श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
वाचताना वेचलेले
☆ मी मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या – भाग-2 – प्रज्ञावंत देवळेकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
(त्यांनी धरणाच्या भिंतीजवळ विहिरीसदृश्य गोलाकार संरचना केली आणि त्यांना स्वयंचलित दरवाज्यांशी जोडलं आणि दरवाजे धरणाच्या भितींच्या आत बसवले..)
इथून पुढे —-
यातल्या १७१ दरवाज्यांपैकी ४८ लोखंडी दरवाजे भद्रावतीच्या पोलाद कारखान्यात बनवले होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रत्येक दरवाज्यावर दहा टनांचा भार असूनही ते स्वत: वर खाली होऊ शकत होते..
जेव्हा जलाशयात पाण्याची पातळी वाढायची, तेव्हा पाणी विहिरीत पडायचं, ज्यामुळं विहिरीची पातळी वाढून स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडून जायचे आणि अतिरिक्त पाणी निघून जायचं अन् विहिरीची पातळी जशी कमी व्हायची तसे दरवाजे आपोआप बंद होऊन पाण्याचा प्रवाह थांबत होता..
संपूर्ण जगभरात असं अभिनव तंत्र पहिल्यांदाच वापरलं जात होतं. याची नंतर युरोपासह इतर अन्य देशात काॅपी झाली..
‘ धरणाची उंची न वाढवता त्याची जलक्षमता वाढवणं ’ ही कल्पना कुणाच्या स्वप्नात देखील आली नसेल पण विश्वेश्वरैय्यांनी ते करून दाखवलं– ते ही इथं पुण्यातल्या खडकवासल्यात..
‘मुठा’ नदीच्या पुराला नियंत्रित करण्यासाठी त्यांनी खडकवासला धरणावर पहिल्यांदाच स्वयंचलित दरवाज्यांचा प्रयोग केला होता..या प्रयोगाचं त्यांनी पेटंटही घेतलं होतं..
धरण निर्मितीसोबतच विश्वेश्वरैय्यांनी देशाच्या औद्योगिक विकासातही भरीव असं योगदान दिलं..
धरण आलं तशी वीज आली– आणि जशी वीज आली तसे उद्योगधंदे बहरू लागले..
औद्योगिकीकरणाचे खंदे समर्थक असल्यानं त्यांनी बंगलोर इथं “ भारतीय विज्ञान संस्थान “ या ठिकाणी धातूकाम विभाग–वैमानिकी–औद्योगिक वहन आणि अभियांत्रिकी, अश्या अनेक विभागांची पायाभरणी केली..
औद्योगिकीकरणास त्यांचा फक्त ढोबळ पाठिंबा नव्हता. यामागं देशांतर्गत अशिक्षितपणा-गरीबी-बेरोजगारी-अनारोग्य याबाबत मूलभूत असं चिंतन होतं..
उद्याेगधंद्यांचा अभाव–सिंचनासाठी मान्सूनवरची अवलंबिता–पारंपरिक कृषी पद्धती–प्रयोगांची कमतरता– यामुळं विकासात येणारा अडथळा रोखण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम करत आपल्या कार्यकाळात म्हैसूर राज्यातल्या शाळांची संख्या ४५०० वरून १०,५०० पर्यंत नेली. फलस्वरुप विद्यार्थ्यांची संख्या १,४०,००० वरून ३,६६,००० पर्यंत वाढली..
मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहासोबतच पहिलं फर्स्ट ग्रेड काॅलेज सुरू करण्याचं श्रेयही त्यांचंच..
सोबत म्हैसूर विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता..
हुशार मुलांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, शेतकी–अभियांत्रिकी–औद्योगिक प्रशिक्षणासाठी महाविद्यालये, यासाठी त्यांनी दूरगामी नियोजन केलं..
“ उद्योगंधदे म्हणजे देशाची जीवनरेखा “ असं मानत त्यांनी रेशम-चंदन-धातू-स्टील– अश्या उद्योगांना जर्मन आणि इटालियन तंत्रज्ञांच्या मदतीनं विकसित केलं..
त्यांची धडपड आणि आशावाद निव्वळ स्वप्नाळू होता असं नाही. तर ‘फंड’ हे वास्तव ध्यानात घेऊन त्यांनी बॅंक ऑफ म्हैसूरची मुहूर्तमेढ रोवली..
तब्बल ४४ वर्षे सक्रिय सेवा देऊन १९१८साली विश्वेश्वरैय्या लौकिकार्थानं निवृत्त झाले, तरी त्यांनी समाजजीवनातलं आपलं काम सोडलं नाही. किंबहुना अडीअडचणीला भारतीय अभियंत्यांना प्रशिक्षित करून अनेक बंद पडलेली कामं मार्गी लावली..
म्हैसूरमध्ये ऑटोमोबाईल आणि एअरक्राफ्ट फॅक्टरीचं स्वप्न बघत त्यांनी एचएएल आणि प्रिमिअर ऑटोमोबाईलचं बीज पेरलं आणि निवृत्तीनंतरही बख्खळ काम करून ठेवलं..
आपल्या आयुष्यात असंख्य बहुमानांनी सन्मानित झालेल्या त्यांना १९५५ साली वयाच्या ९५व्या वर्षी जेव्हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ जाहीर झाला तेव्हा त्यांनी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंना एक पत्र लिहिलं,– ” मला या उपाधीनं सन्मानित केलं म्हणून मी तुमचं कौतुक करेन अशी अपेक्षा तुम्ही बाळगलीत, तर तुमच्या पदरी निराशा पडेल..मी सत्यांच्या मुळाशी जाणारा माणूस आहे ”
नेहरूंनी त्यांच्या या पत्राची प्रशंसा करत त्यांना “ राष्ट्रीय घडामोडींवर बोलणं–शासकीय धोरणांवर टीका करण्याचं स्वातंत्र्य नेहमी अबाधित असेल..पुरस्कृत करणं म्हणजे शांत बसवणं नव्हे ”—
असं उत्तर दिलं..
वयाची शंभरी उलटल्यानंतरही विश्वेशरैय्या कार्यमग्न राहिले आणि १४ एप्रिल १९६२ या दिवशी रुढार्थानं हे जग कायमचे सोडून गेले असले, तरी इतिहासात त्यांचं नाव कायमचं कोरलं गेलं..
विश्वेश्वरैय्या हे ना जन्मानं महान होते,ना त्यांना कुठला दैदिप्यमान वारसा होता,ना हे महात्म्य त्यांचावर कुणी थोपवलं होतं..
कठीण परिश्रम–ज्ञानपिपासु वृत्ती–अथक प्रयत्न–समाजाभिमुख वर्तन,- यामुळं त्यांना हे ‘महात्म्य’ प्राप्त झालं होतं..
प्रचंड बुद्धिमान अभियंता आणि तितकेच कुशल प्रशासक असणाऱ्या विश्वेश्वरैय्यांचा जन्मदिन..
त्यांच्या सन्मानार्थ “ अभियंता दिन “ म्हणूनही साजरा केला जातो..
या ऋषितुल्य व्यक्तित्वाला विनम्र अभिवादन
समाप्त
— प्रज्ञावंत देवळेकर
संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर
मो. 9822363911
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈