डाॅ.भारती माटे
वाचताना वेचलेले
☆ एका वडाची गोष्ट… – लेखक : श्री श्रीनिवास चितळे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆
१९६७ साली चिपळूणला मोठा भूकंप झाला आणि चिपळूणच्या इतिहासाचा शे, दीडशे वर्षाचा साक्षीदार उन्मळून पडला, वडाच्या नाक्यावरचा वड भुईसपाट झाला, काही दिवसांनी एका समारंभात देवळात आधी भंगलेली मूर्ती विसर्जित करून नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करतात तशी नवीन वडाची फांदी त्या जागी स्थापित केली गेली, आमच्या दादानी घरातील भालावर खडूने लिहिले वड. दिनांक ४/२/१९६७. पूर्वी घरात मुल जन्माला आल कि अशी नोंद, घरातील भालावर खडूने करून ठेवायची जुन्या लोकांना सवय होती, माझ्या जन्माची नोंदही अद्याप तिथे होती. ” २८ मे १९५६, सकाळी ११. २० वाजता सिंधू प्रसूत झाली, मुलगा झाला “.
चार, पाच वर्षांनी गावातील स्त्रिया माझ्या चुलत्यांकडे आल्या व म्हणाल्या बन्या काका, वड मोठा झाला आहे, यावर्षी याची पूजा केलीतर चालेल का ? खूप लांब पागेवर पुजेला जायला लागत. दादा म्हणाले ठीक आहे, करतो सोय.
दादा तसेच उठले व वाण्याळीत खेडेकरांकडे गेले व म्हणाले महादेवशेठ, नाक्यावरच्या वडाची मे मध्ये मुंज करायला हवी, वडपौर्णिमेच्या पुजेला मुंज झालेला वड हवा.
महादेवाशेठ म्हणजे राजा माणूस, “बन्या, दणक्यात करू मुंज, सगळी तयारी कर, खर्च वाटेल तेवढा होऊदे “.
मुहूर्त काढला गेला, रीतसर मुंजीच्या पत्रिका छापल्या गेल्या, साग्रसंगीत बहिरीबुवा ते विन्ध्यवासिनी अशी देवाची आमंत्रण झाली. गावाला सनई चौघाडयासह मिरवणूकीने आमंत्रणाची अक्षत फिरवली गेली, आणि सगळ गाव, तेव्हा लहान होत, घरातील मुलाची मुंज असावी अशा तयारीला लागला.
प्रत्यक्ष मुंजीच्या दिवशी तर धमाल, वडा भोवती मांडव घातलेला होता, प्रवेश दारावर केळीच तोरण, मुलीनी रांगोळ्या काढलेल्या, गावातील नवविवाहित जोडप्याकडे यजमानपद दिलेलं होत. दोन दिवस आधी ग्रहमक झाला होता, घरचे केळवण झाले त्याला शे शंभर माणसांची पंगत उठली होती. देवक ठेऊन झाल, अष्टवरघ्य, मातृ भोजन झाले आणि बरोबर १०. २३ मिनिटांनी कुर्यात बटोर मंगलम झाल, सनई, चौघडे, ताशे यांनी सर्व आसमंत दणाणून गेला. संध्याकाळी पालखीतून वडाच्या प्रतिकृतीची भिक्षाळा निघाली होती.
वड द्विज झाला. यज्ञोपवीत घातलेला, दृष्ट लागू नये म्हणून काजळाची तीट लावलेला, हळदी कुंकू लावलेला तो वड हि बटू सारखा देखणा व तेजःपुंज दिसायला लागला.
खेडेकरशेठ ना एक नवीन पैसा हि खर्च करावा लागला नाही, प्रत्येकाने स्वतःच्या घरच कार्य समजून सर्व सेवा फुकट दिली होती.
बासुंदी पुरीचा व १५० माणसांचा जेवणाचा खर्च मुंबई, पुण्यात स्थायिक झालेल्या चिपळूणकरानी उचलला होता.
त्या नंतर आलेल्या वड पौर्णिमेला स्त्रियांचीच नव्हे तर पुरुषांचीही रीघ वडावर लागली होती बटू पादोदक तीर्थ घ्यायला.
त्याकाळी माणसं खूप साधी होती, हि अंधश्रद्धा नाही का अस विचारणारा एकही सूर तिथे नव्हता, होता तो एक उत्कृष्ठ सार्वजनिक कामाचा जल्लोष आणि आनंद.
श्रीनिवास चितळे
(फोटोत तो वड दिसतोय, ज्याची ही गोष्ट आहे.)
लेखक : श्री श्रीनिवास चितळे
संग्रहिका : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈