श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ समिधा..!! 🔥 ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एका वळणावर दोन गुरुजी स्कूटरवरून माझ्या शेजारून गेले. तर… त्यातले एक गुरुजी दुसऱ्या गुरुजींना म्हणत होते, “अरे समिधांची काय एव्हढी काळजी करतोस? त्यांचं काम फक्त अग्नीला अर्पण केलेल्या वस्तू अग्नीपर्यंत पोचवायचं…!”

बस्स एवढंच? 

ह्या पलीकडे त्या ‘समिधां’च्या जळून जाण्याला काहीच महत्व नाही ? 

खरं तर ह्या अशा अनेक ‘समिधा’ आहेत ज्यांनी मूकपणे जळून जाऊन अनेक यज्ञ यशस्वी केलेत —-!

विचारांच्या वावटळीवर स्वार होऊन मन प्रवासाला निघालं—-

पहिलीच आठवली ती उर्मिला. 

लक्ष्मण तर गेला निघून भावामागून चौदा वर्षं वनवासाला… रामसीतेच्या बरोबरीनं लक्ष्मणाचं कौतुक झालं, भरताचंही झालं—- पण अयोध्येत राहूनसुद्धा चौदा वर्षं वनवास, तोही एकटीनं भोगणाऱ्या, उर्मिलेच्या आयुष्याच्या आहुतीची दखल वाल्मीकींनीही घेतली नाही—-मला नेहमी वाटतं की त्या उर्मिलेला कुणीतरी बोलतं करायला हवं. रामराज्याच्या आदर्शवादी यज्ञात ह्या एका ‘समिधेची आहुती अशीच पडून गेली.

मग आठवतात त्या… काशीबाई, सकवारबाई आणि इतर तिघी—शिवाजी महाराजांच्या आठ राण्यांपैकी तीन—

सईबाई, सोयराबाई व पुतळाबाई या आपल्याला माहीत असतात. त्यांच्याबद्दलच्या खऱ्याखोट्या गोष्टीही 

आपण ऐकलेल्या असतात—पण बाकीच्या पाच…? केवळ राजकीय कारणासाठी जिजाबाईंनी ह्या पाचजणींबरोबर महाराजांचा विवाह लावला. पण नंतर? —-‘अफझलखान येतोय,’ म्हटल्यावर ह्या पाचजणींना चिंता वाटली नसेल? आपला नवरा औरंगजेबाच्या कैदेत अडकलाय म्हटल्यावर यांचाही जीव सैरभैर झाला नसेल ? निश्चितच झाला असणार ! पण स्वराज्याच्या यज्ञात ह्या पाच ‘समिधा’ तशाच जळून गेल्या!

बहुतेक सर्व ‘समिधा’ या  स्त्रियाच ! —-

 कारण हे निमूटपणे जळून जाणं त्यांच्या अंगवळणीच पडलेलं असतं जणू! 

गोपाळराव जोशांसारखा एखादा अपवाद की आपल्या पत्नीला- आनंदीबाईला

डॉक्टर करण्यासाठी स्वतः ‘समिधा’ झाला !

काही थोड्याफार ‘समिधा, कस्तुरबा म्हणा, सावित्रीबाई फुले म्हणा—

स्वकर्तृत्वाने उजळूनही गेल्या ! पण बाकीच्या…?

टिळकांनी, सावरकरांनी मांडलेल्या स्वराज्याच्या यज्ञात पहिली आहुती सौ. टिळकांची व सौ. सावरकरांची पडली. 

या आणि अशा अनेक…!!!

विचारांच्या चक्रात घरी आलो. आमच्या घरच्या ‘समिधे’नं दार उघडलं. 

मुलाचा अभ्यास आणि नवऱ्याचं करीअर यासाठी स्वतःचं आयुष्य पूर्णपणे झोकून देणाऱ्या त्या ‘समिधे’ला पाहून 

मला एकदम भरून आलं!

घरोघरी अशा ‘समिधा’ रोज आहुती देत असतात. घर उभं करत असतात, सावरत असतात. माझं घरही याला काही अपवाद नाही.

मात्र यापुढे या ‘समिधां’ची आहुती दुर्लक्षित जाऊ न देणं गरजेचं आहे !

या नव्या कठीण काळात, सर्व आव्हानांना भिडण्याची तयारी करतांना, जी आनंदाने स्वतःची आहुती देऊन 

आपल्याला ऊर्जा देणार आहे, त्या आपल्या प्रत्येकाच्या घरच्या ‘समिधे’ला… मनापासून नमस्कार..

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments