वाचताना वेचलेले
☆ गृहिणी – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆
मी म्हणजे मलाच पडलेलं एक रहस्य आहे. तसं ते अनेक जणांना अगदी देवाला पण पडलेलं कोडं आहे, असे नवऱ्याला उगाचच वाटत असते. मी कशी आहे? हे मलाच न कळल्याने ते नवऱ्याला कळावं, अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे. तरी मी आशावादी आहे.
मी एक साधीसुधी हसरी मुलगी आहे, जिला खूप काही करायचे होते. फुलपाखराचे पंख लावून गरुड झेप घ्यायची होती. स्वप्नांच्या बागेत बागडताना अचानक फुलांचा हार गळ्यात पडतो आणि आजूबाजूचे टाळ्या वाजवून सांगतात, आता तू गृहिणी झालीस. संसार म्हणजे उत्तर माहीत असतं, प्रश्नच कळत नाही. फुलपाखरू पकडता पकडता अचानक घोड्यावर बसवल्यावर धांदल होते. ही घोडदौडही आवडायला लागते. थोडं सावरलं की लक्षात येते, आपण नुसतेच घोड्यावर बसलोय. लगाम आपल्या हातात नाहीत. पण यातही आनंद वाटतो.
आपलं घर, आपला संसार, तुझं सासर, तुझी माणसं करत कौतुक सुरू होतं. सगळ्यांच्या वेळा, मूड, आवडी सांभाळत. जेव्हा मुलं येतात तेव्हा खरी कसरत सुरू होते. त्यांचे कौतुक करता करता गृहिणी पद आनंदाने मिरवायला लागते. माझं घर माझा अभिमान होतो, माझी मुलं माझी जबाबदारी होते. हे अविरत सगळं करताना वेगळं समाधान वाटत असतं.
मध्येच कोणीतरी तू काय करतेस? असा वेगळाच प्रश्न विचारून घोळात पाडतं.
मी घर सांभाळते म्हटलं, की प्रतिप्रश्न, त्यात काय? ते तर कुलूप पण सांभाळतं. तू नोकरी व्यवसाय काय करतेस? म्हटल्यावर विचार सुरू होतो की मी घरात नक्की करते काय? नुसती बसून असते? मी काम करते? त्याला समाजात मान नाही? मी जे करते ते मातीमोल आहे?
घरच्या लोकांना दोन वेळा घरी केलेले ताजे अन्न वाढते. माझ्या घरी हक्काने पूर्वकल्पना न देता कधीही, कोणीही येऊ शकते, कारण माझं घर मी सांभाळते, कुलूप नाही सांभाळत. माझ्याशी कोणीही, कितीही जमीन वेळ गप्पा मारु शकते, कारण माझ्याकडे खूप वेळ असतो. मला भेटून, माझ्याशी बोलून लोकांना छान वाटतं. कारण मी घाईत नसते. मी खूप वाचते, खूप लिहिते, खूप फिरते, खूप आराम करते, खूप विचार करते, कारण मी इतर काही करत नाही.
माझी वास्तू आणि घरातलेही निर्धास्त असतात कारण मी घरात असते. माझ्या निव्वळ असण्यानेही अनेक गोष्टी आपोआप होतात. मला विशेष वेगळे काही करावे लागत नाही. आला गेला, सणवार नेमाने उत्साहाने साजरे करते. माझं अंगण प्रसन्न असतं, रांगोळी हसत असते, झाडं डोलत असतात, पक्षी गात असतात कारण त्यांना माहीत असतं, माझं त्यांच्याकडे लक्ष आहे. माझ्या नावावर काही नसलं तरी मी आरामात जगते कारण तेवढी पुण्याई मी रोज कमवत असते. मी नटते, गाते, हसते, रुसते, ओरडते, वैतागते कारण मी हेच तर करते. याची नोंद कोणी घेतं, कोणी घेत नाही, कोणाला कौतुक वाटतं, कोणाला वाईट वाटतं. पण मी मजेत असते कारण मी प्रत्येक दिवस माझ्या पद्धतीने भरभरून जगते.
प्रॉब्लेम सोडवण्यापेक्षा तो निर्माण होऊ नये असे बघते. टीव्हीवरच्या अनेक कार्यक्रमांना न्याय देते. रेडिओवरचे आर जे माझा मित्र परिवार आहे. ते मला घरबसल्या जगभर फिरवून आणतात. माझ्या मुलांना कुलूप उघडावे लागत नाही, माझ्या सासू, सासऱ्यांना कोणाला सांगू? कोणाशी बोलू? असा प्रश्न पडत नाही. आमच्या वादातही संवाद असतो. मी थोडा वेळ बाहेर गेले तरी अख्खं घर माझी वाट बघतं. मुलांना, सासू- सासऱ्यांना डॉक्टरकडे न्यायला कोणाला सुट्टी घ्यावी लागत नाही, कारण मी असते. कमी तिथे मी असा माझा बाणा. खरं सांगू? माझं घर जास्त आजारी पडत नाही, कारण मी असते ना.
माझी शेजारीण माझ्याकडे किल्ली ठेवून, निरोप ठेवून जाते. माझं तिच्या घराकडे लक्ष असणार हे तिला माहीत असतं त्यामुळे cctv नाही लागत. ती म्हणतेही माझ्यापेक्षा तुझाच धाक जास्त आहे मुलांना, मी काही बोलत नाही. फक्त बघते. आपल्याला काय करायचंय- कोणी कुठे गेलं, कधी आलं आणि काय करतंय? तरी पण माझं लक्ष असतं. पाण्याची टाकी वाहत असते, नळ सुरू असतो, दिवा बंद करायचा राहतो, लाईटचं बिल एखाद्या महिन्यात येत नाही पासून उद्या चतुर्थी आहे पर्यंत सगळं बघावं लागतं, आपल्या पुरतं नाही लोकांचंही. पास झाला, नोकरी मिळाली की समोरचा सोन्या मलाही पेढे देऊन नमस्कार करतो. कधीतरी अभ्यासात केलेल्या मदतीची आठवण काढतो, आईला डबा द्यायला जमलं नाही तरी तू होतीस म्हणून अडलं नाही काकू, म्हणतांना त्याचे डोळे पाणावतात. परदेशी चाललोय पण तुझ्या खाऊची आठवण येईल म्हणतो. त्याच्या दिवाळीच्या पार्सलमध्ये माझे रव्याचे लाडू विराजमान होतात.
मी लग्नाला, कार्यक्रमांना मदतीपासून जाते कारण मला ते मनापासून आवडतं आणि जमतंही. माझ्या डोक्यावर रजेचा बागुलबुवा नसतो. माझ्या गावात कुठे काय छान मिळतं ते परगावचेच नाहीत, तर गावातलेही मला विचारतात. कारण मी चटणीपासून दागिन्यांपर्यंत स्वतः जाऊन खरेदी करते.
आम्ही मैत्रिणी मिळून काहीही करत असतो. कार्तिकस्वामीच्या दर्शनासाठी रांग लावतो, देवीची ओटी भरायला जातो, बागेत कदंब फुललाय कळलं की दरवेळी अप्रुप असल्यासारखे जातो, सुरंगीला बहर आला की तो बघावा लागतो, बुचाच्या फुलांचा सडा गोळा करतांना लहान मुली होतो. गाण्याच्या मैफलीला जातो, सिनेमा बघायला जातो, टेकडीवर सूर्योदय बघायला जातो. कोणाच्या घरी बसून आपल्याला काय करायचं म्हणून चंद्रापर्यंत गप्पा मारतो. खळखळून हसतो, चिडवतो, भेटतो, बोलतो, बघतो. तू छान दिसतेस, अशी दिलखुलास दाद मैत्रिणीला देतो. तिचा ड्रेस, तिचा दागिना, केशरचना आवडून जाते आणि आमची दादही तिला भावतेच. हा ड्रेस छान नाही दिसत, हे केसांचं काय टोपलं केलंय, असंही सांगतो. असं काहीही विनाकारण करून मस्त वाटतं ही गोष्ट खरी.
न संपणारी यादी आहे. तरी लोकांना वाटतं मी काही करत नाही. असू दे काही बिघडत नाही. कारण मी आहे सदाबहार भारतीय गृहिणी!
मी खूप काही करते ते इतरांना दिसत नाही. मी खूप काही वाचवते, त्याचे मोल नाही. अहोंच्या पिठात आमचं मीठ. यात महत्त्वाचे काय हा प्रश्न नाही. माझ्यासाठी जेवणारा महत्वाचा असतो. घरातच असते त्याची मी किंमत करत नाही.
लगाम माझ्या हातात नसला, तरी काही बिघडत नाही. मी आहे म्हणून घोडा पळतोय, याची लगाम धरणाऱ्याला कल्पना आहे.
तो फक्त बोलत नाही. खरं सांगते मला याची खंत नाही. मातीलाही मोल असतं, हे मी जाणते.
हा सर्व भारतीय गृहिणींचा प्रातिनिधिक अनुभव आहे. साधर्म्य आढळायलाच हवं.
लेखक: अज्ञात
प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈