वाचताना वेचलेले
☆ सावित्रीही बदलते आहे… श्री सतीश मोघे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆
सावित्रीही बदलते आहे…
(कुपी अत्तरी)
दिनू त्याच्या ८६ वर्षाच्या आईकडे पाहून हसत म्हणाला, “आता पुरे वटसावित्रीचा उपवास..
केलास आता इतकी वर्षे..आणि खरच बाबा तुला सात जन्म हवे आहेत का? “
“ त्यांना माझ्याविषयी काही वाटत नाही..हे ठाऊक आहे मला..पण घेतला वसा टाकायचा नाही. इतकी वर्षे पूजा..उपवास केला वटसावित्रीचा..उद्याही करणार “ …आई काहीशा तटस्थ निश्चयी स्वरात उत्तरली..
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहतो तो काय? आई सर्व आटोपून एका कागदावर हिरव्या स्केच पेनने वडाचं झाड काढून पूजा करत बसलेली..दिनूला कौतुकमिश्रित आश्चर्य वाटले…
अजूनही बिछान्यावर असलेल्या आपल्या सावित्रीला हलकेच जागे करून त्याने ती बातमी दिली. सावित्री म्हणाली,
“ मीही करणार आहे पूजा..मागणार आहे तुलाच सात जन्म..पण देवाला काही अटी..पण.. परंतू घालणार आहे..’
दिनूने विचारलं ‘कोणते पण?’ तशी तिने कविताच त्याच्यासमोर सारली.. म्हणाली ‘ तुला कवितेतलं चटकन कळतं,म्हणून रात्री जागून केली आहे..फार यमक..मीटर पाहू नकोस…भावार्थ समजून घे..आणि पटतं आहे का सांग. पटलं तरच आज पूजा आणि उपवास…”
दिनूने कविता वाचली मात्र..त्याच्या लक्षात आलं..सावित्री बदलते आहे…किमान आता वेदना ..अपेक्षा व्यक्त तरी करायला लागली आहे..
तो म्हणाला,
“ मी तुला समजून घेईन…. सात जन्मीची साथ सखये कुणी पाहिली..
याच जन्मी सुख सारे सारे देईन तुजला….”
हे दिनूकडून ऐकलं मात्र.. दिनूची सावित्री आन्हिक वगैरे आटोपून पूजेला बसली..हाच दिनू सात जन्म मिळावा म्हणून…
(कुपी अत्तरी)
आपणही सावित्रीची ही कविता वाचू या…
वटपौर्णिमा…
देवासमोर ठेवणार
काही माझे ‘पण’
करून वडाची पूजा
साजरा करेन मी सण
एक साकडं त्याला
आहे मी घालणार
‘रोल’ आमचा बदल
आहे मी सांगणार
प्रार्थना करणार आहे
अशी विलक्षण
करून वडाची पूजा
साजरा करेन मी सण
देवाला सांगणार
जोडी हीच राहू दे
कर त्याला स्त्री नी
पुरुष मला होउ दे
मलाही करायची आहे
थोडी तणतण
करून वडाची पूजा
साजरा करेन मी सण
मला कर राजा नी
त्याला कर राणी
येउ दे थोडेसे
त्याच्या डोळा पाणी
ह्यालाही भासुदे
माहेराची चणचण
करून वडाची पूजा
साजरा करेन मी सण
येऊ दे ह्याला पाळी
न पोट ह्याचं दुखु दे
झोपून राहावंसं वाटतं
ह्याला थोडे कळू दे
पाय किती दुखतात
नि तापासारखी कणकण
करून वडाची पूजा
साजरा करेन मी सण
नऊ महिने एक बाळ
याच्या पोटात येऊ दे
नाकी नऊ कशी येते
ह्यालाही ते कळू दे
नाही वैतागला गडी
तर हरेल मी काय पण
करून वडाची पूजा
साजरा करेन मी सण
कळेल याला का येतो
स्वयंपाकाचा कंटाळा
हजारो वेळा ती चिकट
कणिक सारखी मळा
नको वाटेल त्याला ती
भांड्यांची खणखण
करुन वडाची पूजा
साजरा करेन मी सण
होईन मी जावई
माझा मग थाट
सून झाल्यावर ह्याची
लागेल पुरती वाट
थांबणार नाही सासरी
मग हा एकही क्षण
करून वडाची पूजा
साजरा करेन मी सण
रात्री बेरात्री मी
खुशाल बाहेर पडेल
सातच्या आत घरात
यायचं याला म्हणेल
पेटून उठेल ह्याच्या
रक्ताचा कणनकण
करुन वडाची पूजा
साजरा करेन मी सण
माझा रोल प्ले केला
की समजेल माझं दुःख
समजून घेईल मग मला
मिळेल थोडे सुख
साता जन्माची ती सारी
थांबून जाईल वणवण
करुन वडाची पूजा
साजरा करेन मी सण
………आपणही सांगू या आपल्या सावित्रीला..’मी समजून घेईन तुला आणि देईल सुखाला.. फक्त role तेवढा नको बदलू या..please..
(वरील कविता सौ. सविता सतीश मोघे यांची आहे…इतर पात्र काल्पनिक 😊)
…सतीश मोघे
(कुपी अत्तरी)
संग्राहिका : बिल्वा अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈