सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 33 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
५१.
रात्र गडद काळी झाली.
आमची दिवसभराची कामं झाली होती.
आम्हांला वाटलं. . .
रात्रीसाठी येणारा शेवटचा प्रवासी आला.
आम्ही गावाचा दरवाजा लावून घेतला.
कोणीतरी म्हणालं. . .
‘ राजा अजून यायचाय.’
आम्ही हसलो.’ ते! कसं शक्य आहे?’
दारावर टकटक झाली.
आम्ही म्हणालो,’ ते काही नाही.
फक्त वाऱ्याचा आवाज आहे.’
दिवे मालवून आम्ही झोपायला गेलो.
कोणीतरी म्हणाले,’ तो दूत दिसतोय.’
आम्ही हसून म्हणालो,
‘ नाही! ते वारंच असलं पाहिजे.’
रात्रीच्या निरवतेत एक आवाज उमटला.
दूरवर विजेचा गडगडाट झाला
असं आम्हाला वाटलं. आम्हांला वाटलं. . .
धरणी थरथरली, भिंती हादरल्या.
आमची झोप चाळवली.
एकजण म्हणाला, ‘चाकांचा आवाज येतोय.’
आम्ही झोपेतच बरळलो,
‘ छे!हा तर ढगांचा गडगडाट!’
ढोल वाजला. रात्र काळोखी होती-
आवाज आला,’ उठा! उशीर करू नका!’
भीतीनं आम्ही आमचे हात छातीवर दाबून धरले.
आमचा थरकाप उडाला.
‘ तो पहा राजाचा ध्वज!’ कुणीतरी म्हणाले.
आम्ही खाडकन जागे झालो.
‘ आता उशीर नको.’
कुणीतरी म्हणालं,” आता ओरडून काय उपयोग?”
त्याला रिकाम्या हातांनी सामोरे जा आणि
ओक्याबोक्या महालात आणा.”
” दार उघडा! शिंग फुंका!
मध्यरात्री आमच्या अंधाऱ्या,ओसाड घरांचा
राजा आला आहे.”
आकाशात विजांचा गडगडाट होतो आहे.
त्यांच्या चमचमाटात अंधाराचा थरकाप होतो.
” तुमची फाटकी सतरंजी आणा.महालात पसरा.
वादळवाऱ्यात एकाएकी अचानकपणे
भयाण रात्रीचा राजा आला आहे.”
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈