सौ. अंजली दिलीप गोखले
वाचताना वेचलेले
☆ भेट… ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆
” राग ” भेटला
मला पाहून म्हणाला…
काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?
मी म्हणालो अरे नुकताच
” संयम ” पाळलाय घरात
आणि ” माया ” पण माहेरपणाला
आली आहे..
तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला..!!
पुढे बाजारात ” चिडचिड ”
उभी दिसली गर्दीत, खरं तर
ही माझी बालमैत्रीण पण पुढे
कॉलेजात ” अक्कल ” नावाचा
मित्र मिळाला आणि हिच्याशी
संपर्क तुटला..!!
आज मला पाहून म्हणाली, अरे
” कटकट ” आणि ” वैताग ”
ची काय खबरबात ?
मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा..
हल्ली मी ” भक्ती ” बरोबर
सख्य केलंय त्यामुळे
“आनंदा”त आहे अगदी..!!
पुढे जवळच्याच बागेत
” कंटाळा ” झोपा काढताना दिसला
माझं अन त्याच हाडवैर….
अगदी 36 चा आकडा म्हणा ना….
त्यामुळे मला साधी ओळख
दाखवायचाही त्याने चक्क ” आळस ” केला..!!
मीही मग मुद्दाम ” गडबडी ” कडे
लिफ्ट मागितली आणि
तिथून सटकलो..!!
पुढे एका वळणावर ” दुःख ” भेटलं,
मला पाहताच म्हणालं
” अरे ये, तुझीच वाट पहात होतो ”
मी म्हणालो, “अरे वाट पहात
होतास की वाट लावायच्या
तयारीत होतास? –आणि सर्वात जास्त
तूच वाट बघतोस की रे माझी
” तसं ” लाजून ” ते म्हणालं,
“अरे मी पाचवीलाच पडलो
( पाचवीला पुजलो ) तुझ्या वर्गात.
कसं काय सर्व ? घरचे मजेत ना?”
मी म्हणालो, ” छान ” चाललंय सगळं…
” श्रद्धा ” आणि ” विश्वास ”
असे दोन भाडेकरू ठेवलेत घरात
त्यांच्या मदतीने मस्त चाललंय.
तू नको ” काळजी ” करूस.
हे ऐकल्यावर ” ओशाळलं ”
आणि निघून गेलं..!!
थोडं पुढे गेलो तोच
” सुख ” लांब उभं दिसलं
तिथूनच मला खुणावत होतं,
‘ धावत ये नाहीतर मी चाललो
मला उशीर होतोय..’
मी म्हणालो, “*अरे कळायला *
*लागल्यापासून तुझ्याच तर मागे *
धावतोय ऊर फुटेपर्यंत,
*आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट *
झालीय… एकदा दोनदा भेटलास
पण ‘ दुःख ‘ आणि ‘ तू ‘ साटलोट
करून मला एकटं पाडलंत .. दर वेळी.
आता तूच काय तुझी
” अपेक्षा ” पण नकोय मला.
मी शोधलीय माझी ” शांती ”
आणि घराचं नावच
” समाधान ” ठेवलंय..!
संग्राहिका : अंजली दिलीप गोखले
मो ८४८२९३९०११
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈