सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 23 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
३१.
“हे बंदिवाना, सांग, तुला कोणी बंदिस्त केलं?”
बंदिवान म्हणतो, ” माझ्या धन्यानं!”
“धन आणि सत्ता मिळवून मी
सर्वश्रेष्ठ होईन, असं मला वाटलं.
राजाला द्यायचे पैसे मी
माझ्या तिजोरीत साठवले.
माझ्या धन्यासाठी
असलेल्या बिछान्यावर मी पहुडलो.
जाग आल्यावर मला समजलं…
मी माझ्याच धनमहालात बंदिवान झालो.”
“हे बंदिवाना, ही अभेद्य साखळी कोणी केली?”
” मीच ही साखळी अतिदक्षतापूर्वक घडवली.
वाटलं होतं. . .
माझ्या अपराजित सत्येनं हे जग
गुलाम करता येईल
आणि मी निर्वेध सत्ता उपभोगीन.
प्रचंड अग्नी आणि निर्दय आघात
रात्रंदिवस करून ही साखळी मी बनवली.
काम संपलं.
कड्या पूर्ण व अभेद्य झाल्या तेव्हा समजलं. .
मीच त्यात पूर्णपणे अडकलो.”
३२.
माझ्यावर माया करणारे
मला सुरक्षित राखण्यासाठी जखडून ठेवतात.
पण तुझ्या प्रेमाची तऱ्हाच न्यारी
ते त्यांच्या स्नेहाहून अधिक महान आहे
कारण तू मला स्वतंत्र ठेवतोस.
त्यांचे स्मरण सतत रहावे
म्हणून तू मला एकट्याला सोडत नाहीस पण,
दिवसामागून दिवस गेले तरी तू दिसत नाहीस
माझ्या प्रार्थनेतून मी तुला हाक घातली नाही
अगर ऱ्हदयात तुला राहू दिले नाही
तरी तुला माझ्याबद्दल प्रेम वाटतच राहते.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈