सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक १७ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ मोरोक्को – रसरशीत फळांचा देश ✈️
टॅ॑जेरहून तीनशे किलोमीटरचा प्रवास करून फेज या शहरात पोचायचे होते. टॅ॑जेर ते फेज हा प्रदेश घनदाट जंगलांनी समृद्ध आहे. रिफ पर्वतरांगांच्या उतारावरील या सुपीक प्रदेशात लक्षावधी ऑलिव्ह वृक्षांची घनदाट लागवड केली आहे. फार पूर्वी इथे मारिजुआना या एक प्रकारच्या अमली द्रव्याची झाडे होती. आता सरकारने कायद्याने या मारिजुआना लागवडीस बंदी केली आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन इथे गहू, मका, बार्ली यांचे उत्पन्न घेतले जाते व ऑलिव्ह वृक्षाची लागवड केली जाते. रस्त्याच्या कडेला निलगिरी वृक्षांची लागवड आहे. वाटेत दिसलेल्या बऱ्याच तलावांवर जलविद्युत प्रकल्प उभारलेले दिसत होते.
फेज हे शहर पाचशे वर्षांपूर्वीचे आहे. मौले इद्रिस हा पहिला धर्मसंस्थापक इथे आला. इथल्या गावांना सभोवती तटबंदी आहे. इथले मेदिना म्हणजे जुने मार्केट अफाट आहे. गाईड मागोमाग त्या दगडी, अरुंद,चढ- उतार असणाऱ्या रस्त्यांवरून जाण्याची कसरत केली. फुले, फळे, भाज्या, कापड विणणे, रंगविणे, प्रिंट करणे, चामडी कमावणे, त्याच्या वस्तू बनविणे, शोभेच्या वस्तू, पर्सेस, सुकामेवा, तयार कपडे अशा अनेक वस्तूंची दुकाने भुलभुलैय्या सारख्या त्या दगडी बोळांमध्ये आहेत. मालवाहतुकीसाठी गाढवांचा वापर करण्यात येत होता.
या मार्केटमध्ये एक मोठी मशीद आहे. तसेच तिथल्या धर्म संस्थापकाच्या दोन कबरी आहेत. इथली फार प्राचीन इ.स. ८५९ पासून अजूनही चालू असलेली लहान मुलांची शाळा शिशुविहार बघायला मिळाली. त्या बालवर्गातील छोटी छोटी गोरीगोमटी मुले आमच्याकडे कुतूहलाने बघत होती. गुलाबी गोऱ्या नाकेल्या शिक्षिकेने हात हलवून हाय हॅलो केले. गालिचे बघण्यासाठी गाईडने तिथल्या एका जुन्या हवेलीमध्ये नेले. मध्ये चौक व चार मजले उंच अशा त्या जुन्या वास्तूचे खांब संगमरवरी होते. निळ्या हिरव्या डिझाईनच्या मोझाइक टाइल्स भिंतीवर होत्या.छत खूप उंच होते. गालीचे बघताना पुदिना घातलेला व बिन दुधाचा गरम चहा मिळाला.
फेजहून ५०० किलोमीटरचा प्रवास करून मर्राकेश या शहरात जायचे होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सफरचंदांच्या, संत्र्यांच्या खूप मोठ्या बागा होत्या.झीझ व्हॅलीमध्ये खजूर व पामचे वृक्ष सगळीकडे दिसत होते. वाटेत मेकनेस हे गाव लागले. गाईडने सांगितले की मोरोक्कोमध्ये मॉरिटोनामार्गे आलेल्या रोमन लोकांनी सर्वप्रथम वस्ती केली. मोरोक्कोपासून जवळ असलेल्या वालीबुलीस येथे आजही सूर्य मंदिर, सार्वजनिक वाचनालय यांचे रोमन काळातील भग्न अवशेष बघायला मिळतात. नंतर इफ्रान या शांत, स्वच्छ गावात चहा पिण्यासाठी थांबलो. गळ्याने हे शिक्षणाचे केंद्र आहे. अमेरिकन- मोरोक्को युनिव्हर्सिटी आहे. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे. या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये शिकविण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया येथील नामवंत प्रोफेसर येतात. आफ्रिका खंडातील विद्यार्थ्यांना इथे प्रवेश मिळतो.
वळणा- वळणांच्या सुंदर रस्त्याने घाट माथ्यावर आलो. वाटेत अकेशिया (एक प्रकारचा बाभूळ वृक्ष), ओक आणि कॉर्क वृक्षांचे घनदाट जंगल दोन्ही बाजूला आहे.कॉर्क या वृक्षाच्या लाकडापासून बनविलेली बुचं पूर्वी आपल्याकडे सोडावॉटरच्या बाटल्यांना लावलेली असत. अजूनही कॉर्कची बुचं शाम्पेनच्या बाटल्यांसाठी वापरली जातात. तसेच चप्पल बुटांचे सोल, फॉल्स सिलिंग यासाठी याचा उपयोग होतो. मोरोक्कोहून कॉर्कची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. घाटमाथ्यावरील केनित्रा हे एक सुंदर, टुमदार, हिरवे हिलस्टेशन आहे .आर्टिस्ट लोकांचे हे माहेरघर आहे. अनेक कलाकार मुक्तपणे चर्च, शाळा, हॉस्पिटल, वेगवेगळ्या बिल्डिंग्ज् यांच्या कंपाऊंड वॉलवर सुंदर कलापूर्ण चित्रे रंगवीत होते. पर्वत उतारावर छोटी- छोटी घरे दिसत होती. इथल्या पर्वतरांगांमध्ये जंगली कुत्रे व बार्बरी एप्स (शेपूट नसलेली माकडं) असल्याचे गाईडने सांगितलं.व्हॅलीतल्या रस्त्यावरून जाताना एके ठिकाणी ताजी फळे विकण्यासाठी दिसली. तिथला शेतकरीच या फळांची विक्री करीत होता. आमच्या विनंतीवरून गाडी थांबवून गाईडने आमच्यासाठी ताजी, लालबुंद, टपोरी चेरी,पीचेस,ताजे , रसरशीत, मोठे, ओले अंजीर खरेदी केले. या फळांची चव जन्मभर लक्षात राहील अशीच होती. तेवढ्यात शेतकऱ्याची लाल- गोरी, देखणी, तरुण बायको गाढवावर बसून, गाढवावर लादून आणखी फळे घेऊन आली. त्यात प्रचंड मोठी कलिंगडे होती. गाईड मजेत विचारीत होता की घ्यायचे का एक कलिंगड? पण एवढे मोठे कलिंगड कापणार कसे आणि खाणार कसे आणि प्रत्येक हॉटेलमधील सकाळच्या नाश्त्याच्या वेळी असलेल्या लालबुंद, रसाळ कलिंगड कापांना आम्ही भरपूर न्याय देतच होतो. व्हॅलीतील घरांसमोरील अंगणात खजूर वाळत ठेवलेला दिसला. तसेच स्ट्रॉबेरी, चेरी,पीच,लिची यांचे मुरांबे मोठ्या काचेच्या बरण्यांतून उन्हात वाळवत ठेवलेले दिसले. (आपण छुंदा उन्हात ठेवतो. आपल्यासारख्याच साटप गृहिणी जगभर पसरलेल्या आहेत). नंतरच्या बेनिमलाल या ठिकाणी खूप मोठे शेतकी संशोधन केंद्र व शेतकी शाळा असल्याचे गाईडने सांगितले. आम्ही तिथे जून महिन्यात गेलो होतो. तेव्हा तिथे चेरी फेस्टिवल चालू होता. असाच उत्सव खजूर, स्टॉबेरी यांचा केला जातो.
भाग-२ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈