? वाचताना वेचलेले ?

⭐ तुळस… लेखक : डाॅ. जयंत गुजराती ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

“मी वेडी नाहीय्ये हो डॉक्टर, माझ्यावर विश्वास ठेवा. मी चांगल्या घरची तरीही मला वेडी ठरवली गेलीय. विनाकारण डांबून ठेवलेय या वेड्यांच्या इस्पितळात. मला गोळ्या इंजेक्शनं याची काहीच गरज नाहीये. उगाचच माझे हाल करताहेत सगळे. नर्स, वॉर्डबॉय, इथले डॉक्टरही. सांगून सांगून थकले मी. परोपरीने मी विनवण्या केल्या, हातापाया पडले पण पालथ्या घड्यावर पाणी. म्हातारी झाले म्हणून काय झाले? मी हिंडू फिरू शकते. चांगलं बोलते तशी वागतेही. काय न्यून आहे माझ्यात की मला या छोट्याशा खोलीत जखडून ठेवलंय? सुरूवातीस सगळे सांगतील तसं केलं,तरीही छळ मांडला गेलाच माझा.”

मी फाईलवरनं हात फिरवत होतो. ऐंशीला टेकलेल्या बाईचं बोलणं मी शांतपणे ऐकत होतो. तिच्या बोलण्यात ओघ होता. रडकथाच. पण ती रडत नव्हती. हतबलता डोळ्यांतून पाझरत असलेली. व्हेरी डेंजरस, व्हायोलंट, पझेसिव्ह, फाईलमधले शेरे व तिचं म्हणणं मेळ खात नव्हते. काउन्सेलर म्हणून नेमणूक झाल्यापासून इस्पितळातील एकूणएक पेशंटसच्या फाईली बघून झाल्या होत्या. नेहेमीच्या डॉक्टरांच्या उपचारांमधे दखल न घेता प्रत्येक केसमधे काऊन्सेलिंगची गरज आहे का हे पाहून त्यानुसार पुढचे मानसोपचार  ठरवण्याची मुभा मात्र होती. तसं पाहिलं, तर वेड्यांच्या इस्पितळातील प्रत्येक केस ही आव्हानात्मक असते. तरीही बऱ्याचशा केसेस बरे होण्यापलीकडे गेलेल्या असतात. मग अशा केसेसना वगळून ज्यात काही करता येऊ शकेल अशा केसेस हाताळायच्या हेही ठरलेलं. मनोविकारतज्ञ व्हायचं हे एमबीबीएस झाल्यावर नक्की केलेलं. मनोविकार म्हणजे तमाने व्यापलेलं वेगळंच विश्व. प्रत्येक रुग्णाची कथा व्यथा निराळीच. मनोविकारांचे एकेक पदर उलगडले की माणसाच्या मनाची काळी, विकृत, दळभद्री, अनुचित, नैराश्याने ग्रासलेली, क्वचित शिसारी आणणारी,शेंडाबुडखा नसलेलीही बाजू समोर येत राहते.  हे सारं अभ्यासताना माणसाच्या मनाचे रूप,विद्रूप पाहून थक्क व्हायला होतं. साऱ्या केसेस हाताबाहेरच्या नसतात. अंधुकशी आशा कुठेतरी असते की संपेल हे नरकातलं जगणं. अशा केसेस निवडून पुढील उपचार करायचे हा प्रोटोकॉल. अशीच ही केस, फाईलवर नाव ठळकपणे लिहीलेलं होतं तरीही विचारून घेतलं,  “नाव काय आपलं? ” बऱ्याच वेळ त्या बोलल्याच नाही. शून्यमनस्कपणे खिडकीतून बाहेर बघत राहिल्या. खोलीतल्या झरोक्यातून उन्हाच्या तिरिपीमुळे त्यांचा सुरकुत्यांनी वेढलेला उदास चेहेरा भाजून निघत असलेला. तरीही मघा ज्या अजिजीनं म्हणणं मांडत होत्या, त्या आता थिजल्यासारख्या. मी उगाच फाईलशी चाळा करत बसलो. मात्र त्यांच्यावरची नजर ढळू दिली नाही. भरभरून बोलणं व मधूनच एकदम गप्प होऊन जाणं, हे मनाने आजारी असलेल्यांमध्ये तसं नेहेमीचंच. अशावेळेस वाट बघणं हे ओघानं आलंच. तीही बोलेना, मीही बोललो नाही. इतर रुग्णांनाही भेटायचं होतं. मी हलकेच उठलो. खोलीतून बाहेर पडत असताना दाराजवळ पोहोचताच मागून आवाज आला, “ मी वृंदा गोखले….” तरीही मी  “उद्या येतो”, म्हणत खोली सोडलीच.

गुंतागुंतीच्या अनेक केसेस सोडवताना एकेक विलक्षण कथा ऐकावयास, पाहावयास मिळतात. त्यातही काही तर चटका लावणाऱ्याच. त्यापैकीच ही एक असावी. अगदी घरी जाईपर्यंत व घरी गेल्यावरही वृंदा गोखले यांचा पीडेने करपलेला चेहेराच सारखा समोर येत असलेला. फाईलमधून फारसं काही हाती लागलं नव्हतं. अडीच तीन वर्षांपूर्वी त्या इस्पितळात आणल्या गेलेल्या.  कुणी आणून सोडलं याचा पत्ता नव्हता. त्यावेळचे डॉक्टरही बदलून गेलेले. अधूनमधून त्यांना वेडाचे झटके येतात. त्यावेळेस  सतत रडणं, किंचाळणं, कधीकधी दार खिडक्या आपटणं. हातात असेल ते फेकून मारणं व मग जोर ओसरला की उदासवाणे होऊन बसून राहणं काही खाता न पिता दिवसच्या दिवस. त्यातही ‘ मी वेडी नाही,’ हा हेका कायम. सीनिअर सिस्टर व सीनिअर वॉर्डबॉय यांनी ही वेगळी केस असल्याचे इस्पितळात ड्युटीवर रूजु झालो होतो, त्यादिवशीच सांगितलं होतं. दीड महिना झाला रुजू होऊन. या दिवसांत मोजून सहा केसेसच निवडल्या होत्या. त्यात ही गोखलेंची. पडलेल्या चेहेऱ्याने वावरणाऱ्या.

दुसऱ्या दिवशी  गोखले काकू जणू वाटच पहात असल्यासारख्या. अगोदर पहिल्या पाच केसेस पाहूनच काकूंना सर्वात शेवटी  भेटायचं हे ठरवलं होतं. जेणेकरून काकूंना जास्त वेळ देता यावा. नेहमी विमनस्क राहणाऱ्या गोखले काकूंच्या चेहेऱ्यावर आज ताजेपणा उमटलेला.  इस्पितळात वावरताना रोज नजरानजर व्हायची. डॉक्टर रुग्ण एवढीच ओळख एकमेकांची. गोळ्या औषधं घेतली का नाही, असे जुजबी बोलणं. कालपासून प्रत्येक केस वेगळी हाताळायची ठरवल्यावर प्रथमच बोलणं झालं होतं जवळून. आज खोलीत गेल्या गेल्या हात पकडून खाटेवर बसवून घेतलं. “ मी वृंदा गोखले, बोलू का? ” मी मानेने होकार भरताच त्या भडभडून बोलायला लागल्या. “ तीन वर्षं झाली त्या गोष्टीला. म्हणजे मला वेडं ठरवलं गेलं त्या गोष्टीला!!  सगळं लख्ख आठवतंय. का नाही आठवणार? सगळं घडलंच होतं विपरीत. कधीही विसरता न येण्याजोगं. साठ वर्षांचा सहवास सोडून हे गेले. दीर्घ आजाराने जर्जर होऊन गेले. सोन्यासारखे दोन मुलगे.ते परदेशात युएसला. मुलगी कॅनेडात. तिघांचाही सुखी संसार. त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून हे गेले. सर्व मुलामुलींनी आपल्या बरोबर रहावं ही शेवटपर्यंतची त्यांची इच्छा. मुलं हुशार निघाली. मोठमोठाली पॅकेज घेऊन पंख पसरून उडून गेलीत. ह्यांनी तर शनिवारपेठेतली बखळवजा राहती जागा तशीच ठेऊन कोथरूडला दोन फ्लॅटही घेतले शेजारी शेजारी. अगोदर मुलीचं लग्न लावून दिलं श्रीमंत सासर पाहून, मग सुना आणल्या. मुलं, मुलगी, सुना सगळे हुशारच. सगळे कमवते.  काहीच ददात नाही. ” गोखले काकूंनी आवंढा गिळला. मधेच थबकल्यासारख्या, काहीच बोलल्या नाहीत बराच वेळ. मी पाण्याचा ग्लास दिल्यावर तो घटाघटा पिऊन टाकला.

“ह्यांच्या आजारपणातच दीड वर्षं  गेलं. इथे मी एकटीच. सर्व सेवा केली. पैसा अडका काही कमी पडू दिलं नाही. मुलांना, मुलीलाही परोपरीने विनवण्या केल्या की या भेटायला, बाबांना भेटायचंय. कुणीही फिरकलं नाही दीड वर्षात. मी माझ्यापरीने कुठेही कमी पडले नाही. शेवटपर्यंत आशा होती की हे हाताशी येतील, बरे होतील. आणखी काही दिवस असतील सोबत. पूर्वीही सुखासमाधानाने जगलो होतो. परत तसेच जगू!! मी तर साठ वर्षे अधिराज्यच गाजवलं होतं आयुष्यात. किती दागिने घातले होते, किती पैठण्या नेसल्या होत्या, किती मिरवून घेतलं होतं, मोजदादच नाही. वाटलं होतं असतील सोबत काही दिवस. होतील बरे, पण तसं व्हायचं नव्हतं.”

बराच वेळ पुन्हा त्या गप्पच. मग एकदम कडवटपणे म्हणाल्या, “ ते गेल्यावर सगळे आले. क्रियाकर्म पार पाडण्याचीही वाट काही पाहिली नाही पोटच्या गोळ्यांनी. शनवारातली बखळवजा जागा, कोथरूडमधले दोन फ्लॅट्स, शिवाय गावाकडची जमीन सगळ्यांचा सौदा करून टाकला. मुंबईतील कोणीतरी मोठी असामी होती त्याच्याबरोबर, बॅंकेतील लॉकरमधील कॅश व दागिनेही आपापसात वाटून घेतले. सहा महिन्यांपासून मुलांनी तयारी करून ठेवली होती सौद्यांची म्हणे!! नंतर कळलं मला ते! मी या सगळ्याला विरोध करेन हे गृहीत धरून मला वेडी ठरवण्याचेही ठरवून टाकलं होतं. तसं सर्टिफिकेटही मिळवलं कायदेशीर व मला वृद्धाश्रमात न धाडता पोहोचवलं या इस्पितळात वेडी म्हणून. एक लॉकर यांनी कुणालाही न सांगता वेगळं ठेवलं होतं तेवढं वाचलं गिधाडांपासून. तरीही मुलगी विचारत होती, तुला माहेराहून मिळालेली मोत्यांची नथ यात दिसत नाही ती!! मग मात्र मी वेडच पांघरलं. आतून तर कोसळूनच पडले. जे आपले आहेत ते आपले होऊ शकत नाही तर इतरांबद्दल काय बोलावं. दहा दिवसात सगळं होत्याचं नव्हतं झालं. पंधराव्या दिवशी सगळे पांगलेसुद्धा आणि नकोशा गोष्टीला उकिरड्यावर फेकून देतात तशी मी भिरकावली गेली इथे. ” कळवळून बोलत असलेल्या गोखले काकू खिन्नपणे शांत झाल्या निदान बाहेरून तरी.

माझी फाईलवरची पकड काहीशी सैल झाली. मी फाईलमधील पानं पुन्हा भरभर चाळायला लागलो. एके ठिकाणी थांबलो.  त्या पानावर लिहीलं होतं, सुनेच्या कपाळावर साणसी फेकून मारून भोक पाडलं होतं. मी नेमकं त्यावर बोट ठेऊन गोखलेकाकूंसमोर धरलं. तर त्या शांतपणे म्हणाल्या, “ सगळं खोटं आहे. मुलाला बोचकारल्याचं, भला मोठा आरसा फोडल्याचं, देवघरातले देवही नदीत फेकून दिल्याचंही त्यात लिहीलं असेल!!”

मी म्हटलं, “बरोबर आहे, पण तुम्ही हे सगळं कुणाला सांगितलं का नाही?” त्यावर त्या उदासपणे म्हणाल्या, “ इतकी वर्षं माझ्याशी कुणी जिव्हाळ्याने बोललंच नाही रे!! ” यावर काय बोलावं सुचेचना!! त्यांच्या शब्दाशब्दांतून अगतिकता पाझरत होती. मनाला सारखं मारावं लागलं असेल क्षणोक्षणी, अधिराज्य गाजवणारीला  पदोपदी अवहेलना सोसावी लागली असेल. किती भोगलं असेल वृंदाकाकूंनी. त्यापेक्षा वेड लागलेलं परवडलं!!

गोखले काकूंशी मग रोजच भेटणं व्हायला लागलं तसे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर उलगडत गेले. काय नव्हतं वृंदा गोखलेंकडे? अगदी पाळण्यातल्या मुलांसाठी बडबड गीते, मोठ्या मुलांसाठी गोष्टी, व्रतवैकल्ये करणाऱ्यांसाठी कहाण्या, कॉलेजला जाणाऱ्या मुलामुलींसाठी कथा, मोठ्यांसाठी अनुभवाचे बोल. गोखलेकाकू एकदा बोलायला लागल्या की ऐकत राहावंसं वाटत राहतं आणि दुर्दैव म्हणजे आतापर्यंत त्यांच्याशी बोलायला कुणी नव्हतं.  “मला झोपेच्या गोळ्या नकोत रे!!  मी तासनतास झोपून राहते. सारखी मरगळ मुरते मग अंगात!! मला जगायचंय अजून! मला माणसांत रहायचंय.” त्यांच्या काकूळतीने मलाही गलबलून यायचं. त्यांचा वनवास संपला पाहिजे असं मनापासून वाटायला लागलं. हळुहळू त्यांच्या गोळ्यांचा डोस टेपर करत आणला.

बरेच दिवस गेले. गोखले काकू कैदेत असल्याची जाणीव मनाला कोरून खात होती. त्यांच्यासाठी आणखी काय करता येईल यावर विचार करत असताना एकदम सुचलं. इस्पितळातून त्यांना घेऊन मित्राचा एक छोटेखानी फोटो स्टुडिओ होता तेथे गेलो व त्यांचा एक विडीओ बनवला व युट्युबवर अपलोड केला. अगदी त्यांचं पर्सनल चॅनलच बनवून टाकलं. मग रोज एक विडीओ द्यायला लागलो. त्यांची बडबड गीते, गाणी,अनुभवाचे बोल, आजीबाईचा बटवा, गृहिणींसाठी नवनवीन रेसिपी,  त्यांच्याशी मनसोक्त गप्पा असं साधं सुटसुटीत स्वरूप ठेवलं. चॅनलचं नाव ठेवलं,  तुळस. आठवडाभरातच पाच हजार फॉलोअर्स मिळाले चॅनलला. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप.. जगभरातील मराठी बांधवांनी भरघोस प्रतिसाद दिला. आपापली मते, आपापल्या समस्या, आपले विचारही तुळस चॅनलवर यायला लागले. सुरूवातीला अवघडलेल्या वाटत असणाऱ्या गोखले काकू लवकरच रूळावल्या. काही दिवसात तर मित्राने तुळस पेड चेनल करून टाकलं. काकूंकडे तेवढीच गंगाजळी. चॅनल पेड केलं  तरीही काकू दिवसेंदिवस लोकप्रिय होत गेल्या. ही तुळस आपल्याही अंगणात असावी अशी ओढ प्रत्येकाच्या मनात.

मी आपला बाजूस होऊन डवरणाऱ्या तुळशीला विस्मयाने पाहत राहिलो. थोड्याश्या पाण्यानेही कोमेजलेली तुळस पुन्हा टवटवीत होते हा अनुभव गाठीशी. तसं तर ओलावा थोडासाच तर हवा असतो!!

लेखक : डॉ. जयंत गुजराती नासिक

संग्राहिका : सौ. प्रज्ञा गाडेकर, मुंबई.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments