📖 वाचताना वेचलेले 📖
☆ महिला मुक्ती… कवी : श्री अनिल दाणी ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆
☆
चिरायू होवो जागतिक महिला दिन !
पण खेदाने म्हणावे लागते
महिला मुक्तीचं शिखर अजून खूप दूर आहे.
त्याची वाट काटेरी व बिकट आहे
आजही संस्कृती रक्षकांच्या गराड्यात सापडलेली
धर्म, रुढी, परंपरेने ग्रासलेली
समाज बंधनात अडकलेली
गर्भलिंगचिकित्सेमध्ये मुलगी असल्याचे निष्पन्न झाल्यास भ्रूणहत्येचा बळी ठरलेली ती
मुलगी झाली म्हणून जाचाला, त्रासाला सामोरी जाणारी अभागी माता ती
स्त्री म्हणून जन्मापासून दुय्यम स्थानाचा शाप लाभलेली ती
तारुण्यात पदार्पण करताच
चहू बाजूने तिच्यावर पडणारी
कामांधांची वखवखलेली नजर
त्यामुळे ओशाळं झालेलं तिचं मन, शरीर
दोन चिमुरड्यांवर शाळेत शिपायांकडून झालेले अमानुष अत्याचार
एस टी बसमध्ये नराधमाने केलेला बलात्कार
तिने आरडाओरडा केला नाही म्हणून तो सहमतीने केलेला संभोग होता,
असा वकिलाने कोर्टात केलेला उद्वेगजनक युक्तिवाद
मंत्र्याने त्याला केलेलं पूरक विधान
19 वर्षाच्या तरुणाने 35 वर्षाच्या महिलेवर केलेला अत्याचार
व चाकूने तिच्या शरीरावर केलेले अमानुष वार
रेल्वे स्थानकात, एकांतात केले जाणारे सामुहिक बलात्कार
म्हातारपणी पंधरा वर्षाच्या नातीचा सांभाळ करणे पुढे शक्य नाही म्हणून नात्यातील तिच्यापेक्षा वयाने खूप मोठ्या व्यक्तीशी लावून दिलेलं लग्न व दोन लाखात केलेली तिची विक्री
कधी वडिलांच्या, आप्तेष्टांच्या वासनेची झालेली बळी
स्त्री म्हणून विविध स्तरांवर होणारी तिची मानसिक गळचेपी
यावर मलमपट्टी करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जाणारा महिलादिन !
म्हणून मनात आलेले हे विद्रोही विचार
या दिवशी तिला, दिल्या गेलेल्या फुलांच्या पाकळ्यांनादेखील काटे असल्याची भीती वाटते, दडलेला कामवासनेचा दुर्गंध येतो.
तिच्या अमानुष अंधाराचे जाळे लवकर नष्ट व्हावे व तिला निर्भयतेने व्यापलेले मोकळे आकाश मिळावे ही शुभेच्छा !
☆
कवी: श्री. अनिल दाणी
प्रस्तुती: श्री. मिलिंद जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈