श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
वाचताना वेचलेले
☆ खरं प्रेम……? ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
बायकोनं घरात मांजर पाळलेलं. तिचं ते खूप लाडकं. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची. एका वाटीत दूध भाकरी कुस्करून द्यायची.
पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही. उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय. त्याचा त्याला प्रचंड राग यायचा…
एकदा नवरा जेवायला बसलेला, आणि नेमकं मांजराने त्याच्या ताटात तोंड घातलं. नवरा चिडला आणि रागारागाने शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला.
घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहिलं . ‘ मेलं की काय ‘ अशी शंका येत असतांनाच ते अंग झटकून उठून बसलं.
त्याने हळूच नवऱ्याकडे हसून बघितलं, आणि चक्क ‘ शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं. क्या करे आदत से मजबूर हूँ, पुन्हा नाही असं करणार..’ असं माणसासारखं बोललं. नवरा वेडा व्हायचाच बाकी..!
त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं. ताटात तोंड घालणे तर सोडाच, दारातला पेपर आणून दे, टीपॉयवरचा चष्मा आणून दे… अशी बारीकसारीक कामं ते करू लागलं.
मग काय, नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली. ऑफिसमधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा. ‘ अग मन्या दिसत नाही गं कुठं ? ‘ बायकोला सतत विचारत राहायचा.
असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या दारात बेवारस कुत्री आणि मांजरं पकडून नेणारी महानगरपालिकेची व्हॅन येवून थांबली.
मन्याने खिडकीतून ती व्हॅन बघितली. त्याच्या मनात काय आलं कोण जाणे, पण धावत जावून तो व्हॅनमधे बसला. नवऱ्याने हे बघितले. हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावला. मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला.
नवरा म्हणाला, ” मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरांसाठी आहे. तुझ्यासाठी नाही.
“ मला माहितेय..! पण मला जायचंय आता.”— मन्या शांतपणे बोलला.
” मन्या, अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही. माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय. तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही. मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास ? ए प्लिज, प्लिज उतर रे आता.” काकुळतीला येवून नवरा बोलला.
मन्या गोड हसला, आणि बोलला, ” तू माझ्यावर प्रेम करतोस? माझ्यावर? “
” म्हणजे काय शंका आहे का तुला? “
” मित्रा, अरे मी जेव्हा माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं हवं तेव्हा तोंड घालत होतो, तेव्हा मी तुझा नावडता होतो. सतत रागवायचास माझ्यावर. अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा. पण जेव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो, तुला हवं तसं करू लागलो…. तेव्हा तुला आवडू लागलो. तू माझ्यावर प्रेम करू लागलास, यात नवल ते काय? ”
नॉट सो स्ट्रेंज यार…!! वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते. जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून, की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ? समोरचा जोपर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो, तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं.
पण जेव्हा तो आपलं ऐकत नाही, आपल्याला हवं तसं वागत नाही, तेव्हा त्याचं आपल्यासोबत असणंही आता नकोसं वाटतं. आपण त्याला टाळत राहतो—-भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो. त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो. ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं, त्याला क्षणात परकं करून टाकतो.
— आश्चर्य आहे ना ? का वागतो असं आपण ? त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ time pass म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक?—–
— आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं, अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..!!
संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈