सौ. अंजली दिलीप गोखले
वाचताना वेचलेले
☆ मला फक्त मज्जा हवीये… ☆ संग्राहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆
तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे?
—प्राचीन काळी “ज्ञानप्राप्ती आणि परमार्थसाधना” हे उदात्त उत्तर मिळत असे. अर्वाचीन काळी “प्रापंचिक सुख” हे व्यवहारात बसेल इतपत उत्तर देत असत. आत्ता काल-परवा ” पैसा, समाधान, शांती ” हे शब्द ऐकू यायचे.
हल्ली थेट विकेट पडते – “मला फक्त मज्जा करायचीये”. विषय संपला.
” मज्जा केलीच पाहीजे ” ही बळजबरी माणसं एकमेकांच्या उरावर पांघरू लागलीयेत.
इथे “मज्जा” ही निवडीची गोष्ट राहिली नाहीये; ती ” निकड ” झालीये — केली गेलीये. मज्जा कशी करायची हे निवडण्याचंही स्वातंत्र्य नाही. ती समाजातल्या “मॉडर्न” शहाण्यांनी (!) आखून दिलेल्या पद्धतीनेच व्हायला हवी.
तशी ती नाही केली म्हणजे फालतू आहात तुम्ही, हे तुमच्या तोंडावर फेकून मारलं जातंय. म्हणजे पहा –
—-“बर्थडे सेलिब्रेशन घरात? शी…” — “पार्टी नाही? शी…”
—-“फ्रायडे नाईट, आणि तू घरी आहेस? शी… पथेटिक…”
—-तुम्ही घरी स्वयंपाक वगैरे करून खाता विकेंडला!? फारच बोरिंग ….
—-“तू आजवर कधी पबमध्ये गेलीच नाहीस? काय काकूबाई आहेस गं…”
—-” वेलेन्टाईन डे; आणि नो रोजेस? शी, बोअर…”
—-” डेटवर चाललायस? आणि हातात नो गिफ्ट्स? So sad…”
—-” वीकेन्ड घरच्यांबरोबर? नो फ्रेन्ड्स? नो आऊटिंग? शी…”
यात नफ्याची आर्थिक गणितं ठासून भरलेली आहेत. नव्वदच्या दशकात ग्लोबलायजेशन आपल्यावर येऊन आदळलं; आणि त्या नवश्रीमंतीच्या लाटेवर अनेकजणांनी विचार-विवेक गहाण टाकले.
तसे त्यांनी ते टाकावेत, जास्तीत जास्त मासे या भोगवादात सापडावेत, यासाठी (त्यातल्या त्यात पाश्चात्य) कॉर्पोरेट कंपन्यांनी मार्केटिंगची जाळी मस्तपैकी सर्वदूर फेकली होतीच. TV, सिनेमा, सततच्या जाहिरातींच्या भडिमाराने आमचा सुरेख ब्रेन वॉश केला. न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग तंत्राच्या वापराने, ध्वनी व दृश्य या दोघांनी आमचे कान आणि डोळे स्वप्नांत गुंतवले. मध्यमवर्गीय काटकसरीने म्हातारपणाच्या चिंता सोडून “आजचं बघा ” हा अमेरिकन मंत्र स्वीकारला. मग अचानक वाढदिवसाला निरांजनांच्या ओवाळणी backward झाल्या; वीस-पंचवीस हजारांचं हॉटेलवालं सेलिब्रेशन रीतीचं झालं. सी सी डी अन् बरिस्तामधल्या दोनशे रुपयाच्या कॉफ्या आम्हाला स्वस्त वाटू लागल्या. “अनलिमिटेड बुफे” च्या नावाखाली बार्बेक्यूंच्या भट्टीत पगार जाळून घेणं हे “त्यात काय एवढं?” असं झालं.
जीन्स पाचशेच्या पाच हजार झाल्या. पुर्वी कुत्रा कोण ज्या कॉटनला विचारत नव्हतं, तेच कॉटन “लिनन”च्या रुपात थेट स्टेटस सिम्बॉल बनलं. एक दिवसाचं मराठी लग्न पाच दिवसांचं “big fat पंजाबी वेडिंग” झालं. घराच्या हॉलमधले साखरपुडे नि टिळे हे फाईव स्टारवाले “इवेंट्स” झाले.
मज्जा, आनंद, आपल्या आत निर्माण करायचा असतो म्हणताय? तुमची संस्कृती तसं सांगते? हड. चुलीत घाला तुमची संस्कृती.—– आमचं Grand Live life kingsize उधळणं घ्या. बायकोला सोन्या-चांदीतून बाहेर काढा; हिरे नि प्लेटिनम मध्ये तिला बुडवून काढा.—- तुमच्या पोराला गर्लफ्रेन्ड नि पोरीला बॉयफ्रेन्ड असलाच पाहीजे. त्यांच्या “प्रेमाचं” मूल्यमापन गिफ्टच्या किमतीवर ठरेल.
कमवा— आणि उडवा.—-
तुम्ही तुमच्या नवाबज़ाद्यांकडे पाहा बघू. लिव Macho !! भले तुम्ही स्टायपेन्डवाले ट्रेनी इंजिनिअर असा.
विषय इतपत येऊन थांबलेला नाही. दारू नि सिगरेटचं उदात्तीकरण तर आता जुनं झालं. आता त्याच्यापुढे सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय पोरांच्या तोंडीही ” वीड “, ” ग्रास ” हे शब्द येऊ लागलेत.
यांचे अर्थ माहितीयेत? गांजासारख्या भयानक नशील्या पदार्थांची अमेरिकेतून उचललेली बोली भाषेतली नावं आहेत ही. या घाणीची जाहिरात थेट करता येत नाही; पण त्यासाठी आमचे नव्याने पैदास झालेले “रॉकस्टार्स” आणि “rap singers” आहेत ना ! त्यांच्या गाण्यांतून या अमली विकृतीची भलावण रोजच्या रोज होतेय. ” मनाली ट्रान्स ” म्हणे. शोधा गुगलवर लिरिक्स. शब्दांना जोड दृश्यांची. दृश्यांत ठासून भरलेला सेक्स. अनिर्बंध, अमर्याद आणि मुद्दाम चाळवण्याऱ्या अनैतिक नात्यांचा, अगदी घरच्या अंतर्गत नात्यातही तो मुक्तहस्ते सपोर्ट करणारा !!! एकेक वेब सिरिज मनोरंजन कमी, आणि पोर्नोग्राफी जास्त – इतपत मज्जेच्या डेफिनेशन्स गेलेल्या !!! तरुणांना नाद लावायला तेवढं पुरतं. —- चील… एंजॉय… पार्टी चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग.— मग मेलात तरी चालेल.
आपण ठरवलेलं उद्दिष्ट हे प्रत्यक्षात आपण स्वत: निवडलेलं नसून, ते आपल्याला गंडवून आपल्याकडून निवडून घेतलं गेलंय, हे लक्षात येतंय आपल्या?
चंगळवाद हा एक कॉर्पोरेटधार्जिणा पंथ झालाय. पंथामध्ये विचार आणि आचार निवडीचं स्वातंत्र्य नसतं. कुणीतरी महाभागाने सांगितलेलं तत्वज्ञान तो महापुरूष आहे असं सगळे म्हणतात म्हणून, मुकाट्याने नाकासमोर धरून चालणं, हे पंथाचं आचारशास्त्र असतं. तेच चंगळवादाचं आहे. “आम्ही कित्ती आनंदात आहोत “, “आमचं कित्ती मस्त चालू आहे “, “आम्ही कित्ती एंजॉय करतोय “, हे दुसऱ्याला दाखवणं, हा चंगळवादाचा अट्टहास असतो.
ते दुसऱ्याने सत्य म्हणून मान्य केलं, तर चंगळवादाचा विजय असतो. आणि आपण ओढवून घेतलेल्या पद्धतीचा दुसऱ्याने स्वीकार केला, तर तो चंगळवादाचा दिग्विजय असतो.
मुद्दा हा आहे, की या झुंडीत सामील झाल्यावर आपण किती “cool” आहोत, याच्या देखाव्यांचं एक compulsion असतं ना; त्यात बऱ्याच जणांचा श्वास कोंडला जातो. तो देखावा न करणाऱ्यांना पाखंडी समजून झुंडीबाहेर फेकलं जातं.—- मुळात जे झुंडीत कधी सामील झालेच नाहीत, किंवा आर्थिक कारणांमुळे होऊ शकले नाहीत, त्यांच्याकडे आगाऊपणाने “सो पथेटिक” म्हणून नकारात्मकतेने पाहिलं जातं; त्यांच्या मनात स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होईल याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होतात.
गंमत म्हणजे, चंगळवादाचे पुरस्कारकर्ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारतात; पण हीच सोंगं आयुष्य आनंदाने जगण्याचे प्रत्येकाचे स्वतंत्र वेगळे मार्ग असू शकतात, हे साधं सत्य दुसऱ्याला नाकारतात. त्यावेळी आपण त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करतोय, हे यांच्या गावीही नसतं. म्हणूनच मग ” तुम्ही दारू पिऊन पार्ट्या करत नाही, म्हणजे आयुष्य कसं एंजॉय करायचं ते तुम्हाला माहीतच नाही “, अशी बिनडोक तर्कटं मांडली जातात; जी हास्यास्पद ठरतात.
हेअर जेल, मेक अप आणि ब्रांडेड कपड्यात आम्ही बिनधास्त आहोत हे दाखवत राहण्याची केविलवाणी धडपड नजरेत लपत नसते. ब्रांडेड आयुष्यातल्या पोकळ्या वेडावतातच.
जागे होऊया रे.—- स्वत्व नको विकूया आपण.— दुनियेतल्या प्रत्येकाला आपण आवडलोच पाहिजे, हा मूर्ख विचार सोडूया; आणि करूया हिंमत स्वत:चा स्वतंत्र जीवनभाव निवडण्याची. सेलिब्रेशन्स मिळकतीची होऊ देत; आणि ती नजाकतीची होऊ देत !!
उधळण्याच्या फुलबाज्या क्षणभरच चमकतात; स्वतंत्र विवेकाचा सूर्य अनंत चमकतो. आपण सूर्य निवडू या.
संग्राहिका : अंजली दिलीप गोखले
मो ८४८२९३९०११
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈