सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २६ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
पूर्व पश्चिमेचा सेतू– इस्तंबूल
हैदरपाशा इथून रात्रीच्या रेल्वेने आम्ही सकाळी डेन्झीले स्टेशनवर उतरलो. इथून पामुक्कले इथे जायचे होते. फॉल सीझन सुरू झाला होता. रस्त्याकडेची झाडं सूर्यप्रकाशात सोनेरी किरमिजी रंगात झळाळून उठली होती तर काही झाडं चांदीच्या छोट्या, नाजूक घंटांचे घोस अंगभर लेवून उभी होती. दसऱ्याचं सीमोल्लंघन काल युरोप खंडातून आशिया खंडात झालं होतं. आज हे चांदी सोनं डोळ्यांनी लुटत चाललो होतो.
तुर्की भाषेमध्ये पामुक्कले म्हणजे कापसाचा किल्ला! हजारो वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तिथल्या डोंगरातून अजूनही गरम पाण्याचे झरे वाहतात. त्यातील कॅल्शियमचे थरांवर थर साठले. त्यामुळे हे डोंगर छोट्या- छोट्या अर्धगोल उतरत्या घड्यांचे, पांढरे शुभ्र कापसाच्या ढिगासारखे वाटतात. तिथल्या गरम पाण्याच्या झऱ्यात पाय बुडवून बसायला मजा वाटली.
जवळच एरोपोलीस नावाचे रोमन लोकांनी वसविलेले शहर आहे. भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या या शहरातील डोंगरउतारावरचे, दगडी, भक्कम पायऱ्यांचे, एका वेळी बारा हजार माणसं बसू शकतील असे अर्धगोलाकार ॲंफी थिएटर मात्र सुस्थितीत आहे.
इफेसुस या भूमध्य समुद्राकाठच्या प्राचीन शहरात, संगमरवरी फरशांच्या राजरस्त्याच्या कडेला जुनी घरे, चर्च, कारंजी, पुतळे आहेत. निकी देवीचा सुरेख पुतळा सुस्थितीत आहे. दुमजली लायब्ररीच्या प्रवेशद्वाराचे संगमरवरी खांब भक्कम आहेत. खांबांमध्ये संगमरवरी पुतळे कोरले आहेत. त्याकाळी १२००० पुस्तके असलेल्या त्या भव्य लायब्ररीची आणि त्या काळच्या प्रगत, सुसंस्कृत समाजाची आपण कल्पना करू शकतो.
कॅपॅडोकिया इथे जाताना वाटेत कोन्या इथे थांबलो. कोन्या ही सूफी संतांची भूमी! ‘रूमी’ या कलंदर कवीच्या कवितांचा, गूढ तत्त्वज्ञानाचा फार मोठा प्रभाव फारसी, उर्दू व तुर्की साहित्यावर झाला आहे. या रुमी कवीचा मृत्यू साधारण साडेसातशे वर्षांपूर्वी कोन्या इथे झाला. त्याची कबर व म्युझियम पाहिले.या मेवलवी परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे उपासक घोळदार पांढराशुभ्र वेश करून स्वतःभोवती गिरक्या घेत, नृत्य करीत सूफी संतांच्या कवनांचे गायन करतात. रात्री हा व्हर्लिंग दरवेशचा नृत्य प्रकार पाहिला. शब्द कळत नव्हते तरी त्या गायन वादनातील लय व आर्तता कळत होती.
आज बलून राईडसाठी जायचे होते.एजिअस आणि हसन या दोन मोठ्या डोंगरांमध्ये पसरलेल्या खडकाळ पठाराला ‘गोरेमी व्हॅली’ असे म्हणतात. तिथल्या मोकळ्या जागेत जमिनीवर आडव्या लोळा- गोळा होऊन पडलेल्या बलूनमध्ये जनरेटर्सच्या सहाय्याने पंखे लावून हवा भरण्याचं काम चाललं होतं. हळूहळू बलूनमध्ये जीव आला. ते पूर्ण फुलल्यावर गॅसच्या गरम ज्वालांनी त्यातली हवा हलकी करण्यात आली. त्याला जोडलेली वेताची लांबट चौकोनी, मजबूत टोपली चार फूट उंचीची होती. कसरत करून चढत आम्ही वीस प्रवासी त्या टोपलीत जाऊन उभे राहीलो. टोपलीच्या मधल्या छोट्या चौकोनात गॅसचे चार सिलेंडर ठेवले होते. त्यामध्ये उभे राहून एक ऑपरेटर त्या गॅसच्या ज्वाला बलूनमध्ये सोडत होता. वॉकीटॉकीवरून त्याचा नियंत्रण केंद्राशी संपर्क चालू होता. बलूनमधली हवा हलकी झाली आणि आमच्यासकट त्या वेताच्या टोपलीने जमीन सोडली. अधून मधून गॅसच्या ज्वाला सोडून ऑपरेटर बलूनमधली हवा गरम व हलकी ठेवत होता. वाऱ्याच्या सहाय्याने बलून आकाशात तरंगत फिरू लागलं. आमच्या आजूबाजूला अशीच दहा-बारा बलून्स तरंगत होती. सूर्य नुकताच वर आला होता. खाली पाहिलं तर पांढरे- गोरे डोंगर वेगवेगळे आकार धारण करून उभे होते. हजारो वर्षांपूर्वी ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राखेच्या थरांच्या या डोंगरांनी वर्षानुवर्ष ऊन पाऊस सहन केले. ते डोंगर वरून बघताना शुभ्र लाटांचे थबकलेले थर असावे असं विलोभनीय दृश्य दिसत होतं. काही ठिकाणी डोंगरांच्या सपाटीवर फळझाडांची शेती दिसत होती. बगळ्यांची रांग, डोंगरात घरटी करून राहणाऱ्या कबुतरांचे भिरभिरणारे थवे खाली वाकून पहावे लागत होते. बलून जवळ-जवळ५०० फूट उंचीवर तरंगत होते. हवेतला थंडावा वाढत होता. मध्येच बलून खाली येई तेंव्हा खालचं दृश्य जवळून बघायला मिळंत होतं. अगदी तासभर हा सदेह तरंगण्याचा अनुभव घेतला. आता वाऱ्याची दिशा बघून आमचं आकाशयान उतरवलं जात होतं. जवळ एक ओपन कॅरिअर असलेली मोटार गाडी येऊन थांबली. तिथल्या मदतनीसांच्या सहाय्याने ती लांबट चौकोनी टोपली गाडीच्या मोकळ्या कॅरिअरवर टेकविण्यात आली. हवा काढलेले बलून लोळा गोळा झाल्यावर कडेला आडवे पाडण्यात आले. पुन्हा कसरत करून उतरण्याचा कार्यक्रम झाला आणि सर्वांनी धाव घेतली ती भोवतालच्या द्राक्षांच्या झुडूपांकडे! काळीभोर रसाळ थंडं द्राक्षं स्वतःच्या हातांनी तोडून अगदी ‘आपला हात जगन्नाथ’ पद्धतीने खाण्यातली मजा औरच होती. काही द्राक्षांच्या उन्हाने सुकून चविष्ट मनुका तयार झाल्या होत्या. त्या तर अप्रतिम होत्या.
इस्तंबूल भाग ३ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈