सुश्री सुनीला वैशंपायन
वाचतांना वेचलेले
☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 2 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆
(सावरकरांची अजोड तत्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता.)
(शिपाई मान डोलावत अदबीने निघून गेला. ‘आपल्याला केवढा मोठ्ठा मान दिला जातोय’ असं वाटून जगतापचीही छाती फुगली! त्या आनंदातच तोही परतला.) इथून पुढे —
दोघेही गेल्यावर गणपतरावांनी अक्षरश: झडप घालून ते पत्र हातात घेतलं. आपल्या गुरूंचं पत्र ! आपल्या देवाचं पत्र !! साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पत्र !!! — गेले चार दिवस या-त्या सगळ्या लोकांच्या आणि सगळ्या नेत्यांच्या शुभेच्छा येत होत्या. पण आपली नजर लागली होती ती केवळ याच पत्राकडे. कित्येकदा वाटलं होतं की धावत जावं तात्यारावांकडं आणि सांगावं.. —
– ‘तात्याराव… तात्याराव बघा ! मी मेयर झालोय तात्याराव ! या विद्वज्जनांच्या पुणे नगरीने हिंदूमहासभेच्या बाजूने कौल दिलाय ! तात्याराव, तुमचे हिंदूराष्ट्राचे स्वप्न साकारण्याच्या मार्गात आज अजून एक पाऊल पुढे टाकलंय आपण ! आणि त्या पावलात कणभर का होईना पण तुमच्या या शिष्याचा वाटा आहे … या गणपत नलावड्याचा वाटा आहे, तात्याराव !’
— आणि ज्यावेळी येणाऱ्या संदेशांपैकी एकही संदेश तात्यारावांचा निघत नव्हता, तेव्हा कसे खट्टू झालो होतो आपण ! नुसत्या आठवणीनेच गणपतरावांना एखाद्या लहान बालकासारखे हसू फुटले !
त्याभरातच थरथरत्या हातांनी त्यांनी ते पत्र एकवार भाळी लावले. मग हलक्या हातांनी त्यांनी ते फोडले. आत सावरकरांनी स्वहस्ते लिहिलेला कागद ! पत्राच्या सुरुवातीस सावरकरांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे लिहिलेल्या ‘श्रीराम’ कडे त्यांनी किंचित काळ डोळे भरून पाहिले. सावरकरांची छबी दिसली असावी बहुतेक गणपतरावांना त्यात ! ते अधीर होऊन वाचू लागले —
“प्रति श्री. गणपत महादेव नलावडे यांस,
सप्रेम नमस्कार.
पुण्याची धुरा आता समर्थ हातात आलीये म्हणायची ! तुम्ही ही नवस्वीकृत भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडालच, यात मला किंचितही शंका वाटत नाही. तुम्हाला या जबाबदारीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !
खरं म्हणजे मी तुमची क्षमाच मागायला हवी. पत्र पाठवायला अंमळ, नव्हे बराचसा उशीरच झालाय. पण काय करू ! तुम्हाला माझे हे भाषाशुद्धीचे धोरण तर ठाऊकच आहे. ज्यांच्याशी भांडायचं त्याच इंग्रजीला आपल्या देशी भाषांचा भ्रतार बनवायचं? तेही आपल्या देशी भाषा स्वत:च अतिशय संपन्न आणि सामर्थ्यवान असताना? आपणच परकीय शब्द घुसडून आपल्या वैज्ञानिक आणि अर्थवाही भाषेचे व शब्दांचे मूल्य का म्हणून उणावून घ्यायचे? …. जिथं स्वकीय भाषांतील प्रतिशब्द उपलब्ध आहेत, तिथे ते योजायलाच हवेत. तिथे इंग्रजीचे वा ऊर्दू-फारसीसुद्धा अन्य कुणाही परकीय भाषेचे भलते लाड नकोतच ! मात्र जिथे शब्दांना प्रतिशब्द उपलब्ध नाहीत, तिथेही देववाणी संस्कृतला शरण जात सोपे, सुटसुटीत आणि अर्थवाही शब्द शोधणे व ते बोलीभाषेत रुळवणे, हे देखील आपले तितकेच महत्वाचे असे राष्ट्रीय कर्तव्य आहे !
उदाहरणार्थ – ते ‘स्कूल’ म्हणतात, मला त्यासाठी ‘शाळा’ हा पर्याय सुचतो.
ते ‘हायस्कुल’ म्हणतात – त्याला आपण ‘प्रशाला’ म्हणू शकतो.
ते ज्याला ‘टॉकीज’ अथवा ‘सिनेमा’ म्हणतात, त्यासाठी ‘बोलपट’ अथवा ‘चित्रपट’ असे दोन शब्द सुचताहेत मला – यातला कोणता शब्द वापरायचा ते तेवढे ठरवायचे.
‘अप-टु-डेट’ला ‘अद्ययावत’ म्हणता येईल,
‘ऍटमॉस्फिअर’ला ‘वायुमान’ म्हणता येईल,
‘पोलिस’ला ‘आरक्षी’ म्हणता येईल.
‘तारीख’ला ‘दिनांक’ म्हणता येईल. असे बरेच काही…
मात्र माझे घोडे या ‘मेयर’ शब्दाच्या तटावर अडले होते. त्यासाठी पर्यायी शब्द काही सुचत नव्हता आणि तुम्हाला ‘मेयर’ म्हणून शुभेच्छा देणे मनाला पटत नव्हते. आता काहीच सुचणार नाही, असे वाटत असतानाच एक शब्द स्फुरला — ‘महापौर ‘.
साधारण मोठ्या गावाच्या प्रमुखास ‘मेयर’ म्हणतात. अश्या मोठ्या गावांच्या मागे ‘पूर’ लावायची आपल्याकडे पद्धत आहे. अगदी वैदिक काळापासून आहे. आणि अश्या ‘पुरा’त राहाणाऱ्या रहिवाश्यांना म्हणतात, ‘पौरजन’. तुम्ही या पुणे नामक ‘पुरा’चे प्रमुख आहात… प्रथम नागरिक. त्याअर्थी तुम्ही झालात – महापौरजन ! आणि त्याचेच सुटसुटीत रूप आहे – ‘महापौर’!
असा अर्थपूर्ण शब्द सापडल्या-सापडल्या ताबडतोब पत्र लिहावयास घेतले आणि ताबडतोब धाडलेसुद्धा ! तेव्हा, महापौर गणपतराव नलावडे, तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!”
खाली दिनांक आणि सावरकरांची घुमावदार स्वाक्षरी होती!
— पत्र वाचत असतानाच गणपतरावांचे मन सावरकरांची अजोड तत्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता, यांच्यासमोर नत झाले होते. भानावर येताच गणपतराव धावत-धावत आपल्या कार्यालयाबाहेर आले. त्यांना असे आलेले पाहून बाहेर उभे असलेले लोक चमकलेच. शिपाई बिचारा गोंधळून उभा राहिला. तिकडे कुठेच लक्ष न देता त्यांनी दारावर लावलेली पाटी उतरवण्याची खटपट चालू केली.
“काय झालं सायेब”, शिपायाने बावरून विचारले.
“तू लागलीच पळ आणि नवी पाटी बनवायला टाक. अश्शीच नक्षी हवीये अगदी ! फक्त त्यावर लिहिलेलं हवंय — “ गणपत महादेव नलावडे, महापौर “! — समजलं? जा लवकर ”, असे म्हणून त्याच्याकडे वळूनदेखील न पाहाता गणपतरावांनी पाटी उतरवण्याचे काम सुरूच ठेवले !
शिपाई बिचारा काहीच न समजून जागीच उभा होता. बेट्याला काय कल्पना की, तो एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला होता !
हो, सावरकरांनी मराठी भाषेला अजून एक चिरंतन टिकणारी आणि लवकरच सर्वमान्य होणारी देणगी दिली होती ! आज एका शब्दाचा जन्म झाला होता !!
— समाप्त —
संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈