📚 वाचताना वेचलेले 📖
☆ “नवं नवं बालपण…” – लेखक : श्री द्वारकानाथ सांझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
आयुष्याला क्षणभंगुर का म्हणतात हे मला एक अख्खा दिवस मावळण्याच्या आतच कळलं होतं.
वेग, धावपळ लोकांचा घोळका, मित्रांच्या मैफिली, कौतुक, टाळ्या, हशा जाऊन त्याची जागा काळजी आणि सहानुभूतीने घेतली ते कळलच नाही. तरीही दीड वर्ष मी काहीतरी चांगले क्षण हेरत राहिलो, कधी सावधानतेच्या कड्याकुल्पातून हळूच चोरत राहीलो.
गेले दोन सव्वा दोन महिने मी स्वतःला शारीरिक कड्या कुलपात ठेवले
कागज के फूल या गुरुदत्तच्या सिनेमात कैफी आझमीने लिहिलंय ….
“वक्त है मेहरबा आरझु है जवा
फिक्र किसी बात की करें इतनी फुरसत है कहा “
… या अशा आयुष्यात लोळायला फार बरं वाटतं. त्यावेळी असं वाटायचं वेळ मिळाला की हे वाचायचं, ते पाहायचं आहे, या विषयावर लिहायचय, अनेक संकल्प डोळ्यासमोर असायचे आज वेळ आहे संकल्पही आहेत पण काही करण्याची ती उर्मी कमी झाली. लिखाण करण म्हणजे माझ्यासाठी समाधी लागण असल्यामुळे मी अधून मधून लिहीत असतो. काही गोष्टी करताना आनंदाच् वातावरणात असणं फार महत्त्वाचं असतं.
सध्या कैफीची जागा सुरेश भटांनी घेतली. त्यांच्या कवितेचे शब्द अधून मधून कानामध्ये लाऊड स्पीकर लावल्याप्रमाणे ऐकू येत असतात.
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगले की मज हसावे लागले “
ही कविता त्यानी आपल्यासाठी लिहिली का असं वाटायला लागलं.
हळूहळू लक्षात यायला लागला की माणूस बदललेल्या परिस्थितीत आयुष्याशी जुळवून घेतो. आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. मन नावाचा भुंगा फक्त फुल बदलतो. नसेल ते फुल पहिल्या इतक सुंदर, पण त्यातला मकरंद शोधतच राहतो
मी कुठल्या गोष्टी बंद करायला हव्यात याची लिस्ट डॉक्टर ने दिल्यानंतर चेहरा पडण्यासाठी मला दिलीप कुमारच्या अभिनयाच्या गुणवत्तेची गरज नव्हती.. तो नैसर्गिकपणे पडला माझ्या मुलाने माझ्या चेहऱ्यावरचं नैराश्य पटकन वाचलं आणि तो एक वाक्य उच्चारला.. ते वाक्य करवतीने लाकूड कापत जाव तसं मन कापत गेल. तो म्हणाला “पब्लिक, चाहते, टाळ्या मित्र, घोळका, कौतुक यातच तुम्हाला सुख आहे का?आम्ही तुमचे कोणी नाही का?'”
आयुष्यात कधीतरी आमच्यासाठी जागा ठेवा हे तो सांगत होता आणि त्याचं काही चुकलं नाही. माणूस आजारी एकटा पडत नाही. तो कुटुंबाला घेऊन आजारी पडतो. शारीरिकदृष्ट्या तो त्रास भोगतो पण मानसिक दृष्ट्या सर्व कुटुंबच त्यात गुंतलेल असतं. आता कुटुंब पहिलं बाकी इतर सगळ्या गोष्टी नंतर असं ठरवून टाकलं.
मुलाकडे राहत असल्यामुळे आजोबा आणि नातू किंवा नात हे नातं सगळं विसरायला लावत, हे लक्षात आलं. दहा-बारा दिवसासाठी नात येऊन गेली आणि नात ( स्वरा) आणि नातू ( कियांश)यांच्याबरोबर खेळताना ते दहा-बारा दिवस किती पटकन निघून गेले हे कळलच नाही. पण त्या गोड आठवणी पहिला लेख जपून ठेवावा तशा मी जपून ठेवल्या. मी पुन्हा लहान झालो जवळपास त्यांच्याच वयाचा त्यांच्याबरोबर खेळलो, कधी पत्ते कधी लहानपणी खेळलेला व्यापारसारखा खेळ (सध्या नवा अवतार पाहायला मिळतो). जणू बालपण पुन्हा अवतरल. त्यांच्याबरोबर खेळताना आपण हरायच असतं हे मला उमगलं. आदर्श विचार केला तर हे चुकीच असेल. लहान मुलांना पराभव झाला तर तो स्वीकारायचा हे शिकवायला हवं ही गोष्ट खरी आहे. पण बऱ्याचदा आजोबाचं मन हे आदर्शवादाला जुमानत नाही. ते नात किंवा नातवाच्या चेहऱ्यावरचा आनंद पहायला आसुसलेलं असतं. बऱ्याच गोष्टीने मी घरची शिस्त बिघडवतो. नातवाच्या आई-वडिलांना वाटतं की त्याने जास्त टीव्ही किंवा मोबाईल पाहु नये आणि ते योग्यच आहे पण नातवासाठी आजोबा आणि आजी हे फार सॉफ्ट टार्गेट असते. चेहऱ्यावर अजीजीचे भाव आणून “आबा पाच मिनिटांसाठी मोबाईल दे” असं म्हटल्यावर मी पाघळतो. त्या पाचची पंधरा मिनिटे कधी होऊन जातात कळत नाही.
मला पटतं मी चुकतोय.. पण वळत नाही. माझा नातू सहा वर्षाचा आहे. त्याच्यात मी पूर्ण गुंतून गेलो. सकाळी तो शाळेत जाताना त्याने मला कॉपी दिली नाही तर तो येईपर्यंत मला चैन तू काय दिवसभर माझ्याबरोबर खेळत नाही पण त्याचा आसपासचा वावर माझ्यासाठी भरलेल्या ऑडिटोरियम इतकाच प्रिय आहे. त्यालाही मी हळूहळू मॅच्युअर होताना पाहत आहे. त्याच वाढलेलं प्रेम आणि दिवसागणीक मधासारखं गोड आणि अत्यंत घट्ट होत जाणाऱ् नातं मला सुखावत. अगदी, माझ्या कुठल्याही वैयक्तिक आनंदापेक्षा. पूर्वी आमच्या घरून मुलाच्या घरी आल्यावर परतताना तो सांगायला “आजी येताना काहीतरी घेऊन ये. एखाद टॉय आण. आणि त्याची टॉय ठरलेली असायची, कधी विमान, कधी बोट कधी, बंदूक. मुलांकडून पुन्हा दम यायचा त्याला अशा सवयी लावू नका. मध्यंतरी दहा-बारा दिवसांनी पुन्हा मुलाकडे जाताना मी सहज विचारलं, ” काय घेऊन येऊ? ‘
तो म्हणाला ” काहीही आणू नका. फक्त तुम्ही या. तुमची वाट बघतोय” माझे आणि बायकोचे डोळे पाणवले त्याच्यातला हा बदल सुखावत होताच पण मनाला एक वेगळा आनंद देऊन गेला. मध्यंतरी माझ्या व्याहांचा 70 वा वाढदिवस होता. घरातली सगळी मंडळी हॉटेलमध्ये जेवायला गेली. मी नाही जाऊ शकलो. माझ्या नातवाने आई-बाबांना भंडावून सोडलं की आबा आणि आजी का नाही आले ?आणि मला भेटल्यानंतर तो म्हणाला, “मी ती पार्टी एन्जॉय नाही करू शकलो कारण तुम्ही दोघेजण नव्हता. ” त्याची एक, दोन मिनिटांची मिठी बरंच काही सांगून जाते. त्या मिठीची उब अचानक अंगावर प्रेमाची वीज पडल्यासारखी वाटते. अंग मोहरून जात. कधीतरी तो माझ्याकडे हट्ट करतो, ” आबा क्रिकेट खेळायला चला किंवा मला बोलिंग टाका. किंवा मी सायकल चालवतोय चला ना खाली चला चला ” या क्षणी त्याच्या मागे मला पळणे शक्य नाही. मन पळायला तयार आहे पण शरीर परवानगी देत नाही. मी त्याला समजून सांगण्याचा एकदा प्रयत्न केला तेव्हा अत्यंत निरागसपणे तो मला म्हणाला, “आबा तू कधी बरा होणार?. लवकर हो. ह्या वाक्याने मनात निर्माण झालेला भावना कल्लोळ यांचे वर्णन मी नाही शब्दात करू *शकत. मी त्याला म्हणालो” अरे लवकरच बरा होईन.. मग आपण क्रिकेट खेळू. सायकल चालवू सगळं करू ” आणि मग आकाशाकडे पाहत परमेश्वराला म्हटलं “अरे माझ्यासाठी जाऊ देत नातवासाठी तरी तथास्तु म्हण. निदान हे नवं बालपण तरी मला पुन्हा नीट उपभोगून दे”
☆
लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈