सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
वाचताना वेचलेले
☆ बघता बघता… – कवि : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆
बघता बघता आई,
मी तुझ्यासारखी व्हायला लागले.
संध्याकाळ झाली की
हात जोडायला लागले.
आठवणीने तुळशीला दिवा लावते.
झोपाळ्यावर बसून
रामरक्षा ही म्हणायला लागले.
आणि झोपाळ्यावर डोलताना
कुठल्याही आठवणीनी डोळ्यात
पाणी साठवायला लागले.
चहाच्या कपाचा डाग पुसायला
पटकन फडकं शोधायला लागले.
धुतले नाही तरी त्यात
पाणी भरून ठेवायला शिकले.
कॉटनचे कपडे आणि मऊ स्पर्श
दोन्ही आठवणीने वापरायला लागले.
कपड्याचा दिसण्यापेक्षा
स्पर्शाचा आनंद
शरीराला कळायला लागला.
रात्रीच्या जेवणानंतर
थोडंसं गोड खावसं वाटायला लागलं.
स्वतःच्या पांढऱ्या होत जाणाऱ्या केसांकडे पाहताना
तुझे काळे पांढरे लांब केस आठवायला लागले.
तुझ्या हातावरच्या सुरकुत्या
आता माझ्या हातावर उमटणार
याची वाट पाहायला लागले.
“म्हातारी झाले मी”
असं तू म्हणलीस कि मी,
अट्टाहासाने नाही म्हणायची.
आता मी म्हातारी झाले.
बघता बघता तुझ्यासारखी झाले.
काही दिवसांनी
दिसेनही तुझ्यासारखी.
आईची सावली अस कुणी म्हटलं
तर हरखून जायला लागले.
आई
…. मी तुझ्यासारखी व्हायला लागले
कवयित्री : अज्ञात
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈