सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ कडी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

घराची ही साधी कडी. पण काम चोख. आतला सुरक्षित आणि बाहेर गेलेल्याला घर सुरक्षित आहे याची खात्री देणारी ही कडी, खरं तर घराची देखणी नथच मानावी. ज्या घराला कडीकोयंडाच नाही ते घर सुरक्षित नाही. कडीशिवाय घर पुरं नाही. आजवर कडीकुलपांनीच स्थावर मालमत्ता सुरक्षित ठेवली. भित्र्या माणसांना कडी सुरक्षितता पोहोचवते. विशेषतः एकटी स्त्री घरात एकटी असेल तर ही कडीच तिला….. मै हुँ ना! असं बेलाशक सांगते. कडी नुसती कडी नसते तर आधारासाठी कायम खडी असते. आपली ती सुरक्षिततेची कवच कुंडल असते. अगदी रात्री घरात एकटे असू… आणि दार नुसतंच लोटलेलं असेल तर झोप लागता लागणार नाही. कडी तिचं काम फारच इमाने इतबारे करते.

मनाच्या दरवाज्यालाही अशा कड्या असाव्यात. वेळोवेळी त्या लावता याव्यात. सताड उघड्या घरात कोण कसं शिरेल आणि विध्वंस करुन जाईल याची नुसती कल्पना करा. आपण अस्वस्थ होतो.

मन जर कायम असं सताड उघडं असेल तर…. कोणीही आपल्याला गृहीत धरून कसेही आपल्याशी व्यवहार करु लागतील. त्यांना जर थोपवायचे असेल तर… मनाची कडी मजबूत असावी. कोणालाही कसेही आपल्या मनात…. जीवनात डोकावता येणार नाही. बऱ्याचदा आपण मनाची कडी लावायला विसरतो आणि मग….. अनेक घोळ होतात. कडी ही आपल्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. म्हणजे मग आपण फार कमी वेळा दुःखी होऊ. म्हणजे इतरही ठराविक अंतराने आणि अदबीने आपल्याशी वागतील.

बोलता बोलता कधी कधी आपण बेताल होतो. वाहवत जातो. पश्चाताप होतो. तोंडाला जरा कडी लावायला हवी होती हे सहज विसरून जातो.

नेमकं आणि योग्य वेळी निर्णायक बोलणारी जी माणसं असतात त्यांच्या शब्दाला सभेत… घरात… समाजात भारी किंमत असते. कोणत्या विषयाला कोठे कडी घालायची हे त्यांना पक्के ठाऊक असते.

कधी कधी नको तिथे मनाला कडी घालणारी माणसं… दुसऱ्याला कायम ताटकळत उभे ठेवतात. आपल्यासाठी जीवतोड करणाऱ्यांच्या बाबतीत ही कडी फार क्लेश देणारी ठरते. आयुष्यभर मग नाव घ्यायचं नाही असं मन ठरवून टाकतं. हे कितपत योग्य आहे.

आगरकर आणि टिळक यांनी  एकमेकांसाठी आयुष्याच्या उत्तरार्धात अशाच कड्या घातल्या. एकत्र शाळा चालवणारे.. शाळा शेणाने सारवणारे हे मित्र खूप दुरावले. शेवटच्या क्षणी मात्र न राहून टिळक आगरकरांना भेटायला गेले. डोळे भरुन एकमेकांना पाहिले. पण बोलले नाहीत. टिळक घराबाहेर पडले आणि आत आगरकरांनी जीव सोडला. टिळकांना अतिव दुःख झाले. पण…. काय उपयोग. मित्र कायमचा गेला.

आपणही जरूर कड्या लावा. पण योग्य तिथेच. नको त्या ठिकाणी लावून बसाल तर फार फार काही गमावून बसाल. योग्य ठिकाणी लावाल तर जीवन हलके कराल.

फक्त ती लावायची कुठे आणि कधी यावर जरुर विचार करा. ही विनंती  आहे.

संग्रहिका : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments