सौ. विद्या पराडकर
📖 वाचताना वेचलेले 📖
☆ बसणे’ शब्दाचे विविध अर्थ ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆
वसंत सबनीस मुलाखत घेत होते.
त्यांनी पु लं ना विचारले –
“तुम्ही प्रत्यक्षात लिहिलेले नाटक रंगभूमीवर उभं करता – असं असताना आम्ही ते ‘बसवले’ असे का म्हणता?”
पु ल :- “त्याचं असं आहे, लिहिलेले नाटक नीट ‘बसवलं’ नाही, तर प्रेक्षक उभे राहून चालायला लागतात आणि नीट ‘बसवलं’ तर नाटक उभं राहून चालतं आणि प्रेक्षक शेवटपर्यंत ‘बसून’ राहतात.
त्यातून मला प्रेक्षकांसाठी नाटक लिहायची खोड आहे. त्यामुळे चालणारे नाटक आणि ‘बसणारे’ प्रेक्षक असे गणित जमवायचे असेल, तर त्या नाटकाला आधी नीट ‘बसवावं’ लागतं.
बाकी मराठीतील, ‘बसणे’ हे क्रियापद जरा अवखळच आहे. धंदा चालेनासा झाला, तरी धंदा ‘बसला,’ असं आपण म्हणतो आणि चालला तर जमदेखील ‘बसतोच’.
धंदा जमला तर धंदा ‘बसला’ असं म्हणत नाही. पण प्रेम जमलं तर प्रेम ‘बसलं’ असं म्हणतो, आणि नाटक चाललं की चांगलं ‘बसलं’ आहे म्हणतो आणि नाही चाललं तरी नाटक ‘बसलं’ म्हणतो.
मला वाटतं ‘बसण्या’ विषयी इतकं ‘बस’ झालं!”
— ह्याला म्हणतात भाषेवरील प्रभुत्व.
लेखक :अज्ञात
संग्राहिका – सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे..
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈