? वाचताना वेचलेले ??‍?

☆ “देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार”… सुमित्र माडगूळकर ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

डिसेंबर १९७७…. कोयना एक्सप्रेस धडधडत निघाली होती …

गीतरामायणाचे जनक सीताकांत लाड खिडकीतून बाहेर पाहत होते…. अनेक आठवणी मनात दाटून आल्या होत्या. पंचवटीच्या प्रांगणातील आठवणींनी मन भरून येत होते …गीतरामायणाचे ते भारलेले दिवस..लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद…रेकॉर्डिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत गदिमांकडून गीत मिळवण्यासाठी झालेली धावपळ.. पंचवटीच्या दारात प्रभाकर जोगांना पाहून “आला रे आला ,रामाचा दूत आला.. आता गाणं घेतल्याशिवाय तो काही जाणार नाही..” असे ओरडणारे गदिमा. 

त्यांच्या समोर हसत खिदळत बागडणारे … गीतांचा तगादा लावल्यावर गदिमांच्यातले लहान मूल म्हणत होते…. 

” गीताकांत स. पाड ,पिडाकांत ग. माड …नाही कशाचीच चाड, मी ही भारलेले झाड…मी ही भारलेले झाड…. “

आपल्या लाडक्या मित्राला शेवटचा निरोप देऊन दोन मित्र सीताकांत लाड व गदिमांचा ‘नेम्या’ (नेमिनाथ उपाध्ये) परतीच्या प्रवासाला निघाले होते.. गदिमांबरोबर लहानपणापासून असलेल्या  ‘नेम्या’ ला प्रत्येक स्टेशनावर आपल्या अण्णाच्याच आठवणी येत होत्या.. रात्री अपरात्री किर्लोस्करवाडीला उतरल्यावर तीन मैल चालत कुंडलचे प्रवास … गारठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीत उबेसाठी स्मशानात घालवलेल्या त्या भयानक रात्री … तेथे केलेले मुक्काम… शंकराच्या भूमीत गदिमांनी धडाधडा केलेले ‘शिवलीलामृताचे’ प्रवचन.. अगदी आठवणींच्या आधी जाते जिथे मनाचे निळे पाखरु- क्षणार्धात गतस्मृतीत भरारी घेत होते.

‘मिरज’ स्टेशनच्या आधी लांबून काही अस्पष्ट स्वर येते होते… कोणीतरी गात होते …. एकदम खड्या आवाजात…

“उद्धवा अजब तुझे सरकार…. “

एक आंधळा भिकारी गात गात पुढे सरकत होता .. 

गाडीच्या कम्पार्टमेन्टमधे काही कॉलेजियन्सचा ग्रुप रमी खेळत बसला होता … बोचऱ्या थंडीला ‘बुढा मर्कट’ ब्रँडची साथ होतीच… मैफल रंगात आली होती. 

त्यांच्यापैकीच एकजण ओरडला “अरे साल्यांनो,गदिमा सुरु झालाय ! ऐका की !”

या आवाजाने अर्धवट झोपेत असलेला कोपऱ्यातला घोंगडी पांघरून बसलेला म्हाताराही कान टवकारून उठून बसला… 

भिकाऱ्याने खड्या आवाजात परत सुरुवात केली… 

” झाला महार पंढरीनाथ “… 

“एक धागा सुखाचा” …” इंद्रायणी काठी” … भिकारी गात होता …

नेम्या व लाड खिडकीजवळील आपल्या जागेवरून आनंद घेत होते.. पल्लेदार आवाज.. त्यात काहीसे उच्चार दोष. … शब्द – ओळी वरखाली झालेल्या .. 

पण आधीच ‘रम’लेली मंडळी अजून गाण्यात रमून गेली होती.. 

त्या युवकांपैकीच कोणीतरी फर्माइश केली “म्हण .. आणखी म्हण … पण फक्त गदिमांच हं !” 

भिकारी म्हणाला ” त्यांचीच म्हणतो मी साहेब,दुसरी नाही. या लाइनीवर खूप खपतात .. कमाई चांगली होते.. त्यांना काय ठावं, त्यांच्या गीतांवर आम्ही कमाई करतो म्हणून .. “

गरीब भिकाऱ्याचा स्वर थोडा हलल्यासारखा वाटला….आवंढा गिळून भिकारी म्हणाला….

” ते गेले तेव्हा दोन दिवस भीक नाही मागितली साहेब !… ” 

या आंधळ्या गरिबाला कोठून कळले असावे आपला अन्नदाता गेला-रेडिओवरून ?,गदिमा गेले तेव्हा महाराष्ट्रात अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नव्हत्या .सगळेच शांत होते,डब्यातल्या सगळ्यांनी आपापल्या परीने त्याचा खिसा भरला… तो पुढे सरकत होता… 

गदिमांचा तो आंधळा भक्त गातच होता..

तूच घडविसी, तूच फोडिसी, 

कुरवाळिसी तू तूच ताडीसी

न कळे यातून काय जोडीसी

देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार 

विठ्ठला, तू वेडा कुंभार….

हळू हळू त्याचा आवाज परत अस्पष्ट होत गेला.. कोयना एक्सप्रेसची धडधड परत वाढत गेली.. तरुण मंडळी परत आपल्या कामात ‘रम’माण झाली.

म्हटले तर काहीच घडले नव्हते … म्हंटले तर खूप काही घडून गेले होते… 

एका महाकवीच्या हृदयाची स्पंदने …. एका भिकाऱ्याच्या हृदयाची स्पंदने… जणू काही फरक राहिलाच नव्हता… काही दिवसांपूर्वी अनंतात विलीन झालेले ते कोण होते?.. 

सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हृदयात स्थान मिळवणारा असा महाकवी आता परत होणार नव्हता…

 – सुमित्र माडगूळकर 

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments