? वाचताना वेचलेले ?

☆ याने जन्मभर बोलतच रहावे ! – भाग – 2 – श्री गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

(पण कोंझर सोडून पाचाडच्या चढाला लागलो, अन् जी वळवाच्या पावसाने झोडायला सुरूवात केली ! ) इथून पुढे ——-

गडाच्या चढाला प्रारंभ केला, त्या वेळी तर अक्षरश: काळोख दाटला, आणि त्यांत सुया टोचाव्यात, तसे अंगावर कोसळणारे पावसाचे थेंब. कसेबसे रात्री नऊ -दहाच्या सुमारास गडावर पोहोचलो, अन् शेडग्याने धर्मशाळेत गोळा करून ठेवलेले सर्पण जाळीत रात्रभर अंगे शेकीत बसून राहिलो. सहज चर्चा निघाली किल्ले बघण्याची. बाबाने बोलता बोलता म्हटले, की सिंहगड, पुरंदर, राजगड अन् तोरणा हे किल्ले मी असंख्य वेळा पाहिले आहेत ! एकूण दुर्ग किती पाहिले, ते आठवत नाही!

पुरंदर हे तर बाबाचे घरच. पुरंदरे हे नावच त्या किल्ल्यावरून पडलेले. एवढ्याने भागले नाही. या घराण्याला पर्वतीजवळची दोन चाहूर जमीन मलिकंबरने इनाम दिलेली. वतनाचे ते कागद अजून सुरक्षित आहेत. त्यानंतर मराठेशाहीत या घराण्याने तोलामोलाची स्वराज्यसेवा केलेली. पूर्वजांच्या कमरेला तलवार सदैव बांधलेली. 

पण अशा तर किती पूर्वजांच्या किती कुलदीपकांनी आपापल्या तलवारी मोडीत फुंकून टाकल्या आहेत. आपापल्या वतनांच्या कागदांनी पाणी तापवायचे बंब पेटविले आहेत. पूर्वजांच्या प्रतिष्ठेचे एरवी मोल ते किती ? 

पण ते या बहाद्दराने सांभाळले. त्याला शिकल करून, सहाणेवर धरून ते पाजळले. त्याची लखलखीत तलवार हाती पेलली ! 

बखरींचा अभ्यास तर अनेकांनी केला आहे. पण अशी शब्दकळा कुणाजवळ ? बाबाचे शिवचरित्र वाचू लागावे, तर भरजरी पाटाव नेसलेली, कानी-नाकी अलंकार ल्यालेली, वज्रचुडा पहेनलेली, कुण्या कुळवंताची कुळवंतीच हाती नीरांजन घेऊन उभी आहे, असा भास होऊ लागतो. बाबाने अवघ्या बखरी वाचल्या आहेत. अवघे शिवचरित्रसाहित्य साक्षेपाने, पदरमोड करून धांडोळले आहे. आणि मग एक नवी लखलखीत, तेजाने पुंजाळलेली सप्रमाण बखरच लिहिली आहे! धन्य आमची पिढी, की तिच्यात बाबासारखा बखरकार जन्मास आला !

पण हे एवढे शिवमहाभारत लिहूनही लटके प्रौढत्व कसे ते अंगी अजिबात नाही. अंगीचे शैशव या साऱ्या उद्यमामुळे हारपले नाही. एवढा प्रचंड खटाटोप, हा नजर फाडून टाकणारा प्रवास, हे डोंगरदऱ्या भटकणे, हे सगळे करूनही मूळचा अवखळपणा लवलेश उणावला नाहीं. 

छत्रपतींच्या जीवनाचा सारा तपशील जसा मितिवार, प्रहर-घटिकानिशी मुखोद्गत, तसेच, इतर पाठांतर काही कमी नाही. गडी जरा खुलू द्या. रानांत भटकत असतां सभ्यतेचे बंध थोडे सैल होऊं द्या. मग पाहा चुटक्या – चुटक्यांचा धबधबा कसा वाहूं लागतो, ते. कुणाकुणाच्या नकला, कुणाकुणाचे स्वर, कुणाकुणाचे खाकरणे, ठसकणे, अगदी सही सही ! इतिहासाच्या पंचपक्वान्नाच्या जोडीला लावणी- फटक्यांची चटणी-लोणचेही हजर ! 

पु.लं. नी ‘तुझे आहे तुजपाशी’ मध्ये कुण्या एका मुलीविषयी लिहिले आहे, की तिने जन्मभर चालतच रहावे ! 

बाबासाहेब पुरंदरे हा मनुष्य संगतीला लाभला. की वाटते, याने जन्मभर बोलतच रहावे ! असे साभिनय बोलणें, की त्याला तुलनाच नाही ! 

नागपूरचा एक प्रसंग सांगतो. विदर्भ साहित्य संघ आणि मोरभवन अशा दोन टोलेजंग इमारती एकीसमोर एक उभ्या आहेत. मध्ये सडकच काय ती. एका अतिशय विख्यात, वक्तृत्वाबद्दल सुप्रसिद्ध, एका काळी मराठी वाचकांवर अनभिषिक्त सम्राटपद गाजविलेल्या, पिकलेल्या प्राध्यापकांची शृंगाराने सिक्त झालेली व्याख्याने मोरभवनात सुरू होती. त्याच वेळी या तरूणाची शिवचरित्रावरील व्याख्याने समोरील विदर्भ साहित्य संघात चालू झाली. शिवचरित्र हे शिवधनुष्यच आहे. भलत्याने त्याला स्पर्श करू नये. 

पण कौतुक सांगतो, की ज्या वयात शृंगार अतिशय रोचक वाटतो, अशा तरूणांचे जथेच्या जथे मोरभवनातली शृंगाररसाने आर्द्र व्याख्याने टाकून विदर्भ साहित्य संघात गर्दी करू लागले. 

अशी ही जुगुलबंदी आठ दिवस चालली होती. शेवटी विदर्भ साहित्य संघाचे सभागृह तुडुंब भरून लोक बाहेर उभे राहून बाबांचा वाक्प्रवाह पिऊन जाऊ लागले. 

शेवटी मोरभवनांतील एका पेन्शनर श्रोत्याने कुतूहल म्हणून विचारले, 

“काय, हो ? इथे काय राज कपूर पाहायला लोक जमले आहेत काय ?” 

उत्तर मिळाले, 

“नव्हे ! इथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शिवराज्याभिषेकाचा प्रसंग सांगत आहेत !”

                                                                                                               समाप्त

लेखक  – गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर 

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments