सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २५ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
वास्को-डि-गामाचे हिरवे पोर्तुगाल
पोर्टोहून कोइंब्रा इथे आलो. मोंडेगा नदीच्या काठी असलेल्या या शहरामध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ कोइंब्रा’ ची स्थापना १५३७ साली झाली. विद्यार्थ्यांचे शहर अशीच या शहराची ओळख आहे. इटली, स्पेन, पॅरिस व इंग्लंडनंतर स्थापन झालेली ही युरोपमधील पाचवी युनिव्हर्सिटी आहे. उच्च शिक्षण आणि संशोधन यासाठी ही युनिव्हर्सिटी नावाजली जाते. युरोप व अन्य देशातील विद्यार्थ्यांना इथे वेगवेगळ्या शाखांमधून प्रवेश मिळविण्यासाठी अतिशय कठीण अशी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, इंजीनियरिंग, इतिहास, भाषाशास्त्र, कायदा, मानववंशशास्त्र अशा अनेक शाखांमध्ये इथे अध्ययन केले जाते. सर्व शिक्षणाची अधिकृत भाषा पोर्तुगीज आहे. विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीचा काळा, लांब गाऊन घालावा लागतो. युरोपमधील विद्वान प्रोफेसर्सची इथे नेमणूक केली जाते.
विद्यापीठाच्या खूप मोठ्या प्रांगणातील बेल टॉवरमधील घंटा चार टनाची आहे. दोन लाखांहून अधिक पुस्तके असलेली इथली लायब्ररी बघण्यासारखी आहे. प्राचीन हस्तलिखिते, सोळाव्या शतकातील तत्वज्ञान, मेडिसिन यावरील अमूल्य ग्रंथसंपदा इथे आहे. षटकोनी आकारातील, खूप उंची असलेल्या या लायब्ररीचे कमानीसारखे प्रवेशद्वार लाकडी आहे पण ते मार्बलसारखे वाटते. पोर्तुगालमधील ओक वृक्षांचे व ब्राझीलमधील जॅकरन्डा वृक्षांचे लाकूड वापरून भिंतीपासून उंच छतापर्यंत कोरीव काम केलेले आहे. साऱ्या कोरीव कामाला खऱ्या सोन्याचा मुलामा दिलेला आहे. पुस्तके ठेवण्यासाठी उंच उघडी कपाटे लायब्ररीच्या सर्व भिंतींवर व त्यावरील माडीवर केलेली आहेत. उंचावरील पुस्तके काढण्यासाठी केलेल्या शिड्या, दोन कपाटांच्या मधल्या खाचेत बरोबर बसतील अशा केलेल्या आहेत. छताजवळील उंच कोपऱ्यात चारी दिशांना चार सुंदर देवतांचे उभे पुतळे चार खंडांचे प्रतीक म्हणून आहेत. ( तेंव्हा अमेरिकेचा शोध लागलेला नव्हता.) लायब्ररीच्या बाहेरच्या सर्व बाजूंनी खूप रुंद अशी भिंत पुस्तकांचे उन्हा- पावसापासून संरक्षण करण्यासाठी बांधली आहे. खूप उंचावर असलेली काचेची तावदाने उघडता-मिटता येतात. त्यातून आत प्रकाश झिरपतो. या पुस्तकांमधील कोणतेही पुस्तक वाचण्यासाठी बाहेर नेता येत नाही. विद्यार्थ्यांना लेखी परवानगी घेऊन, हवे असलेले पुस्तक विद्यापीठाच्या अभ्यासिकेत बसून वाचावे लागते.
गाईडने सांगितले की इथले संपूर्ण लाकूड न किडणाऱ्या वृक्षांचे आहे. तरीसुद्धा रात्री पावसात इथे किडेमकोडे येतातच. त्यासाठी इथे वटवाघळे पाळली आहेत. त्यांना रात्री पिंजऱ्याबाहेर सोडले जाते. ते किडेमकोडे खातात व पुस्तके सुरक्षित राहतात. रोज रात्री लायब्ररीतील सर्व टेबलांवर विशिष्ट प्रकारचे कापड पसरले जाते. त्यावर पडलेली वटवाघळांची शी सकाळी साफ केली जाते. त्या काळातील उनाड, मस्तीखोर विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून जिथे ठेवत ती तळघरातील जागा गाईडने दाखविली.
युनिव्हर्सिटीतील मोनेस्ट्रीची लांबलचक भिंत लाकडी असून ती सुंदर पेंटिंग्जनी सजलेली आहे.मोनेस्ट्रीचे छत सपाट आहे पण विशिष्ट तऱ्हेने केलेल्या रंगकामामुळे ते अर्धगोलाकार वाटते. युनिव्हर्सिटीतून बाहेर पडल्यावर या मोनेस्ट्रीचे मुख्य प्रवेशद्वार दिसते. ते खूप उंचावर व किल्ल्याच्या तटबंदीसारखे आहे.मोरोक्कोमधील मूरिश लोकांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली होती.
यूनिव्हर्सिटीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून,काचेच्या बंद दरवाजातून, खालच्या भव्य हॉलमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या व्हायवा घेतल्या जातात ते दिसत होते. तिथल्या दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडल्यावर समोरच मोंडेंगो नदी व शहराचे दर्शन होते. पायर्या चढून गेल्यावर मिनर्व्हा या ज्ञानदेवतेचा भव्य पुतळा आहे.
पूर्वीच्या काळी या युनिव्हर्सिटीत फक्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असे. ज्ञानार्जनाच्या काळात या शहरातील तरुणींबरोबर त्यांची मैत्री होई. पण शिक्षण पूर्ण करून जाताना त्यांची मैत्रिणींबरोबर ताटातूट होई. अशा विद्यार्थ्यांनी रचलेली अनेक विरहगीते युनिव्हर्सिटीपासून थोड्या लांब अंतरावरील एका दरीकाठच्या लांबट- उभ्या दगडांवर कोरून ठेवलेली गाईडने दाखविली. या गीतांना ‘फाडो’ असे म्हटले जाते. ‘फाडो’चा अर्थ दैव (destiny ) असा आहे. आम्ही रात्री तिथल्या एका ‘फाडो शो’ला गेलो होतो. काळ्या कपड्यातील दोन गायक स्पॅनिश गिटार व व्हायोलाच्या साथीने खड्या आवाजात गाणी म्हणत होते पण पोर्तुगीज भाषा अजिबात न समजल्याने त्या विरहगीतांचा आस्वाद घेता आला नाही.
(कोइंब्रा लायब्ररी, पोर्टो नदी व त्यावरील पूल)
कोइंब्रा युनिव्हर्सिटीजवळ अठराव्या शतकातील एक खूप मोठी बोटॅनिकल गार्डन आहे. पोर्तुगीजांच्या जगभर जिथे जिथे वसाहती होत्या तिथून विविध प्रकारची झाडे आणून त्यांचे इथे संवर्धन केलेले आहे. त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो.
तिथून जवळ असलेल्या ‘कॉन्व्हेंट ऑफ संता क्लारा’ मधील चर्चमध्ये क्वीन इसाबेल या संत स्त्रीची कोरीव चांदीची टुम्ब ( थडगं ) आहे. इथे नंन्सना धार्मिक शिक्षण दिले जाते व त्यांच्यासाठी वसतिगृह आहे. कोइंब्रामध्ये भारतीय पद्धतीच्या उपहारगृहात रात्रीचे जेवण घेत असताना तिथे आलेले दोन भारतीय विद्यार्थी भेटले.ध्रूव पांडे हा कानपूरहून आलेला विद्यार्थी भाषाशास्त्रात डॉक्टरेट करण्यासाठी आला होता तर विजय शर्मा हा जोधपूरचा विद्यार्थी इथे कायद्यामधील डॉक्टरेट करण्यासाठी आला होता.
भाग २ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈