डाॅ.भारती माटे
वाचताना वेचलेले
☆ ‘सोनागाची’मधील दुर्गा – –… लेखक : श्री समीर गायकवाड ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆
कोलकता येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्या प्रकरणी बंगालमधील वेश्यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिक आहे! किंबहुना सामान्यांचे डोळे उघडणारी आहे! कथित सभ्य सामान्य माणसं या स्त्रियांपासून अंतर राखतात मात्र जेव्हाही कुठला महत्वाचा सामाजिक प्रश्न उद्भवतो तेव्हा या स्त्रिया त्यात उडी घेतात हा आजवरचा अनुभव आहे.
पीडितेला न्याय मिळावा म्हणून बंगालमधील वेश्यांनी मोर्चात सहभाग नोंदवला! यावेळी त्यांच्या हातात काही घोषणाफलक होते त्यावर लिहिलं होतं की,
प्रयोजने आमादे काचे आशून, किंतू नारी के धारशन कोरबे ना!
প্রয়োজনে আমাদের কাছে আসুন, কিন্তু নারীকে ধর্ষণ করবেন না।
.. याचा अर्थ असा आहे – तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर आमच्याकडे या, परंतु कुठल्या स्त्रीवर बलात्कार करू नका!
याच अनुषंगाने या माता भगिनींनी त्यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्याची वंगभूमीमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे! याची माहिती घेण्याआधी दुर्गापूजेचा इतिहास जाणून घेणं अनिवार्य ठरतं!
सोनागाची हा कोलकत्यातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया आहे. या परिसराला इतिहास आहे. याचा एक पैलू धार्मिक आहे जो थेट दुर्गामातेशी संबंधित आहे! कोलकत्यात दुर्गापूजा उत्सवास सुरु होण्याच्या विशिष्ठ तिथी आहेत. त्या त्या दिवशी ते ते विधी पार पाडले जातात, कुंभारवाड्यात (बंगाली भाषेत कुंमारतुली) दुर्गामूर्ती बनवण्यास प्रारंभ करण्याचा दिवस दरसाली जाहीर होतो, त्याच दिवशी मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होतो. मूर्तीसाठी दहा ठिकाणाहुन माती आणली जाते, तिचे पुण्यमाटी आणि निषिद्ध माटी असे दोन भाग पडतात. पुण्यमाटी मध्ये शेण असलेली माती, गोमूत्र असलेली माती, गंगेच्या काठची माती, कुंभाराच्या अंगणातली माती, देवालयातली माती, पर्वतातली माती इत्यादींचा समावेश होतो तर निषिद्ध मातीमध्ये वेश्यांच्या अंगणातल्या मातीचा समावेश होतो. या मातीला निषिद्ध म्हटलं गेलं असलं तरीही जोवर ही माती आणली जात नाही तोवर मूर्तीच्या निर्मितीस प्रारंभ होत नाही. शस्त्रसज्ज दहा भुजा असलेली दुर्गेची मूर्ती वेश्येच्या अंगणातल्या मातीशिवाय बनत नाही हे सत्य आहे आणि तो तिथला रिवाज झाला आहे. या मागची धारणा काय असावी याचं विश्लेषण करताना जाणकारांत मतभेद आहेत. पैकीचे दोनच महत्वाचे मुद्दे येथे मांडतोय.
वेश्यांकडे पुरुष जातात तेंव्हा त्यांच्या मनात नेमकं काय वादळ उठत असावं यावर आधारित पहिला विचार आहे. यानुसार जेंव्हा एखादा पुरुष वेश्येकडे जातो तेंव्हा त्याच्या मनातले सर्व विचार, वलय त्याने बाहेर टाकलेले असतात, वासना आणि देहविचार यांच्या बळावर तो तिच्या घरात शिरतो. म्हणजेच तो जेंव्हा तिच्या घरात शिरतो तेंव्हा त्याच्या मनात शून्य विचार असतात. त्यामुळेच त्याची पावलं पडलेली माती घेतली जाते ज्यात पुरुषाच्या मनात अन्य भावना नसतात. हे मत मला मान्य नाही, पण या मताला दुजोरा देणारे अनेक बंगाली पंडीत आहेत.
दुसरं एक मत आहे त्यानुसार दुर्गा आणि महिषासुर यांचं जेंव्हा युद्ध झालं होतं तेंव्हा त्यानं तिचं चारित्र्यभंग करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात तो यशस्वी ठरला नाही आणि शिवाय तो तिच्याकडून हरला देखील. दुर्गेच्या सर्व रूपांची पूजा होते पण तिच्या मलिन होऊ घातलेल्या रूपाची पूजा होत नाही, भलेही हे स्वरूप निषिद्ध असले तरी त्यातही एक देवांश आहेच हे कसे नाकारता येईल? मग आज ज्या स्त्रियांच्या वाट्यास हे भोग आलेले आहेत त्यांच्या अंगणातली माती आणल्याशिवाय संपूर्णत्व कसे येईल! या धारणांना अनुसरून तिथली माती आणली जाते नि मगच पहिली दुर्गा साकारते मग अन्य मूर्तिकार त्यांच्या प्रांगणात दुर्गा मूर्तीच्या निर्मितीत गुंततात हा तिथला रिवाज आहे!
तर यंदाच्या वर्षी सोनागाचीमधील भगिनींनी दुर्गेच्या निर्मितीसाठी आपल्या अंगणातली माती देण्यास नकार दिला आहे! एकीकडे स्त्रियांचे शोषण होतेय, दुसरीकडे सरकारे आवश्यक ती पावले उचलत नाहीत आणि यांचे शोषण तर अहोरात्र जारी आहे! मग स्त्रियांना न्याय नसेल तर निव्वळ दुर्गापूजा करून काय साध्य होणार आहे हा त्यांचा सवाल आहे!
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः हा श्लोक आपल्याकडे लोकप्रिय समजला जातो! स्त्रिया केवळ या श्लोकापुरत्या उरल्या आहेत का? वास्तवात त्या शौकासाठी उरल्यात की काय असे वाटण्याजोगी स्थिती आहे! याच मुद्द्याला अनुसरून सोनागाचीतील स्त्रियांनी हा निर्णय घेतला आहे.
दरबार ही सोनागाचीमधली सर्वात मोठी एनजीओ आहे. वीस हजार वेश्या भगिनी या एनजीओच्या सदस्य आहेत. यांची स्वतंत्र बँक देखील आहे, वैद्यकीय सेवाही आहे. शाळा काढण्याचा त्यांचा मानस आहे. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे वेश्यांनी वेश्यांसाठी चालवलेली एनजीओ अशी याची व्याख्या करता येईल. कालच दरबार’ची बैठक बोलवण्यात आली होती नि त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. विशेष बाब म्हणजे कालीघाट ते सोनागाची आणि खिदीरपूर या परिसरात अनेक घरगुती नृत्यशाळा आहेत. या पूर्ण परिसरात जितके दुर्गा पंडाल आहेत त्यांना सरकार अनुदान देतं. गतसाली हे अनुदान ७०००० रुपये होतं यंदा सरकारने ८५००० रुपये अनुदान देऊ केलंय. पण या झुंजार स्त्रियांनी ते नाकारले आहे आणि आपला आवाज बुलंद केला आहे!
या स्त्री सोशल मीडियावर नाहीत. यांना समाज तिरस्काराने पाहतो, समाज यांची हेटाळणी करतो! सामाजिक मांडणीच्या उतरंडीत या सर्वात खाली आहेत. यांचं अफाट शोषण होतं! तरीही त्या सामाजिक लढ्यात हिरिरीने उतरतात, त्या बदल्यात समाजाकडून त्यांची एकच अपेक्षा असते ती म्हणजे किमान माणूस म्हणून तरी त्यांच्याकडे पहिले जावे! ही अपेक्षाही त्या कधी समोर येऊन मांडत नाहीत! जिवंत कलेवरं असणाऱ्या शोषित स्त्रिया आपला आवाज बुलंद करतात. त्या उलट आपण काय करतो हा प्रश्न हरेकाने स्वतःला विचारला पाहिजे!
सोनागाचीमधील माता-भगिनींचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो ! 💐
त्यांच्यातल्या दुर्गेला अभिवादन करतो !🙏
लेखक : श्री समीर गायकवाड
संग्रहिका : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈