? वाचताना वेचलेले ?

☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 1 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

घरात पहिल्यापासून कोणताही गोडाधोडाचा म्हणा किंवा बिगर कांद्यालसणाचा स्पेशल पदार्थ असो… तो तयार झाला की, एखाद्या वाटीत घालून आज्जी म्हणायची..

“मनू… देवापुढं नैवेद्य ठेव … मग खाऊन चव सांग… कसा झालाय ते..”

तसा प्रत्यक्ष माझ्या तोंडात पहिला पदार्थ गेला असला, तरी…. देवापुढं पहिल्यांदा ठेवल्यामुळं घरातला मी second taster…पहिल्यांदा ‘देवच’…! त्यामुळे…

“पाहे प्रसादाची वाट…द्यावे धावोनिया ताट…

शेष घेउनि जाईन…तुमचें जालिया भोजन…”

—अशी जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाप्रमाणे माझी लहानपणापासून अवस्था…!

“आज्जी… तुझं काहीतरीच असतं बघ.. देव कुठं खात असतो का..?” …. असले ‘डावे’ प्रश्न सुरुवातीला विचारले… पण… माझ्या प्रश्नाला संतश्रेष्ठ नामदेवांच्या लहानपणीची कथा सांगत…… .. 

“ प्रत्यक्ष भगवंताला जेवण्याचा हट्ट करून शेवटी कंटाळून “नामदेवराय” भोवळ येऊन पडायला लागल्यावर…   मग… पांडुरंग जेवला बघ..” असे म्हणून …… 

” ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला…. नैवेद्य जेविला… नामयाचा …।” — या अभंगानंतर, ” उजव्या ” हाताने ठेव बरं…वाटी..” अशा संभाषणाने ” नामदेवरायांच्या ” कथेचा शेवट झाल्यावर मगच ” प्रसाद ” तोंडात पडायचा…!

रोजच्या देवपूजेनंतर दूधसाखरेबरोबर… कधी एखादा रवा-बेसन-लाडू, करंजी … उपवास असेल तर राजगिरा-शेंगदाण्याचा लाडू… खजूर… गूळ-खोबरं.. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून केलेलं ताजं लोणी-साखर.. एखादं केळ.. असं काहीही असायचं.

सणावाराला मात्र पक्वांनांनी भरलेलं ताट ‘नैवेद्याला’ असायचं..! पण प्रत्यक्ष देवळात… ” काय नैवेद्य असेल…?” अशी उत्सुकता बोलून दाखवल्यावर… ” आपण “महानैवेद्य” आणू बरं का.. ” असं म्हणून वडील तसा निरोप द्यायचे. 

त्यावेळच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील अनेक “बडवे-उत्पात” मंडळी चांगल्या घरोब्याची… काही जवळच्या नात्यातली असल्यानं ” महानैवेद्य ” घरी आणण्यासाठी जास्त खटाटोप करावा लागला नाही. दोनचार दिवस आधी निरोप दिला तरी ” महानैवेद्य ” घरपोच यायचा.

ज्या दिवशी ” महानैवेद्य ” घरी यायचा, त्यादिवशी स्वयंपाकघरात चहापाण्याशिवाय जास्त काही करायची गरज नसायची… एखादा भाताचा डबा लावला तरी पुष्कळ व्हायचं….! दुपारी “नैवैद्या”चं जेवणार असल्यानं… आई-आजी सकाळी… “दूध, फळं, चिवडा”… अशा कोरड्या पदार्थाशिवाय काही खाऊ द्यायची नाही. “प्रसादिक” अन्न पोटात जायच्या आधी पोटात दुसरं शिळं-पाकं अन्न असू नये हा एक प्रांजळ हेतू… “त्याला काय होतंय…?..” अशी उद्धट बोलण्याची कधी हिंमत झाली नाही.

दुपारी साधारण साडेबारा नंतर…. परातीयेवढ्या मोठ्ठया आकाराच्या लखलखीत चांदीच्या ताटावर लाल रेशमी कापड झाकून… त्यावर चांदीचं पळी-पंचपात्र अन मुखशुद्धीसाठी पानाचा विडा घेऊन… कडक सोवळ्यात “बडवे-उत्पातांच्या” परिवारातील एखादा काका-मामा ‘ते’ वजनदार ताट दोन्ही हातांनी एका खांद्यावर घेऊन..”महानैवेद्य” आणायचा. प्रथम तो “नैवेद्य” घरातील देवासमोरील पाटावर ठेवून घरच्या देवाला .. “नैवेद्यम्‌ समर्पयामि…” म्हणून पळीने पाणी फिरवून दाखवला जायचा. ‘नैवेद्य’ घेऊन येणाऱ्या व्यक्तीस त्याच्या वयाकडे न बघता त्याच्या हाती दक्षिणा देऊन घरच्या सगळ्यांनी नमस्कार करण्याचा “आज्जीचा” शिरस्ता असायचा.

त्या अवाढव्य ताटावरील कापड बाजूला सारून ते भरगच्च ताट बघण्याची उत्सुकता मोठेपणीपर्यंत तशीच कायम राहिली… कारण ते नैवेद्याचं ताट… असायचंच तेवढं… “देखणं”… आणि पाच-सात व्यक्तींना भरपेट पुरेल एवढं “पूर्णब्रह्म”…! ताटाच्या मधोमध मोठ्या चांदीच्या वाडग्यात खचाखच शिग लावून भरलेला उत्तम प्रतीच्या वासाच्या तांदळाचा भात… त्यावर नुसता पांढरा भात नसावा म्हणून शास्त्रासाठी पिवळं धम्मक डावभर वरण…त्या भाताच्या शिगेवर अस्सल लोणकढी तुपाची वाटी खोचलेली…. त्याच्या शेजारी थोड्या छोट्या वाडग्यात तसाच शिग लावलेला केशरी रंगाचा अस्सल तुपातला “साखरभात”… त्यावर मस्तपैकी काजू, बदाम, बेदाणे, लवंग, वेलदोडे अन चार दोन केशराच्या काड्यानी सजावट केलेली…! त्या भाताच्या भांड्याच्या खालच्या बाजूला घसघशीत आकाराच्या पातळ पदर सुटलेल्या… वेलदोडा.. जायफळाच्या सुवासाने मोहित करणाऱ्या पिवळसर रंगाच्या तुपाने माखलेल्या “पुरणपोळ्या”…. तशाच पातळ साध्या “पोळ्या”… त्यावर पुरणाचा गोळा.. त्या गोळ्यावर वरच्यावर पापुद्रा काढता येणाऱ्या… चवीला नकळत मिठाळ लागणाऱ्या, वरून थोडं तूप टाकलेल्या पातळ “पुऱ्या”….! त्याच्या डाव्या बाजूला एका हाताच्या ओंजळीत बसतील एवढ्या आकाराचे तुपात खरपूस भाजलेले… टाळ्याला न चिकटणारे तुपाळलेले दोन “बेसन लाडू”…!

त्या लाडवाशेजारील एका वाटीत दह्यात मीठ- साखर- लालतिखट- दाण्याचं कूट घालून कालवलेली… वरून जिरे-मोहरीची फोडणी दिलेली.. आंबट-गोड-तिखट मिश्र चवींची “शेंगादाण्याची चटणी”… तर दुसऱ्या वाटीत बारीक खिसलेल्या काकडीची… मीठ- साखर- दही घालून कालवलेली आंबट-तुरट चवीची “कोशिंबीर”…! त्याच्या शेजारील अजून एका वाटीत त्या ऋतूत उपलब्ध असेल त्या पद्धतीने कधी पीठ पेरलेली “मेथीची”… अथवा मीठ- मिरची- साखर घालून.. वरून लिंबू पिळुन… बारीक किसलेलं खोबरं-कोथिंबिरीनं सजवलेली “बटाट्याची” सुकी भाजी असे….. त्याच वाटीत वर दोन लिंबाच्या फोडी असत….! ताटाची डावी बाजू झाल्यावर उजव्या बाजूच्या एका तांब्यात हरभऱ्याची डाळ, मेथ्या, शेंगादाणे, खोबऱ्याचे बारीक काप, मिरच्यांचे तुकडे घालून… चिंचगुळाचा कोळ घालून केलेली “आळू-चुक्याची” पातळ भाजी असे…

कधी शेंगदाण्याचं कूट… चिंचगुळ.. हिरव्या मिरच्या.. हिंग- मोहरी- जिरे- कढीपाल्याची फोडणी घातलेलं… चटकदार “मिरच्यांच पंचामृत”…! तर दुसऱ्या तांब्यात… खास पुरण करताना बाजूला काढून ठेवलेल्या कटाची अन थोड्या पुरणाचा गोळा एकत्र केलेल्याची… कढीपाल्याच्या फोडणीची… वरून कोथिंबीर.. खोबऱ्याचा खिस तेलावर तरंगताना दिसणारी चिंचगुळाचा कोळ घातलेली थोडी झणझणीत- आंबट- गोड चवीची “कटाची आमटी”… असायची. ज्या “कटाच्या” आमटीच्या एका ‘भुरक्यात’… तोंडं- घसा- नाक- कान- डोकं … हे सगळे अवयव refresh करायची ताकद आहे, ज्या आमटीच्या “भुरक्यात” … बेसनाचा लाडू अन साखरभाताने तुपाळलेला घसा… पूर्ववत करण्याची किमया आहे… ती कटाची आमटी..! त्या आमटीच्या बाजूलाच कधी एका गंजात (गंज – एक भांड्याचा प्रकार) दुधापासून आटवलेली.. जायफळाची चव खाताना जाणवणारी घट्ट “बासुंदी” असे… तर कधी आंबटगोड जायफळ-केशर घातलेलं घट्ट “श्रीखंड” … तर कधी उच्च प्रतीच्या आंब्याचा रस असे…!

– क्रमशः…

लेखक – श्री मंदार मार्तंड केसकर

पंढरपूर, मो. 9422380146

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments