सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 20 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
२७.
प्रकाश? अरे, कुठं आहे प्रकाश?
सतत चेतलेल्या इच्छेच्या अग्नीने तो फुल्ल!
दीप आहे, पण थरथरणारी ज्योत नाही,
हे ह्रदयस्था! हे माझे दैव आहे!
तुझा दुरावा मरणप्राय वाटतो!
दु:ख तुझ्या दाराशी क्वचित येतं
त्याचा संदेश आहे, तुझा स्वामी जागा आहे.
रात्रीच्या अंधारातून
तो तुला प्रेमसंकेत देतो आहे.
आभाळ भरून आलंय,
पाऊस संततधार कोसळतोय.
माझ्या अंत: करणात कसली कालवाकालव होते
त्याचा अर्थ उमगत नाही.
क्षणात चमकून जाणारी वीज
माझ्या नजरेला अंधारी आणते.
रात्र- संगीताकडे नेणारा मार्ग
माझं काळीज शोधू लागतं.
कुठाय प्रकाश?
ज्वलंत इच्छेच्या ज्योतीनं तो चेतव.
विजांचा लखलखाट होतोय.
आकाशाच्या पोकळीतून सुसाट वारा वाहतोय.
काळ्या दगडासारखी रात्र काळीकुट्ट आहे,
अंधारातच सारी रात्र जायला नको.
प्रेमाचा दीप आयुष्य उजळू दे.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈