श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

श्रीसमर्थ रामदास स्वामीकृत – ॥ 🥭 आंबा 🥭॥ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

ऐका ऐका थांबा थांबा ।

कोण फळ म्हणविले बा ।

सकळां फळांमध्ये आंबा ।

मोठे फळ ॥१॥

 

त्याचा स्वाद अनुमानेना ।

रंग रुप हे कळेना ।

भूमंडळी आंबे नाना ।

नाना ठायी ॥२॥

 

मावे हिरवे सिंधुरवर्ण ।

गुलाली काळे गौरवर्ण ।

जांभळे ढवळे रे नाना जाण ।

पिवळे आंबे ॥३॥

 

आंबे एकरंगी दुरंगी ।

पाहो जातां नाना रंगी ।

अंतरंगी बाह्यरंगी ।

वेगळाले ॥४॥

 

आंबे वाटोळे लांबोळे ।

चापट कळकुंबे सरळे ।

भरीव नवनीताचे गोळे ।

ऐसे मऊ ॥५॥

 

नाना फळांची गोडी ते ।

आंब्यामध्ये आढळते ।

सेपे कोथिंबिरी वासाचे ।

नानापरी ॥६॥

 

आंबे वाकडेतिकडे ।

खर्बड नाकाडे लंगडे ।

केळे कुहिरे तुरजे इडे ।

बाह्याकार ॥७॥

 

कोयी लहान दाणे मोठे ।

मगज अमृताचे साटे ।

हाती घेतां सुख वाटे ।

वास येतां ॥८॥

 

सोफ सालीहि असेना ।

नासक वीटक दिसेना ।

टाकावे वस्त्रावरी नाना ।

कोरडे आंबे ॥९॥

 

एक आंबा वाटी भरे ।

नुस्ते रसामध्ये गरे ।

आतां श्रमचि उतरे ।

संसारीचा ॥१०॥

 

आंबा तणगाऊ नासेना ।

रंग विरंग दिसेना ।

सुकतां गोडी हि सांडिना ।

कांही केल्या ॥११॥

 

भूमंडळी आंबे पूर्ण ।

खाऊन पाहतो तो कोण ।

भोक्ता जगदीश आपण ।

सकळां ठायी ॥१२॥

 

नाना वर्ण नाना स्वाद ।

नाना स्वादांमध्ये भेद ।

नाना सुवासे आनंद ।

होत आहे ॥१३॥

 

आंबे लावावे लाटावे ।

आंबे वाटावे लुटावे ।

आंबे वांटितां सुटावे ।

कोणातरी ॥१४॥

 

नाही जळ तेथे जळ ।

कां ते उदंड आम्रफळ ।

परोपकाराचे केवळ ।

मोठे पुण्य ॥१५॥

 

पुण्य करावे करवावे ।

ज्ञान धरावे धरवावे ।

स्वये तरावे तरवावे ।

एकमेकां ॥१६॥

 

मी तो बोलिलो स्वभावे ।

यांत मानेल तितुके घ्यावे ।

कांही सार्थक करावे ।

संसाराचे ॥१७॥

 

दास म्हणे परोपरी ।

शब्दापरीस करणी बरी ।

जिणे थोडे ये संसारी ।

दो दिसांचे ॥१८॥

– श्री समर्थ रामदास स्वामी

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments