सुश्री उषा जनार्दन ढगे
वाचताना वेचलेले
☆ तो आणि तो… सुश्री वंदना चिटनविस ☆ प्रस्तुती – सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
लग्न गाठीच नव्हे तर माणसा माणसातल्या सगळ्याच गाठी कुठल्यातरी अद्भुत शक्तीनुसार पडतात कि काय अस झाल खर. नाझ फाऊंडेशन च्या दिल्ली हायकोर्टा समोरच्या याचिकेत, २-७-२००९ च्या मा. न्यायमूर्ती अजीत शहांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंत ‘ त्या दोघांचं’, ‘त्या दोघींच’, ‘त्यांच’,’त्यांच’ आणि ‘त्यांच ‘ जग कस ढवळून समाजासमोर आल. त्यांचा एक समूह(LGBTQ) म्हणून विचार व्हायला लागला. जणू काही मानवाची नवी प्रजातीच भारतात नव्यान सापडल्यासारख झाल. समलिंगी, तृतीय पंथी, , उभयपंथी , लिंगभेदाच्या पलीकडचे, अलैंगिक , बृहद्लैंगिक , स्त्रीपुरूष या दोन्ही जाणीवांची सरमिसळ झालेले , विरूद्धलिंगी वेशभूषा करू इच्छिणारे, ज्यांची लैंगिक ओळख काळानुसार बदलते असे, ,अशा एकूण , सामान्यांपेक्षा वेगळ्या , बावीस लैंगिक ओळखी आहेत हे कळल. त्या प्रकरणातला अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या ६-९- २०१८ च्या न्यायनिर्णयानंतर भारतीय घटनेच्या कलम १४१ /१४२ प्रमाणे ‘कायदा’ झाला आणि तेव्हा पासून कलम ३७७ भा.दं.वि . अंतर्गत समलिंगी संबंध हा आता भारतात गुन्हा नाही
तोपर्यंत ही, स्त्री चा मासीक धर्म, कुमारीमाता, विधवांच शोषण, तरूणांचे विवाह पूर्व संबंध, यासारखी न बोलायची गोष्ट होती. म्हणजे अगदि , ” हालचाल करत नाहीये,डोळे मिटून निपचित पडला आहे,प्रतिसाद देत नाही” अशा त्या पोपटासारखी. दिसतय पण ‘मेला’ म्हणायच नाही.
फार पूर्वी फडक्यांची ‘मन शुद्ध तुझ’ वाचल्याच आठवत होत. ‘बेगम बर्वे ‘ पाहिल होत. ‘ त्यांच्या’ रॅलीजचे चित्रविचित्र फोटो अगदि अदभुत काही तरी पाहिल्या सारखे पहायचे. रेल्वेत,ट्रॅफिकला कोणी कानाशी टाळ्या वाजवल्या तर एकतर घाबरून जायचं, नाहीतर ते नकोस वाटायच हे सार्वत्रिक. काही हिंदी सिनेमात बटबटीत व्यक्ती रेखा त्याही आधी यायला लागल्या होत्या. प्रादेशिक चित्रपटात संवेदनपूर्ण चित्रणहि आली. मराठीत ‘जोगवा’ , बंगालीत ‘नगरधन’ ही चटकन् आठवणारी उदाहरण. दीपा मेहतांचा ‘फायर’ वेगळ्याच कारणांसाठी गाजला आणि त्यामुळे तेव्हा पहायला मिळाला नाही. आश्चर्य वाटल जेव्हा, सख्त सेन्साॅरशिप असलेल्या पाकिस्तानचा ‘ बोल ‘ चित्रपट पाह्यला होता. धाडसीच होता. मनात उत्सुकता भरभरून. तरी पण ‘ तो’ विषय नकोच. असं. बर्याच पुरोगामी ‘रिपोर्ताज’ पद्धतीने लेखन करणार्या पत्रकार लेखक मंडळी नी लिहिलेल हळूहळू बाहेर यायला लागल . शिखंडी, विष्णुचा मोहिनीअवतार, इतिहासात, जनानखान्यात नेमणूका होत असलेल्या हिजरा व्यक्ती , जोगत्ये अशा विषयावर सामाजिक , वैद्यकीय अंगाने बरच वाचायला मिळायला लागल.
मग प्रकाशातल्या व्यक्ती व्यक्त व्हायला लागल्या. त्यातून कलावंत, पत्रकार, मोठी घराणी , राजेरजवाडे, बुद्धी जीवी घरातल्या व्यक्ती, अभिनेते, लेखक अशा अनेक स्तरातील अभिव्यक्ती कळायला लागली. त्यांच साध म्हणण होत ,”आम्ही असेच आहेत, वेगळे असू पण अनैसर्गिक नाही. दोषी नाही. रंग, रूप, पालक, जात , जन्माने लाभते,तसच हे. आम्हाला तुमच्यासारखच निवडीच स्वातंत्र्य नव्हत. आम्हाला वगळू नका, तिरस्कार करू नका.”
आपल उच्च आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय जगही बोलक व्हायला लागल. चक्क टी.व्ही वर मुलाखती दिसायला लागल्या. स्टॅडअप काॅमेडियन यावर विनोद करायला लागले, त्यावर श्रोतेहि हसायला शिकले. रोस्ट्स व्हायला लागले. हे एक वेगळ्या पद्धतीच , वेगळ्या संवेदनांच, प्रामूख्याने शारिरीक शोषणावर उभ असलेलं , तिरस्कारान भरलेल , बहुतेकवेळी पालकांनीच नाकारलेल , क्वचित डोळसपणे स्वीकारलेल अशाअनेक आयुष्यांचं ,मनाचं,भावनांचं प्रतिबिंब ,साहित्यात, समाजात, दृकश्राव्य माध्यमात स्पष्ट दिसायला लागल. जणू आतापर्यंत त्यांना फक्त देहच होते. उच्चशिक्षित , प्राचार्य पदावर गेलेल्या व्यथित व्यक्तीच निवेदन वाचण्यात आल.पोलीस खात्यात नेमणुका झाल्याची उदाहरणं दिसायला लागली. दुःखाला वाचा फोडणारी व या चळवळीतील कार्यकर्त्यांची आत्मचरित्र वाचताना मती गुंग झाली. हे काय, कसल्या पातळीवरच दुःख असेल? कस सोसत असतील ती घुसमट?अस वाटायला लागल. विषय, मध्यमवर्गाच्या बंद दारातून आत आला. मधेच यासंदर्भात एड्सची भीतीपण दाखवली गेली. कुणी त्यांना ‘सैतानाची मुल ‘असहि संबोधलं. ‘पैसे काय मागतात, धडधाकट तर असतात.’ अशी एक खुसपुस पुढे आली. पण अलिकडे तर यांच्यासाठी नोकर्यात आरक्षण, काॅर्पोरेट जगताची जबाबदारी, उद्योजक स्वयंनिर्भरता यांची पण चर्चा चालू झालीय. स्कूटरवर असताना चौकात थांबल्यावर कानाशी टाळी वाजवणारी दीपा( ही रोज वेगळ नाव सांगते) आता मला घाबरवत नाही. चहासाठी 10 रूपये मागते आणि दिले तर “थॅन्क्यू काकू” म्हणते. बघणारे पोलीस पण हसून तिला घालवतात. मनाची दारं थोडी किलकिली झाली आहेत ती पूर्ण पणे उघडायला हवी .थोडा वेळ लागेलच. सवय ही काही लवकर लागत नाही. पिढ्यानपिढ्याचा सामाजिक, वैचारिक गोंधळ निस्तरायचा आहे. एकेकाळच्या बहिष्कृतांना सामावून घ्यायची आपल्या सर्वांवर जबाबदारी आली आहे . नियतीच्या हातून तुटलय पण आपण सांधायला हवच. होईल .होण अटळ आहे. संधिप्रकाश संपून उजाडेल. उम्मीदपे दुनिया कायम है |
– सुश्री वंदना चिटनविस, नागपूर.
संग्रहिका – सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈