📖 वाचताना वेचलेले 📖

☆ जीभ… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

  1. ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ !
  2. रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्वीकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत- बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ!
  3. एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ!
  4. सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ !
  5. तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ!
  6. प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ!
  7. भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ !
  8. सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकून मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ !
  9. बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे काम करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ !
  10. दिसतो तो फक्त “आऽऽ कर” असं म्हटल्यावर, थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ !
  11. काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा कामानिराळा राहणारा हा बिलंदर अवयव जीभ !
  12. दाताशी युती करत त थ द ध, ओठाशी युती करत प फ ब भ, दंतमूलाशी युती करत च छ ज झ, टाळुशी युती करत ट ठ ड ढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनीनिर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ !
  13. पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डाॅक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणू काही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ !
  14. ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ !
  15. ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ !
  16. आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यांनी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ !
  17. उगाच नाही म्हटलंय__

जेणे जिंकीली रसना ।

तृप्त जयाची वासना ।

जयास नाही कामना ।

तो सत्वगुण ।।

– दासवाणी

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments