सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २१ – भाग ६ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ कॅनडा ऽ ऽ राजा सौंदर्याचा ✈️
व्हॅ॑कूव्हरच्या पश्चिमेकडील पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरील स्टॅन्ले पार्क एक हजार एकरवर पसरला आहे.( मुंबईच्या शिवाजी पार्कचा विस्तार सहा एकर आहे ) इथे कृत्रिम आखीव-रेखीव बाग-बगीचे नाहीत .नैसर्गिकरित्या पूर्वापार जशी झाडं वाढली आहेत तसाच त्यांचा सांभाळ केलेला आहे. अपवाद म्हणून तिथे केलेली गुलाबाची एक बाग फारच देखणी आहे. नाना रंग गंधांच्या॑॑ हजारो गुलाबांनी या बागेला एक वेगळे सौंदर्य, चैतन्य लाभले आहे.
दुसऱ्या दिवशी व्हॅ॑कूव्हर पोर्टला जायला निघालो. वाटेत दोन्ही बाजूंना गव्हाची प्रचंड मोठी शेती आहे. शिवाय बदामाची झाडं, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, चेरी यांचेही मोठ मोठे बगीचे आहेत. गाईड म्हणाला की ही सर्व शेती तुमच्या भारतातून आलेल्या शिख कुटुंबियांच्या मालकीची आहे. शंभराहून अधिक वर्षांपूर्वी ही पंजाबमधील शीख कुटुंबे ब्रिटिशांबरोबर शेतमजूर म्हणून इथे येऊन स्थिरावली आहेत. धाडस, मेहनत व स्वकर्तृत्वाने त्यांनी हे वैभव मिळविले आहे. आज अनेक शीख बांधव कॅनडामध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. तसेच अनेक जण सिनेटरही आहेत.
या धनाढ्य शिखांपैकी बहुतेकांचा स्वतंत्र खलिस्तानला सक्रिय पाठिंबा होता. खलिस्तान चळवळीच्या वेळी कॅनेडियन विमानाचा झालेला (?) भीषण विमान अपघात, पंजाबमधील अतिरेक्यांच्या निर्घृण कारवाया, त्यांच्याशी प्राणपणाने लढणारे आपले पोलीस अधिकारी, सुवर्ण मंदिरातील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’, जनरल वैद्य यांची तसेच इंदिरा गांधी यांची हत्या आणि त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. अजूनही हा खलिस्तानचा ज्वालामुखी धुमसत असतो आणि भारत सरकारला तेथील घडामोडींवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते.
आता कॅनडामध्ये दिल्लीपासून तामिळनाडूपर्यंत अनेक प्रांतातले लोक विविध उद्योगधंद्यात विशेषतः हॉटेल बिझिनेसमध्ये कार्यरत आहेत. टोरांटो, व्हॅ॑कूव्हर अशा मोठ्या विमानतळांवर फ्लाईट शेड्युल ‘गुरुमुखी’मधून सुद्धा लिहिलेले आहे. तसेच हिंदी जाहिरातीही लावलेल्या असतात.
व्हिसलर माउंटन, व्हॅ॑कूव्हर, बुशार्ट गार्डन्स
व्हॅ॑कूव्हर पोर्टहून व्हॅ॑कूव्हरच्या दक्षिणेला असलेल्या व्हिक्टोरिया आयलंडवर जायचे होते. त्या अवाढव्य क्रूझमध्ये आम्ही आमच्या बससह प्रवेश केला. एकूण ६०० मोटारी व २२०० माणसे आरामात प्रवास करू शकतील अशी त्या महाप्रचंड क्रूझची क्षमता होती. बसमधून बोटीत उतरून लिफ्टने बोटीच्या सहाव्या मजल्यावर गेलो.अथांग सागरातून बोट डौलाने मार्गक्रमण करू लागली. दूर क्षितिजावर निळसर हिरव्या पर्वतरांगा दिसत ंहोत्या. देशोदेशींचे प्रवासी फोटो काढण्यात गुंतले होते. बोटीवरील प्रवासाचा दीड तास मजेत संपला. बोटीतील लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर येऊन आमच्या बसमधून व्हिक्टोरिया आयलंडवर उतरलो.
पॅसिफिक महासागराच्या या भागाला strait of Juan de fuca असे म्हणतात. सागरी सौंदर्य आणि इतिहास यांचा वारसा या बेटाला लाभला आहे. पार्लमेंट हाऊस, सिटी हॉल ,म्युझियम या इमारतींवर ब्रिटिश स्थापत्यशैलीची छाप आहे. राणी व्हिक्टोरियाचा भव्य पुतळा पार्लमेंटसमोर आहे. गहू, मका, अंजीर, स्ट्रॉबेरी अशी शेतीही आहे.
बेटावरील बुशार्ट गार्डनला पोहोचलो. ५० एकर जमिनीवर फुलविलेली बुशार्ट गार्डन्स जेनी आणि रॉबर्ट बुशार्ट यांच्या अथक मेहनतीतून उभी राहिली आहे. देशोदेशींचे दुर्मिळ वृक्ष, फुलझाडे, क्रोटन्स आहेत. मांडवांवरून, कमानींवरून सोडलेले वेल नाना रंगांच्या, आकाराच्या फुलांनी भरलेले होते. मोठ्या फ्लॉवरपॉटसारखी फुलांची रचना अनेक ठिकाणी होती. गुलाबांच्या वेली, तऱ्हेतऱ्हेची कारंजी, कलात्मक पुतळे यांनी बाग सजली आहे. देशी-विदेशी पक्ष्यांसाठी घरटी तयार केली आहेत. इटालियन गार्डन, जपानी गार्डन, देशोदेशींच्या गुलाबांची सुगंधी बाग असे पहावे तेवढे थोडेच होते. अर्जुन वृक्ष, अमलताशची (बहावा ) हळदी रंगाची झुंबरं, हिमालयात उगवणार्या ब्लू पॉपिजची झुडपे भारताचे प्रतिनिधीत्व करत होती. २००४ मध्ये या बागेचा शतक महोत्सव साजरा झाला. दरवर्षी लक्षावधी प्रवासी बुशार्ट गार्डनला भेट देतात. आजही या उद्यानाची मालकी बुशार्ट वंशजांकडे आहे.
व्हॅ॑कूव्हरपासून दीड तासावर असलेल्या व्हिसलर पर्वताच्या पायथ्याशी गेलो. तिथून एका गंडोलाने ( केबल कार ) व्हिसलर पर्वत माथ्यावर गेलो. व्हिसलर पर्वतमाथ्यावरून ब्लॅक कॉम्बो या पर्वतमाथ्यावर जाण्यासाठी दुसर्या गंडोलामध्ये बसलो. गिनिज बुकमध्ये नोंद असलेली, १४२७ फूट उंचीवरील आणि ४.५ किलोमीटर अंतर कापणारी ही जगातील सर्वात जास्त लांबीची व सर्वात उंचीवरून जाणारी गंडोला आहे. या गंडोलामधून जाताना खोलवर खाली बर्फाची नदी, हिरव्या पाण्याची सरोवरे, सुरूचे उंच वृक्ष, पर्वत माथे, ग्लेशिअर्स असा अद्भुत नजारा दृष्टीस पडला. ब्लॅककोम्ब पर्वतमाथ्यावर बर्फात खेळण्याचा आनंद लुटला. परत येताना काळ्या रंगाचे व सोनेरी रंगाचे अस्वल दिसले. पर्वतमाथ्यापर्यंत गंडोलातून सायकली नेऊन पर्वतउतारावरून विशिष्ट रस्त्याने सायकलिंग करत येण्याच्या शर्यतीत तरुण मुले-मुली उत्साहाने दौडत होती. येताना उंचावरुन कोसळणारा शेनॉन फॉल बघितला.
जगामध्ये कॅनडा आकाराने दुसऱ्या नंबरवर ( पहिला नंबर रशियाचा ) आहे.९९८४६७० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ कॅनडाला लाभले आहे. एकूण क्षेत्रफळापैकी ५४ % भाग हा घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे.साधारण अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या कॅनडाचा चार पंचमांश भाग अजूनही निर्मनुष्य आहे. कॅनडाच्या उत्तरेकडील अतिथंड बर्फाळ विभागात एस्किमो लोकांची अगदी थोडी वस्ती आहे. पण हा बर्फाळ भाग खनिज संपत्तीने समृद्ध आहे. शिवाय तेथील भूगर्भात खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे आहेत. पूर्वेकडे अटलांटिक महासागर, पश्चिमेकडे पॅसिफिक महासागर, उत्तरेकडे आर्किक्ट महासागर व दक्षिणेकडे अमेरिकेची सरहद्द आहे. दोन देशांना विभागणारी जगातील सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमारेषा ही कॅनडा आणि अमेरिकेच्या दरम्यान असून तिची लांबी ८८९१ किलोमीटर आहे. जगातील सर्वात मोठी किनारपट्टी कॅनडाला लाभली आहे. सामन, ट्राऊट, बास, पाईक असे मासे प्रचंड प्रमाणात मिळतात. त्यांची निर्यात केली जाते. लेक ओंटारिओ,लेक एरी, लेक ह्युरॉन अशी ३६०० गोड्या पाण्याची सरोवरे समुद्रासारखी विशाल आहेत. प्रचंड प्रमाणात जलविद्युत निर्मिती होते व अमेरिकेला पुरविली जाते.
ॲसबेस्टास, झिंक, कोळसा, आयर्न ओर, निकेल, कॉपर,सोने, चांदी अशी सर्व प्रकारची खनिजे व धातू मिळतात. अर्धीअधिक जंगले फर, पाईन, स्प्रुस अशा सूचीपर्णी वृक्षांनी भरलेली आहेत. जगभरातील न्यूज प्रिंट पेपर व इतर पेपर्स बनविण्यासाठी मोठ-मोठ्या वृक्षांचे ओंडके तसेच पेपर पल्प यांचा कॅनडा सर्वात मोठा निर्यातदार आहे.
मेपल वृक्षाचे, हाताच्या पंजासारखे लाल पान हे कॅनडाचे राष्ट्रीय चिन्ह आहे. या मेपल वृक्षाच्या चिकापासून बनविलेले मेपल सिरप लोकप्रिय आहे. काळी अस्वले, कॅरिबू,मूस,एल्क,जंगली कोल्हे,गोट्स जंगलात सुखेनैव भटकत असतात. क्यूबेक, नोव्हा स्कॉटिया, न्यू फाउंड लॅ॑ड असे पठारी विभाग सर्वोत्तम शेती विभाग आहेत. उत्पादनापैकी ८० टक्के गहू निर्यात केला जातो. प्रचंड मोठी कुरणे व धष्टपुष्ट गाईगुरे यांच्या प्रेअरिज आहेत.
कॅनडामध्ये जगातल्या वेगवेगळ्या २०० देशातील ४५ वंशाचे लोक राहतात. स्थलांतरित चायनीज लोकांचा पहिला नंबर आहे तर भारतीय वंशाचे लोक तिसऱ्या नंबरवर आहेत. भारतीय डॉक्टर्सना सन्मानाने वागविले जाते. गेली बावन्न वर्षे ओटावाजवळ राहात असलेले, मूळचे बडोद्याचे असलेले डॉक्टर प्रकाश खरे – न्यूरॉलॉजिस्ट व डॉक्टर उल्का खरे- स्त्रीरोगतज्ञ यांची या प्रवासात हृद्य भेट झाली. इथल्या बहुरंगी संस्कृतीमुळे सर्वांच्या चालण्या-बोलण्यात एक प्रकारची खिलाडू वृत्ती आहे.
समृद्ध, संपन्न, विशाल कॅनडा बाहेरून जसा देखणा आहे तसंच त्याचं अंतरंगही देखणे आहे याची प्रचिती आली. कॅनडाचे तरुण पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी सीरीयामधून येणाऱ्या निर्वासितांसाठी कॅनडाचे दार उघडले. येणाऱ्या निर्वासितांना समाजात सामावून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना पुढे येण्याचं आवाहन केले. या आवाहनाला कॅनेडियन नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कॅनडात आता अनेक कुटुंबे एकत्र येऊन सिरीयन कुटुंबाचे पालक बनतात. वर्गणी काढून निर्वासितांच्या घरांचं भांडं, कपडेलत्ते याचा खर्च करतात. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतात. त्यांना इंग्लिश शिकायला, स्थानिक संस्कृती समजावयाला मदत करतात. आपल्या मुलांना निर्वासित कुटुंबातील मुलांबरोबर मैत्री करण्यासाठी प्रोत्साहन देतात . आळीपाळीने आपल्या घरी बोलावितात. अशी मदत करणाऱ्या इच्छुकांची संख्या एवढी मोठी आहे की सर्वच्या सर्व सीरीयन निर्वासितांना कोणत्या ना कोणत्या कुटुंबाचा आधार मिळाला आहे.
आज सर्व जगभर द्वेषावर आधारित समाजनिर्मिती करण्याचा प्रयत्न स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केला जात आहे. अशा वेळी निरपराधी लोकांना जिवाच्या भीतीने आपला देश, घरदार, माणसे सोडून परागंदा व्हावे लागते. युक्रेनचे ताजे उदाहरण आपल्यापुढे आहेच. आपली सारी मूळं तोडून टाकून लहान मुले, स्त्रिया यांच्यासह दुसऱ्या देशात आसरा घेणे हे अपार जीवघेणे दुःख आहे . कॅनेडियन नागरिकांनी मानवतेला लागलेला काळीमा पुसण्याचा केलेला हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
भाग-६ व कॅनडा समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈