श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ रिटायर्ड वडील… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
☆
आज जेवून झाल्यावर
वडील बोलले…
” मी आता रिटायर होतोय.
मला आता नवीन कपडे नकोत.
जे असेल, ते मी जेवीन.
रोज वाचायला पेपर नको.
आजपासून बदामाचा शिरा नको,
मोटर गाडीवर फिरणं बंद,
बंगला नको, बेड नको,
एका कोप-यात, झोपण्यास थोडी जागा मिळाली तरी खूप झालं.
आणि हो तुमचे, सुनबाईचे मित्र व मैत्रिणी,
चार पाहुणे आले तर
मला अगोदर सांगा.
मी बाहेर जाईन.
पण त्यांच्यासमोर ‘बाबा, तुम्ही बाहेर बसा’
असं सांगू नका.
तुम्ही मला जसं ठेवाल,
तसा राहीन. “
काहीतरी कापताना सुरीनं
बोट कापलं जावं आणि
टचकन डोळ्यांत पाणी यावं,
काळीजच तुटावं,
अगदी तसं झालं…
एवढंच कळलं, की
आजवर जे जपलं,
ते सारंच फसलं…
का वडिलांना वाटलं,
ते ओझं होतील माझ्यावर… ?
मला त्रास होईल,
जर ते गेले नाहीत कामावर… ?
ते घरात राहिले, म्हणून
कोणी ऐतखाऊ म्हणेल…
की त्यांची घरातली किंमत
शून्य बनेल… ?
आज का त्यांनी
दम दिला नाही… ?
“काय हवं ते करा, माझी तब्बेत बरी नाही,
मला कामावर जायला जमणार नाही… “
खरंतर हा अधिकार आहे,
त्यांचा सांगण्याचा.
पण ते काकुळतीला का आले… ?
ह्या विचारातच माझं मन खचलं.
नंतर माझं उत्तर
मला मिळालं…
जसजसा मी मोठा होत गेलो,
वडिलांच्या कवेत
मावेनासा झालो.
तेव्हा नुसतं माझं शरीरच वाढत नव्हतं, तर त्याबरोबर
वाढत होता तो माझा अहंकार
आणि त्यानं वाढत होता,
तो विसंवाद…
आई जवळची वाटत होती.
पण, वडिलांशी दुरावा साठत होता…
मनांच्या खोल तळापर्यंत
प्रेमच प्रेम होतं.
पण,
ते कधी शब्दांत
सांगताच आलं नाही…
वडिलांनीही ते दाखवलं असेल.
पण, दिसण्यात आलं नाही.
मला लहानाचा मोठा करणारे वडील,
स्वत:च स्वतःला लहान समजत होते…
मला ओरडणारे – शिकवणारे वडील,
का कुणास ठाऊक
बोलताना धजत नव्हते…
मनानं कष्ट करायला
तयार असलेल्या वडिलांना,
शरीर साथ देत नव्हतं…
शून्यातून सारं उभं केलेल्या तपस्वीला,
घरात नुसतं बसू देत नव्हतं…
हे मी नेमकं ओळखलं… !
खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून,
सांगायचंच होतं त्यांना,
की थकलाहात, तुम्ही आराम करा.
पण
आपला अधिकार नव्हे,
सूर्याला सांगायचा, की
“मावळ आता”… !
लहानपणीचे हट्ट पुरवणारे
वडील…
मधल्या वयांत अभ्यासासाठी
ओरडणारे वडील…
आणि नंतर चांगलं वागण्यासाठी
कानउघडणी करणारे वडील…
आजवर सारं काही देऊन
कसलीच अपेक्षा न ठेवता,
जेव्हा खुर्चीत शांत बसतात,
तेव्हा वाटतं, की जणू काही
आभाळच खाली झुकलंय !
कधीतरी या आभाळाला
जवळ बोलवून
खूप काही
बोलावसं वाटतं… !
पण तेव्हा लक्षात येतं, की
आभाळ कधीच झुकत नाही,
ते झुकल्यासारखं वाटतं… !
आज माझंच मला कळून चुकलं,
की आभाळाची छत्रछायाही
खूप काही देऊन जाते… !
☆
कवी : अज्ञात
संग्राहक :श्री. अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
kelkaramol.blogspot.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈