सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 29 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
४६.
मला भेटण्यासाठी केव्हापासून
तू माझ्याकडं यायला निघाला आहेस
तुझा सूर्य, तुझे तारे
माझ्यापासून तुला लपवू शकणार नाहीत
याची मला खात्री आहे.
तुझा पदरव सकाळ-संध्याकाळ मला ऐकू येतो.
तुझं गुपित तुझ्या दूतानं
माझ्या काना -मनात सांगून ठेवलंय.
आज माझं जीवन सर्वस्वी जागृत झालंय
आनंदाची एक क्षीण भावना
माझ्या ऱ्हदयातून स्फुरते आहे.
काम बंद करायची वेळ झाली असं वाटतं.
हवेत पसरलेल्या तुझ्या
मधुर अस्तित्वाचा मंद सुगंध मला जाणवतो आहे.
४७.
त्याची वाट पाहण्यात जवळजवळ
सारी रात्र वाया गेली.
थकून भागून रामप्रहरी मला डुलकी लागेल,
तेव्हा तो येईल अशी मला भिती वाटते.
मित्रांनो! त्याला अडवू नका,मना करू नका.
त्याच्या पदरवानं मला जाग आली नाही तर,
कृपा करा आणि मला उठवू नका.
पाखरांच्या कलकलाटानं तसंच
प्रांत:कालीन प्रकाश महोत्सवाच्या,
वाऱ्याच्या कल्लोळानं मला जाग यायला नको.
माझ्या दाराशी माझे स्वामी अचानक आले
तरी मला झोपू दे
त्यांच्या स्पर्शानेच मला जाग येऊ दे.
अंधकारमय निद्रेत पडणाऱ्या स्वप्नातून
तो येईल तेव्हा त्याच्या हास्य किरणांनी
मला जाग यावी,
पापण्या उघडताच तो समोर दिसावा,
प्रथम प्रकाशाच्या किरणात आणि आकारात
तो मला दिसावा.
माझ्या जागृत आत्म्याचा प्रथम आनंद आविष्कार
त्याच्या नजरेत मला दिसावा.
अशा वेळी माझे पुनरागमन
त्याच्या येण्यातच व्हावे.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈