सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २१ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
कॅनडा ऽ ऽ राजा सौंदर्याचा
नायगाराहून ६०० किलोमीटरचे अंतर पार करून कॅनडाची राजधानी ओटावा इथे पोचायचे होते. सरळसोट, गुळगुळीत आठ पदरी रस्त्यावरून गाडी पळत होती. कुठेही सिग्नल्स नाहीत की टोल नाके नाहीत. दोन्ही बाजूंना बसविलेले टीव्ही कॅमेरे वाहतुकीचे सुयोग्य नियंत्रण करतात. रस्त्याच्या दुतर्फा गहू, मका, द्राक्षं, स्ट्रॉबेरी, चेरी यांची प्रचंड मोठी शेती होती. शेतात धान्य साठवण्याच्या उंच, उभ्या कणग्या होत्या. अनेक ठिकाणी वायनरीज होत्या.शेतिच्या पलीकडे आकाश रेषेपर्यंत भिडलेली सूचिपर्णी वृक्षांची घनदाट जंगले दिसत होती.
या साऱ्या प्रवासाला खळाळती साथ होती ती रिडो कॅनॉलची! अनेक अडचणींवर मात करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १८३२ मध्ये पूर्ण करण्यात आला.किंग्जस्टन इथल्या लेक ओंटारिओपासून सुरू झालेला २०२ किलोमीटरचा (१२५ मैल ) हा नितांत सुंदर जलमार्ग राजधानी ओटावापर्यंत जातो. या प्रकल्पात दोन नद्या आणि मोठमोठी सरोवरे यांची जोडणी समपातळीत करण्यासाठी ४७ लॉकसची योजना केली आहे. आजही हा ऐतिहासिक जलमार्ग गजबजलेला असतो. युनेस्कोने या जलमार्गाला वर्ल्ड हेरिटेज डेस्टिनेशनचा दर्जा बहाल केला आहे.कनोइ,कयाक, मोटारबोटी यातून ही जलवाहतूक सुरू असते.कॅनाल शेजारून सायकलींसाठी स्वतंत्र मार्ग आहे. जॉगिंग व स्केटिंगही चालू होते. अनेक सुंदर बागांमधून लोक समर पिकनिकचा आनंद घेत होते.
दुसऱ्या दिवशी ओटावाहून चार तासांचा प्रवास करून किंग्स्टनला पोहोचलो.’थाउजंड आयलंड’चा हा परिसर नितांत सुंदर आहे. स्वच्छ, सुंदर, टुमदार, निवांत अशी लाल, तपकिरी, दगडी रंगांच्या उतरत्या कौलांची ऐश्वर्यशाली घरे निसर्गाच्या कॅनव्हासवरील सजीव चित्रांसारखी भासत होती.
‘ग्रेट लेक्स’ मधून उगम पावलेली सेंट लॉरेन्स नदी समुद्रासारखी विशाल आहे. ग्रेटेस्ट कॅनेडियन रिव्हर म्हणून ती ओळखली जाते. नदीतील ८० किलोमीटरच्या परिघात१८६४ बेटे आहेत. ही बेटे म्हणजे प्राचीन कालातील पर्वतांचे माथे आहेत. अगदी छोट्या आकाराच्या बेटापासून १०० चौरस किलोमीटर्स (४० चौरस मैल ) ची व्याप्ती असलेली ही खडकांवरील हिरवीगार बेटे आहेत.क्रुझमधून आम्ही या बेटांच्या दर्शनासाठी निघालो.
या अथांग पाण्यात अमेरिका आणि कॅनडा यांची तिथली सरहद्द दाखवणारे दोन्ही राष्ट्रांचे ध्वज एका बेटावर फडकत होते. निळसर हिरव्या आरस्पानी पाण्यात लहान मोठ्या बेटांची प्रतिबिंबे पडली होती. यातील काही बेटांवर मनुष्यवस्ती नाही आणि काही बेटे अमेरिकेच्या मालकीची आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला न्यूयॉर्क येथील धनाढ्य हॉटेल मालक जॉर्ज बोल्ट यांनी इथले हार्ट आयलँड विकत घेतले. त्यावर सहा मजली घर उभारले. किल्ल्यासारख्या या बिल्डिंगमध्ये १२० दालने व त्यांना जोडणारी अंतर्गत टनेल्स आहेत. पॉवर हाउस, इटालियन गार्डन, ब्रिज सारे त्यांनी आपली प्रिय पत्नी लुईसा हिच्यासाठी उभारले. पण लुईसाच्या अकस्मात मृत्यूनंतर हे घर दुर्लक्षित झाले. १९७७ साली अमेरिका व कॅनडा सरकारने या सार्या बेटांचे पुनरुज्जीवन केले. क्रूझमधून आम्हाला या हिरव्यागार, फळा- फुलांनी बहरलेल्या बागेतील प्रवासी फिरताना दिसंत होते.
‘डार्क आयलंड’वर सिंगर कॅसल आहे. सेंट लॉरेन्सचा खूप उंच, उभा पुतळा एका खडकावर उभारलेला आहे. अमेरिकेचे बेट आणि कॅनडाचे बेट जोडणारा एक इंटरनॅशनल ब्रिजही तिथे आहे. दगडी बेटांच्या हिरव्या कुशीत लपलेली, लाल, पिवळ्या, हिरव्या, राखाडी कौलांची तांबूस पांढरी घरं बघताना आपण परीराज्यातून फेरफटका मारीत आहोत असेच वाटते. घरांच्या अंगणात सुंदर हिरवळ, फुलबागा, फळबागा होत्या.समर सुरू झालेला असल्याने काही घरांच्या अंगणात मुले खेळत होती. काही अगदी जवळची दोन बेटं जोडण्यासाठी सुबक, कमानदार ब्रिज उभारले आहेत. एका बेटावर चर्च आहे. वीस बेटांच्या एका समूहावर थाउजंड आयलँड नॅशनल पार्क उभारले आहे. मासेमारी आणि पाण्यातले खेळ यात काही जण रमले होते. मध्येच वेगाने दौडणाऱ्या पांढऱ्या स्वच्छ स्पीड बोटस् पळत होत्या. स्वच्छ पांढरे अंग , राखाडी पंख ,काळी शेपटी आणि पिवळसर चोच असलेले सीगल्स पंख पसरून भक्षाचा वेध घेत होते. ही सगळी बेटे म्हणजे विधात्याने स्वतःसाठी फुलविलेली एक आगळीवेगळी बाग आहे. फार फार वर्षांपूर्वी या बेटांवर मूळ कॅनेडियन लोकांची (Aborigines ) वस्ती होती. आज कोट्यावधी डॉलर्स किमतीची ही घरे धनाढ्यांची मिरासदारी आहे. क्रूजमधून या अद्भुत दुनियेचा फेरफटका करून आम्ही परतलो. किनाऱ्यावरील माना उंचावलेल्या सिडार, व्हाईट पाइन वृक्षांनी आम्हाला ‘जमिनीवर’ आणले.
आम्ही जूनच्या मध्यावर तिथे पोहोचलो होतो. पुण्यासारखी थंडी होती पण त्यांचा समर चालू झाला होता. चार महिन्यांच्या कडक थंडीनंतर आता सूर्यदेव पहाटे पाचपासून रात्री दहापर्यंत प्रकाश देत होते. विविध रंगांची फुलं मोठमोठ्या कुंड्यांमधून ओसंडत होती.उत्साही पावलातून वसंतोत्सव सळसळत होता.खेळांना उधाण आलं होतं .डॉग फेस्टिवलपासून चिल्ड्रेन फेस्टिवलपर्यंत तसंच नृत्य-नाट्य-संगीत, बेंजो, फिडल सारे महोत्सव होते. सारे ओटावा शहरच जणू एक फिरता रंगमंच झालं होतं.
रिडो हॉल म्हणजे गॉथिक शैलीतील दगडी कौलारू घर आहे. १८६७ पासून कॅनडाच्या गव्हर्नर जनरलचे ते घर आता पंतप्रधानांचे निवासस्थान आहे. या घराभोवती सुंदर गार्डन व आर्ट कलेक्शन सेंटर आहे.
म्युझियम ऑफ हिस्ट्रीचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. २००० वर्षांपूर्वी कॅनडातील मूळ जमाती कनोई म्हणजे लाकडाच्या लांबट होडीतून इथे आल्या.म्युझियमच्या हॉलमधील सिलिंग हे कनोईच्या तळासारखे बनविले आहे.हॅलचे खांब वल्हयांसारखे आहेत आणि पार्श्वभूमीवर घनदाट हिरव्या, उंच मजबूत वृक्षांचे भले मोठे चित्र आहे.टोटेम पोल्स म्हणजे आदिवासींनी लाकडी खांबांवर कोरलेले मुखवटे , चिन्हे यांचा खूप मोठा संग्रह तिथे आहे. हे खांब म्हणजे आदिवासींची श्रद्धास्थाने होती तसेच गुप्त संदेश देण्याचे साधनही होते. म्युझियममध्ये मुलांसाठी विशेष विभाग आहे. गाणी, कोडी, खेळ यातून मुलांचे इतिहासाविषयी कुतूहल जागृत होईल असे कार्यक्रम केले जातात. तिथल्या स्टॅम्प संग्रहात १८५१ मध्ये वापरलेल्या पहिल्या पोस्टल स्टॅ॑पपासून आजपर्यंतच्या स्टॅ॑प्सचे कलेक्शन आहे.
ओटावामध्ये रिडो, ओंटारिओ व ओटावा या तीन नद्यांचा संगम होतो. संगमावर डुबकी मारून तिथले पाणी गढूळ करण्यासाठी ,पुण्य मिळविण्यासाठी कुणीही येत नाही. इथून मोठमोठी मालवाहू जहाजे अटलांटिक महासागरापर्यंत जाऊ शकतात. संगमाजवळील हिरव्या वनराईत लपलेले सर्व देशांचे दूतावास गाडीतून बघितले. त्यातल्या एका घरावर भारताचा तिरंगा फडकत होता.
कॅनडा भाग २ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈