सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 1 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

(सावरकरांची अजोड तत्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता.) 

दारावर मोठ्ठ्या, सोनेरी अक्षरात पाटी डकवलेली होती – 

— “गणपत महादेव नलावडे, मेयर“!

गणपतरावांनी एकवार पाटीकडे नजर टाकली आणि आत, कार्यालयात प्रवेश करते झाले. गेले चार दिवस रोज ही पाटी पाहात होते ते. पुण्याचे मेयर होऊन बरोब्बर चारच दिवस तर झाले होते त्यांना ! बरं कार्यालयात टेबल-खुर्च्या आणि इतर साधनं आहेत, म्हणून त्याला कार्यालय म्हणायचं फक्त. नाहीतर गेल्या चार दिवसांपासून अक्षरशः पुष्पभांडार झालंय त्याचं. हाऽऽ पुष्पगुच्छांचा ढीग ! हार-तुरे, शुभेच्छापत्रे, भेटवस्तू तर वेगळ्याच ! 

गणपतरावांनी खिन्नपणे एकवार सगळ्याकडे नजर टाकली. गणपतरावांना सारंच निरर्थक वाटत होतं.

जागेवर बसल्या-बसल्या न राहावून त्यांनी शिपायाला हाक मारली. तोही धावतच आला.

“जी…?”

“ही एवढीच पत्रं आलीयेत का रे…?”

“व्हय जी!”

“नीट आठवून सांग… एखादं पत्र म्हणा, पाकीट म्हणा वा गुच्छासोबत येते तशी चिठ्ठी म्हणा; नजरेतून सुटली तर नाही ना तुझ्या?”

“न्हाई जी. म्या सोत्ताच तर डाकवाल्याकडनं सारी घेऊन लावून ठेवली हितं!”

यावर गणपतरावांचा चेहरा पडला असावा. कारण, शिपायाने ताबडतोब विचारले– 

“कोन्ता खास सांगावा यायचा हुता का?”

“नाही नाही… काही नाही. जा तू.”

“सायेब, माज्याकडनं काई चूक झाली का?”

“नाही नाही… अरे खरंच तसं काही नाही. जा तू.”

गणपतराव चांगलेच वरमले. ‘ आपण जरा अतीच तर करत नाही ना,’ असंही क्षणभर वाटून गेलं त्यांना.

शिपाई बावळटासारखा चेहरा करून जायला लागला. तशी गणपतरावांनी त्याला थांबवलं. म्हणाले,

“अरे ऐक… आता मी जरा काम करत बसणार आहे. आज काही कुणाच्या भेटी-गाठी ठरलेल्या नाहीत ना…? ठीक आहे तर ! आता कुणालाच आत सोडू नकोस.”

“जी” म्हणून शिपाई निघून गेला. 

‘आपण स्वत:च करावी का चौकशी?’, गणपतरावांच्या मनात येऊन गेलं. पण ‘नको नको. ते बरं दिसणार नाही’, असं म्हणून त्यांनी तो विचार झटकला आणि समोरच्या कामाकडे लक्ष द्यायला लागले. 

हळूहळू तो विचार मागे पडला. त्यानंतर चांगले दोन-एक तास गणपतरावांनी स्वत:ला कामातच बुडवून घेतलं. समाधीच लागली होती जणू त्यांची.

गणपतरावांची समाधी भंगली ती कसल्याश्या कोलाहलाने. सुरुवातीचे एक-दोन क्षण काही समजलंच नाही. नीट लक्ष देऊन ऐकायला लागले तेव्हा जाणवलं की, त्यांच्या कार्यालयाच्या दाराशीच दोन व्यक्ती वाद घालतायत. गणपतरावांनी जागेवरूनच, “काय चाललंय रे? कोण आहे?” असं विचारलं. त्याबरोबर शिपाई धावतच आत आला. मागोमाग एक कार्यकर्त्यासारखा दिसणारा मनुष्यही आत शिरला. ते पाहून शिपायाच्या कपाळाला नकळतच आठ्या पडल्या. पण साहेबांसमोर चिडणं बरं दिसणार नाही म्हणून तो काही बोलला नाही. गणपतरावांनी इशाऱ्यानेच ‘काय झालं?’ असं विचारलं. त्यावर शिपाई सांगू लागला,

“सायेब पाहा ना, तुमीच म्हनले होते ना कुनालाच आत सोडू नको म्हनून. तर ह्ये सायेब ऐकेचनात. काय तर म्हने, टपाल द्यायचंय. म्या म्हनलं, टपालच हाय नव्हं, मंग द्या की माझ्यापाशी मी द्येतो सायबास्नी नंतर. तर म्हनले की, न्हाय, म्हासभेच्या हापिसातून आलोय न् म्हत्वाचा सांगावा हाय. तुमालाच द्यायचा म्हंत्यात…”

गणपतरावांनी आलेल्या व्यक्तीला एकवार आपादमस्तक न्याहाळलं. हिंदूमहासभेच्या कार्यालयातून आल्याचं सांगतोय हा माणूस, पण मग आपण कधी पाहिल्यासारखं का वाटत नाहीये याला?

त्यांचे भाव ओळखून तो समोरचा तरुण मघाशीच्या भांडणाचा लवलेशही न दाखवता उत्साही स्वरात सांगू लागला,— “ मी रविंद्र जगताप. राजापूरला असतो. नुकताच मुंबईला आलोय शिकायला. राजापूरला असल्यापासून महासभेचं काम करतो मी. आज कामानिमित्त पुण्यात येणार होतो. तर काल संध्याकाळीच तात्यारावांनी बोलावून घेतलं..”

— ‘तात्याराव? बॅ. सावरकर?’ हा उल्लेख होताच गणपतरावांनी कान टवकारले ! जगतापच्या ते यत्किंचितही लक्षात आलं नाही. त्याचा ओघ चालूच होता,

“…मी म्हटलं, देईन की त्यात काय ! आता साक्षात स्वा. सावरकरांनी काम सांगितलेलं. त्यांची सेवा करण्याची संधी म्हणजे साक्षात स्वातंत्र्यलक्ष्मीचीच सेवा करण्याची संधी की ! घेतलं पत्र आणि आलो इकडे ! तर हे महाशय आत सोडेचनात ! साहेब कामात आहेत म्हणे ! आता मला सांगा, सावरकरांच्या निरोपापेक्षा अजून कोणतं काम महत्वाचं असणार आहे? घ्या…!!!” – असं म्हणून जगतापने पत्र गणपतरावांच्या दिशेने सरकावले. 

गणपतरावांच्या हाताला हलकासा कंप सुटला होता. परंतु तसं जाणवू न देता त्यांनी ते पत्र हातात घेऊन एका बाजूला ठेवले आणि जगतापकडे वळून म्हणाले,

“जगतापसाहेब, चहा घेता ना?”

“छे छे साहेब, चहा नको. घाईत आहे मी जरा. बाहेर मित्र वाट पहात थांबलेयत. ते काय… ते पुण्यात नवा आहे ना मी. कार्यालय माहिती नव्हतं मला.”

यावर गणपतराव म्हणाले, “हरकत नाही. पुढच्यावेळी आलात तर चहाला जरुर या !” मग शिपायाकडे मान वळवून म्हणाले, “ पुढच्यावेळी हे आले तर अडवू नकोस रे यांना. पाहुणे आहेत आपले !”

शिपाई मान डोलावत अदबीने निघून गेला. ‘आपल्याला केवढा मोठ्ठा मान दिला जातोय ’ असं वाटून जगतापचीही छाती फुगली ! त्या आनंदातच तोही परतला.

– क्रमशः भाग पहिला 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments