श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? वाचताना वेचलेले ?

☆ वारकर्‍याची श्रीमंती… ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर☆ 

वारकर्‍याची काळजी पांडुरंग घेतो असे म्हणतात. खरोखर हे खरे असेल का ? नेमकी  वारकर्‍याची श्रीमंती कोणती ? तर ती असते त्याची पांडुरंगावरची श्रद्धा.

नोकरी निमित्त फिरतीवर असायचो. तेव्हा कंपनीच्या गाडीने महाराष्ट्रात  फिरण्याचा योग यायचा.

असाच एकदा सोलापूर -जत मार्गे  कोल्हापूरकडे येत होतो. आषाढी एकादशी संपून ५-६ दिवस झालेले  होते. वारकरी मंडळी आपापल्या मार्गाने घरी परतत होती. सकाळी  सोलापूरहून लवकर निघालो होतो. सांगोला सोडलं होतं. भूक लागलेली होती. बरोबर दोघे assistant होते. त्यांनी सुचवलं एखाद्या ढाबा वजा टपरीवर नाष्टा चहा चांगला मिळेल. ९.३० चा सुमार. मंडळींनी गाडी एका ढाबा वजा टपरी जवळ थांबवली. उतरलो, पाय मोकळे केले आणि नाष्ट्याला काय विचारपूस केली. कांदे पोहे, उसळ पाव आणि चहा काॅफी अशी ऑर्डर दिली. २०-२५  मिनिटे लागणार होती. ऊन खात उभे होतो.

तेव्हढ्यात एक  60 – 65 वयाचं वारकरी जोडपं चालत चालत  आमच्याच टपरीपर्यंत आलं. अंगावरचा एकही कपडा धड नाही. बाईंच्या डोक्यावर तुळस आणि खाकेत एक बोचकं. बाबांच्या डोकीवर एक बोचकं नी खांद्यावर एक भली मोठी पिशवी. पायताणं यथा तथाच .बरीच दमलेली वाटत होती. टपरीच्याच बाजूला सारं सामान उतरवून ठेवत  जमिनीवरच बसले.

मी आपलं सहज कौतुकाने विचारपूस केली. मंडळी वारी वरूनच परतत होती. मी विचारलं नाष्टा करणार का  ? बाबांनी एकदा बाईकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली. मी सहज सुचवलं- बाबांनो पोटभर खाऊन घ्या. मला उगीचच वाटलं, चला तेव्हढच पुण्य . मी बाबांना विचारलं,” वाटेत चालता चालता काय करता ?” ते म्हणाले,

“ कधी अभंग तर कधी पाडुरंगाचं नाव घेत जातो. म्हनजे अंतर कसं पार झालं उमगत नाय. “

मी आपली विनंती केली की एखादा अभंग ऐकवाल का  ? बाबांनी क्षणाचा विलंब न लावता अभंगाला सुरुवात केली आणि बाईंनी टाळावर साथ दिली. खरंच वेळ कसा गेला समजलंच नाही.

नाष्ट्यावर ताव मारला. त्या वारकरी जोडप्याला आग्रहानी आमच्या बरोबर बसवलं. सहज चौकशी केली की अजून यांना घरी पोहचायला किती दिवस .लागतील ? तर कळले की अजून ४-५ दिवस. निरोप घेण्याची वेळ आली. आम्ही त्यांचे आणि त्यांनी आमचे  आभार मानायचे सोपस्कार पार पडल्यावर निघालो.

सहज मनात आले की यांना घरी पोचायला अजून ४-५ दिवस आहेत. त्यांना काहीतरी मदत करूया. वारकरी बाबा आणि बाईंना थांबवलं आणि 100 रुपयांची नोट त्यांना मदत म्हणून पुढे केली. बाबांनी अदबीने मदत नाकारली. मला आश्चर्य वाटले. न राहवून मी विचारले, “ का ?”

बाबांनी उत्तर दिलं –

“वारीला निघताना घरून एक छदाम घेतला नाही. आत्ता या क्षणालाबी खिशात छदाम नाही. पूर्ण वारी तो पांडुरंगच आम्हा जिवांची काळजी घेतो की. त्यापुढे दादा तुमची ही १०० रुपयांची नोट आमच्या काय हो कामाची. “

मी अवाक झालो. क्षणभर काय react व्हावं मला सुधरत नव्हतं. केवळ सुन्न. क्षणात मला माझी लायकी समजली, डोळ्यातून खळ्ळं आसू आले आणि मी त्या माउलीच्या पायावर डोकं ठेवलं.

सुमारे 30 वर्षांनंतर………

आज जवळपास 30 वर्षांनी ही घटना आठवली आणिक सारा क्रम आणि संवादातील शब्द नी शब्द परत ताजे तवाने होउन डोळ्यासमोर फिरू लागले.

त्या वारकरी बाबा आणि बाईंच त्यावेळचं वय आज माझं होतं. आज माझ्याकडे सगळं आहे. घर, गाडी, उर्वरित आयुष्य बर्‍यापैकी सुखात पार पडेल एव्हडी व्यवस्था. तरीही मला उद्याची निश्चिंती नक्कीच नाही. पण मग त्या वारकरी बाबांना अंगावर धड कपडे नाहीत, धड अंथरूण पांघरूण बरोबर नाही. वेळ पडली तरी खिशात छदाम नाही. असं असून सुद्धा एक emergency साठी म्हणून मी पुढे केलेले १०० रुपये सुद्धा हा भला माणूस अव्हेरतो, आणि प्रचंड आत्मविश्वासानी सांगतो की माझ्या पुढच्या प्रत्येक क्षणाची काळजी तो पांडुरंगच करेल. त्याला आयुष्यात कसलीही पुंजी  करून ठेवावं असं नाही वाटलं कारणं त्याने जमवली होती पांडुरंगाच्या श्रद्धेची पुंजी. त्यामुळे त्याला ना उद्याची भ्रांत ना आयुष्याची चिंता.

ती त्याची श्रीमंती पाहिली आणि  नजर स्वतः कडे वळली. त्यांनी शाश्वत श्रद्धेची नी भक्तीची पुंजी जमवली आणि मी अशाश्वत पुंजी जमवण्यात धन्यता मानत राहिलो.

— हे परमेश्वरा अजूनही वेळ गेलेली नाही. त्या वारकर्‍याची श्रद्धा आणि भक्ती मला सुद्धा जमवता यावी अशी बुद्धी मला दे, हीच कळकळीची प्रार्थना तुझ्या चरणी.

संग्रहिका –  श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments