सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 30 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
४४.
छाया प्रकाशाचा लपंडाव जिथं चालला आहे,
वसंतामागोमाग वर्षाऋतूंच आगमन जिथं होतंय
त्या ठिकाणी बसावं,
तो लपंडाव, ते आगमन पहावं,
यात मला आनंद आहे.
अज्ञात आकाशातून
शुभवार्ता आणणाऱ्या दूतांनो. . . !
रस्त्यावरून वेगानं जाण्यापूर्वी मला दर्शन द्या.
माझं ऱ्हदय भरून आलंय..
वाहणाऱ्या वाऱ्याचा श्वास किती मधुर आहे!
पहाट प्रहरापासून संध्यासमयापर्यंत
मी माझ्या दाराशी वाट पहात बसलो आहे,
तुझ्या दर्शनाचा सुखद क्षण
अचानक येणार आहे, हे मला ठाऊक आहे.
तोपर्यंत मी एकटाच स्वतः साठी हसत, गात राहणार आहे.
तुझ्या आश्वासनाचा मधुर गंध
आसमंतात दरवळून राहणार आहे.
४५.
तो येईल, तो येईल, तो येईलच. . . . .
त्याच्या पावलांचा नि:शब्द आवाज
तुला ऐकू येत नाही?
क्षणाक्षणाला आणि प्रत्येक युगात,
दिवसा – रात्री तो येतच असतो.
मनाच्या कोपऱ्यात एका भावावस्थेत
मी किती गीतं गायली
प्रत्येक गीतामधून एकच स्वर उमटतो –
‘ तो येत आहे, तो येत आहे, तो येतच आहे. . . ‘
सूर्यप्रकाशाच्या स्वच्छ एप्रिल महिन्यातल्या
सुगंधीत दिवसांत,रानावनातून,
‘तो येतो,तो येतो, तो येतच असतो. . . . ‘
जूलै महिन्याच्या पावसाळ्या रात्रीच्या
उदासीनतेत गडगडणाऱ्या मेघांच्या रथातून
‘तो येतो, तो येतो, तो येतच असतो. . . . ‘
एकामागून एक येणाऱ्या
त्याच्या पावलांचा ठसा
माझ्या ऱ्हदयावर उमटत राहतो
आणि त्याच्या सुवर्णमय पदस्पर्शाने
माझा आनंद पुलकित होत राहतो.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈