श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ चाहुल दिवाळीची…कुठे गेले ते दिवस … लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु झालेली असायची. दसऱ्यापासूनच
थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची.
दिवसभर खेळून हात-पाय थंडीने उकलायचे.
किल्ला गेरूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर
पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून बुरुजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा ‘गड’ राखण्यात !!
फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे-रुपयाची नाणी.फटाके आणायला खारीचा वाटा.
फटाक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी,लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी,नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची.
एकदम ‘श्रीमंत’ झाल्यासारखं वाटायचं.
घरी येऊन छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात
गळालेल्या फटाक्यांचीसुद्धा !! हाताला छान चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच काय ती दारू माहिती तेव्हाची !!
‘पोरांनो, लवकर झोपा. सकाळी अभ्यंगस्नानाला उठायचं आहे’ – आजी सांगायची. पण इथे झोप
कोणाला असायची! कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश, दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं.
न्हाणीघरात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून अंगात ऊब
आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं.
तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला की छान
वाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा.
मला तो आवडायचा. ‘मोती’ साबण छोट्याश्या हातात मावायचा नाही आणि बादलीतलं पाणी संपूच नये, असं वाटायचं.
देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते गोठायचं नाही म्हणून बरं वाटायचं.
मोठ्यांच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो. फक्त एक लवंगी सर वाजवायचा. बाकी सगळे सोडून, पुरवून पुरवून…त्यातच मज्जा असते.
दिवस हळूहळू
उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढा जास्त आनंद व्हायचा त्याचा.
आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं शेवटचं?
लहान होऊन, छोट्या गोष्टीत रमून, निरागसपणे.
सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये की
आता आपण खूप पुढे आलोय..?
गेले ते दिवस!
उरल्या त्या आठवणी!
लेखक :अज्ञात
संग्राहक :श्री. अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
kelkaramol.blogspot.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈