श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “प्रेम…” – कविवर्य कुसुमाग्रज ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆
☆
प्रेम
प्रेम कुणावर करावं ?
प्रेम कुणावरही करावं.
प्रेम
राधेच्या वत्सल स्तनांवर करावं,
कुब्जेच्या विद्रुप कुबड्यावर करावं,
भीष्म द्रोणाच्या थकलेल्या चरणावर करावं,
दुर्योधन कर्णाच्या आभिमानी,
अपराजित मरणावर करावं
प्रेम कुणावर ही करावं.
प्रेम
रुक्मिणीच्या लालस ओठावर् करावं,
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं,
मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं,
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं,
आणि खड्गाच्या पात्यावरही करावं
प्रेम कुणावर ही करावं.
प्रेम
ज्याला तारायचाय त्याच्यावर तर करावंच
पण ज्याला मारायचंय त्याच्यावरही करावं,
प्रेम योगावर करावं,
प्रेम भोगावर करावं,
आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं,
प्रेम
प्रेम कुणावर करावं
प्रेम कुणावरही करावं.
☆
कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈