सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक १७ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
मोरोक्को – रसरशीत फळांचा देश
मर्राकेश शहर म्हणजे फ्रेंच व मूर संस्कृतीचा संगम आहे. मूर म्हणजे बर्बर भाषेत मर- अकुश म्हणजे देवाची भूमी. यावरून मर्राकेश नाव रुढ झाले. मोरोक्कोमध्ये रोमन लोकांनंतर दुसऱ्या शतकापासून बर्बर राजवट होती. पाचव्या शतकात आखाती देशातून अरब इथे आले. त्यांनी इस्लामचा प्रसार केला. कालांतराने अरब व बर्बर यांच्यातील भांडणांचा फायदा घेऊन स्पॅनिश व फ्रेंच लोकांनी इथे प्रवेश केला. स्पॅनिश लोकांशी काही करार करून, फ्रेंचांनी इथे१९१२ पासून १९५६ पर्यंत राज्य केले. त्यानंतर इथे एलबीत घराण्याचे राज्य सुरू झाले. थोडे अधिकार असलेली संसद असली तरी राजा हा देशाचा प्रमुख आहे. आज एलबीत घराण्याच्या पाचव्या पिढीचे राज्य चालू आहे.
मोरोक्कोमध्ये आजही एक लाखाहून अधिक फ्रेंच लोक राहतात. इथे बर्बर, अरब, स्पॅनिश, फ्रेंच अशी मिश्र वस्ती आहे. अरेबिक व बर्बर भाषा तसेच थोडी स्पॅनिशही बोलले जाते. फ्रेंच ही व्यापार व व्यवहाराची भाषा आहे. अनेक शहरात फ्रेंच शाळा आहेत. त्यामुळे मोरोक्कोच्या आचार- विचारांवर फ्रेंच, युरोपियन यांचा प्रभाव आहे. लोक गोरे- गोमटे, उंच,नाकेले आहेत. स्त्रियांना काळा बुरखा घालावा लागत नाही. केस झाकून, चेहरा उघडा ठेवून त्या सर्वत्र वावरत असतात. कॉलेजात जाणार्या, नोकरी करणाऱ्या काही तरुणी जीन्स मध्येही दिसल्या.फ्रेंच राज्यकर्त्यांमुळे अनेक प्रमुख शहरात लांब-रुंद सरळ व मध्ये शोभिवंत चौक असलेले रस्ते, विशाल उद्याने, कारंजी, विद्यापीठे, शाळा, रुग्णालये यांची उभारणी झाली आहे.
मर्राकेश येथील बाराव्या शतकात अलमोहाद राजवटीत बांधलेली कुतुबिया मशीद भव्य व देखणी आहे. याच्या उंच मिनार्यावरून आजही नमाज पढविण्यासाठी अजान दिली जाते. रेड सॅ॑डस्टोन व विटा वापरून ही दोनशे साठ फूट म्हणजे ८० मीटर उंच मशीद बांधलेली आहे. याच्या सहा मजली उंच चार मिनारांवर निमुळते होत गेलेले तांब्याचे मोठे बॉल्स ( गोळे )आहेत इतिहासकाळात यांना अस्सल सोन्याचा मुलामा दिलेला होता.
इथला बाहिया पॅलेस हा सुलतानाच्या वजिराने स्वतःसाठी बांधला आहे. त्याला अनेक बायका व मुले होती. इस्लामी आणि मोरोक्को वास्तुशैलीचा हा उत्तम नमुना आहे. सभोवती फळाफुलांनी भरलेल्या, पक्षांनी गजबजलेल्या बागा आहेत. उंच लाकडी दरवाजे, झुंबरे, लाल, निळ्या,पिवळ्या मोझाइक टाइल्समधील भिंतींवरील नक्षी बघण्यासारखी आहे. रॉयल पॅलेस हा अल्मोहाद राजवटीत बाराव्या शतकात बांधला गेला. मोठ्या बागेमध्ये असलेल्या त्याच्या प्रवेशद्वाराचे डिझाईन भूमितीसारखे व टेराकोटा टाईल्समध्ये आहे. हा राजवाडा बाहेरून बघावा लागतो कारण आता तो एका फ्रेंच उद्योगपतीच्या मालकीचा आहे. तिथून पुढे सुंदर आखीव-रेखीव मिनारा गार्डन आहे.
खूप मोठ्या चौकातील मर्राकेश मार्केट गजबजलेले होते. संत्र्याचा ताजा मधूर रस पिऊन मार्केटमधील दुकाने बघितली. फळे, ड्रायफ्रूट, इस्लामी कलाकुसरीच्या वस्तू,खडे जडविलेल्या चपला, कार्पेट, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असे असंख्य प्रकार होते.आपल्याकडल्यासारखे गारुडी व माकडवाले होते. गोरे प्रवासी साप गळ्यात घालून आणि माकडांना खायला देताना फोटो काढून घेत होते. आश्चर्य म्हणजे आपल्याकडे वासुदेव असतो तसेच उंच टोपी घातलेले, गळ्यात कवड्यांच्या माळा घातलेले, आपल्या इथल्यासारखाच लांब, पायघोळ, चुणीदार झगा घातलेले ‘वासुदेव’ तिथे होते. असे वासुदेव नंतर अनेक ठिकाणी दिसले. त्यांच्या हातात पितळेची मोठी घंटा होती. कधीकधी ते त्यांच्याजवळील पखालीतून पाणी देऊन प्रवाशांची तहानही भागवत होते. लोक हौसेने त्यांच्याबरोबर फोटो काढून घेऊन त्यांना पैसे देत होते. दुनिया अजब आणि गोल आहे याचा प्रत्यय आला.
आमच्यातील काही मैत्रिणींनी इथे ताजीन विकत घेतले. ताजीन म्हणजे पक्या भाजलेल्या मातीचे, रंगीत नक्षीचे भांडे! या भांड्याचे झाकण संकासुराच्या टोपीसारखे उंच असते. या भांड्यात केलेल्या पदार्थांची वाफ अजिबात बाहेर जात नाही व शाकाहारी, मांसाहारी पदार्थ चविष्ट होतात असे सांगितले. हॉटेलमध्ये दुपारच्या जेवणात त्या ताजीनमध्ये शिजविलेला ‘खुसखुस’ नावाचा पदार्थ त्या ताजीनसह टेबलावर आला. ‘खुसखुस’ म्हणजे लापशी रवा थोडा भाजून शिजविलेला होता. त्यात गाजर, काबुली चणे, बटाटा, फरसबी, कांदा, कोबी अशा भाज्या त्यांच्या पद्धतीच्या सॉसमध्ये शिजविलेल्या घातलेल्या होत्या. नॉनव्हेज खुसखुसमध्ये चिकनचे तुकडे होते.तिथे गव्हाच्या रव्याचे अनेक पदार्थ मिळतात.अनेक बायका, रस्त्यावर भाजून शिजविलेला रवा आणि मिल्कमेडचे डबे घेऊन बसल्या होत्या व प्रवाशांना खीर बनवून देत होत्या. हॉटेलमधील जेवणातही गरम- गरम, चौकोनी आकाराची, दोन पदरी रोटी व गव्हाची खीर होती. या शिवाय तिथे तापस (TAPAS) नावाचा माशांचा प्रकार लोकप्रिय होता.
भाग-३ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈