार्‍या, धडकणाऱ्या शुभ्र लाटांनी अलेक्झांड्रियाचा समुद्रकिनारा मनाला उल्हसित करीत होता. स्वच्छ सूर्यप्रकाशात रुंद रस्त्यांवरून प्रवाशांचे रंगीबेरंगी ताफे हिंडत होते. आपल्या मरीनलाइन्सच्या चौपट मोठा किनारा उंच इमारतींनी वेढला होता. मोहम्मद अली या शेवटचा राजाचा महाल आता सप्ततारांकित हॉटेल झाला आहे.

कालौघात हरवून गेलेल्या या इजिप्तशियन संस्कृतीचा काही अंश आपण पाहू शकतो याचे मुख्य श्रेय ब्रिटिश, फ्रेंच व स्वीडीश संशोधकांना आहे. त्यांची चिकाटी, परिश्रम व प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची वृत्ती यामुळेच हा अमूल्य खजिना जगाच्या नजरेला आला. आधुनिक विज्ञानाने व युनेस्कोसारख्या संस्थेने हे धन जपण्यास मदत केली आहे. तिथले आर्किऑलॉजिकल डिपार्टमेंट परदेशी शास्त्रज्ञांच्या, तज्ज्ञांच्या सहाय्याने जे सापडले आहे ते टिकविण्यासाठी केमिकल्सचे लेपन, पुनर्बांधणी करीत आहे. आणखी ठेवा शोधण्यासाठी संशोधनाचे काम चालू आहे.

इजिप्तने टुरिझम ही इंडस्ट्री मानून प्रवाशांसाठी उत्तम वातानुकूलित बसेस,क्रूझचा सुंदर ताफा, प्रशिक्षित गाइड्स, गुळगुळीत रस्ते, हॉटेल्स उभारली आहेत.ठिकठिकाणी स्वच्छतागृहे आहेत. उसाचा रस उत्तम मिळतो. फलाफल नावाचा पदार्थ म्हणजे छोट्या फुगलेल्या भाकरीमध्ये पालेभाजी घालून केलेले डाळ वडे घालून त्यावर सॅलड पसरलेले असते. ते चविष्ट लागते. तसेच शिजविलेल्या कडधान्यावर स्पॅगेटी, चटण्या, टोमॅटो वगैरे घालून केलेला कुशारी नावाचा प्रकार आपण आवडीने खाऊ शकतो. परदेशी प्रवाशांना छोटे विक्रेते किंवा कोणाकडूनही त्रास होऊ नये म्हणून पोलिसांच्या गाड्या सतर्कतेने फिरत असतात. रात्रीच्या वेळी दिव्यांच्या माळांनी नटलेल्या क्रूझमधील प्रवाशांच्या मनोरंजनासाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, बेली डान्स, जादूचे प्रयोग, उत्तम जेवण असते.

इजिप्तसारखा छोटा देश जे करू शकतो ते आपल्याला अशक्य आहे का? सुजलाम् सुफलाम् असलेल्या आपल्या देशाची सांस्कृतिक श्रीमंती कित्येक पटीने मोठी आहे.जगभरच्या प्रवाशांना भारत बघायचा आहे. इथले चविष्ट पदार्थ खायचे आहेत. कलाकुसरीच्या वस्तूंची खरेदी करायची आहे. पण त्यासाठी उत्तम रस्ते, वाहतुकीची साधने, स्वच्छता, सोयी-सुविधा, संरक्षण यात आपण कमी पडतो. पर्यटन म्हणजे लाखो लोकांना रोजगार देणारा, देश स्वच्छ करणारा एक उत्तम उद्योग म्हणून पद्धतशीर प्रयत्न करणे आवश्यक आहे. हल्ली आपल्या मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ , गुजरात गोवा वगैरे ठिकाणी  प्रवाशांसाठी चांगल्या सोयी केल्या आहेत. महाराष्ट्रात मात्र याबाबत खूप प्रयत्न करणे जरुरी आहे.

नाईल नदी इतकी स्वच्छ कशी? याचे उत्तर क्रूजवरील प्रवासातच मिळाले. या सर्व दीडशे-दोनशे क्रूज वरील कचरा वाहून नेणाऱ्या तीन-चार कचरा बोटी सतत फिरत असतात. सर्व क्रूज वरील कचरा त्या बोटींवर जमा होतो. एवढेच नाही तर बोटींवरील ड्रेनेजही सक्शन पंपाने कचरा बोटींवर खेचले जाते व नंतर योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली जाते. माझ्या डोळ्यांपुढे भगीरथाने भगीरथ प्रयत्नाने आणलेली पवित्र गंगा नदी आली. आम्ही ड्रेनेज, केमिकल्स, आणि प्रेते टाकून गंगेची व इतर सर्व नद्यांची करीत असलेली विटंबना आठवून मन विषण्ण, गप्प गप्प होऊन गेले.

भाग ३ व नाईल काठची नवलाई समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments