सुश्री सुनिता गद्रे
वाचताना वेचलेले
☆ ऋतू गाभुळताना.…– अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री सुनिता गद्रे ☆
ऋतु गाभुळताना…
झोपता झोपता दुरदर्शन बातमी देतं..मान्सून एक जुनपर्यंत केरळ मध्ये दाखल होणार..
मार्च,एप्रिल..२४तासएसी,कुलर,पंख्यालाआचवलेलं शरीर..पहाटे पहाटे पायाशी असलेलं पातळ चादर बेडशीट, साखरझोपेत कधीतरी अंगावर ओढून घेतं…समजावं तेंव्हा ऋतु गाभुळतोय.
ऐटीत झाडावरुन मोहीत करणारे.बहावा,पलाश,गुलमोहर…वार्याच्या खोडसाळपणाने पायाशी पायघड्या पसरवू लागतात.झाडावरचं कै-यांचं गोकुळ रिकामं होउन गेलेलं असतं,एखादा झाडावरच पिकलेला आंबा,खाली पडून केशर कोयसांडतो.जांभुळ,करवंदाचा काळा,जांभळा रंग जमिनी रंगवू लागतो…तेंव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.
आईआजीची लोणच्या,
साखरंब्याची घाई,कोठीत धान्यं भरुन जागेवर ठेवायची लगबग,गच्ची गॅलरीत निवांत पहुडलेली चीजवस्तूआडोश्याच्या जागी हलवायची बाबा आजोबांची गडबड…समजावं ऋतु गाभुळतोय.
ताटातला आमरस सर्रासपणे गोडच लागतो..साखरेची गोडी त्याला आता नकोशी होते.उरलेल्या पापडकुर्डया आता हवाबंद डब्यात जाउन बसतात,डाळपन्हं,आईस्क्रीम, सरबतं,सवयीची होत जातात.माठातल्या पाण्यात एखादी भर आताशी कमीच पडते.तेंव्हा खुशाल समजावं
ऋतु गाभुळतोय.
दुर्वास ऋषी च्या अविर्भावात आग ओकरणारा रवी..काळ्या पांढऱ्या ढगांशी सलगी करु पाहतो,मेघनभात अडकलेली किरणं सोडवता सोडवता…असाच दमुन जातो.भास्कराचा धाक कमी झाल्याचं पाहुन वारा ही उधळतो.गच्ची,दोरीवरच्या कपडे,गाद्यांवर आता लक्ष ठेवावं लागतं..तेंव्हा खुशाल समजावं..ऋतु गाभुळतोय.
निरभ्र वाटणारं आकाश क्षणात आभाळ होऊन जातं,उनसावलीच्या खेळात चराचर सावळं होतं ,वीज,गडगडाटानं.. रसपोळीनं सुस्तावलेली दुपार..धावपळीची होते.
झाडांवरच्या पक्षांची किलबिल.. किलबिल न राहता नव्या स्थलांतराची भाषा बोलू लागते..उफाळत्या जमीनीत नांगर फिरु लागतात.
मोगऱ्याचे ताटवे विरळ होऊ लागतात,मृदगंधाचे वास श्वासात विसावून जातात.. खुशाल समजावं तेंव्हा..ऋतु गाभुळतोय.
उंबर्यावर आलेल्या त्या वर्षेला भेटण्यासाठी देहमनाने आपण ही आतुरतो….तेंव्हा अगदी खुशाल समजावं…ऋतु गाभुळतोय……
– अनामिक
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈