इंद्रधनुष्य
☆ काश्मीर डायरी १९… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
‘शहादत ही इबादत है’ किंवा ‘हौतात्म्य हीच पूजा’ असं अत्यंत भावस्पर्शी घोषवाक्य असलेलं, श्रीनगर आणि लडाखच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या, श्रीनगरमधील, लष्कराच्या १५ कॉर्प्स रेजिमेंटने उभं केलेलं म्युझियम बघणं हा एकाच वेळी अभिमानाचा आणि कारुण्याचा विषय होता… आणि त्याचबरोबर तो अनोख्या ज्ञानाचा आणि संतापाचाही विषय होता. कारण तो एक कवडसा होता काश्मीरच्या जन्मापासून आजपर्यंत झालेल्या प्रवासाचा आणि त्याचबरोबर काश्मीरसाठी आणि काश्मीरच्या भूमीवर लढल्या गेलेल्या युद्धांचा… पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या राष्ट्रद्रोही कारवायांचा आणि त्याचबरोबर भव्योदात्त हौताम्याचाही…
२००४ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. पण आजही ते फारसं कुणाला माहीत नाही!
श्रीनगरमध्ये जाणारे पर्यटक हे म्युझियम बघत नाहीत किंवा कोणत्याही पर्यटन एजन्सीच्या पर्यटन स्थळांच्या कार्यक्रम पत्रिकेत ते नसतं कारण ते लष्कराच्या बदामी बाग कँटोन्मेंट एरियात आहे. पण आम्ही व्यवस्थित परवानग्या काढून तिथे गेलो आणि वर लिहीलेल्या सगळ्याच भावनांचा अनुभव आम्ही त्या भव्य म्युझियममध्ये दोन-तीन तास फिरताना घेतला.
या म्युझियममध्ये काश्मीर अस्तित्वात कसं आलं, ‘काश्मीर’ या नावामागची कथा, तिथे आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या राजवटी झाल्या, तिथे कसे कसे संघर्ष झाले, तिथले शूरवीर किंवा वीरांगना कोण, ज्याला ‘काश्मिरीयत’ म्हटलं जातं ती कशी अस्तित्वात आली, तिथली लोक संस्कृती, तिथले कपडे, तिथली भांडी, तिथली वाद्यं हे सगळं तर आहेच पण तिथे बघण्यासारखं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे काश्मीरचा रक्तरंजित इतिहास…. फार प्राचीन काळात जायचं नसलं…. अगदी स्वतंत्र भारताचा विचार केला तरीही १९४७-१९४८ पासून आजतागायत तिथे झालेली युद्धं, त्यात वापरली गेलेली शस्त्रं, रणगाडे, त्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांची माहिती, या रेजिमेंटमधील अशोक चक्र, परमवीर चक्र वगैरे सन्मान मिळवलेल्या योद्ध्यांची गाथा, त्यांचे अर्धाकृती पुतळे, त्या युद्धानंतर बदलत गेलेल्या सीमा किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा, ‘युद्धात कमावलं आणि तहात गमावलं’ असं ज्याबाबत म्हणता येतं अशा ‘हाजी पीर’ सारख्या किंवा पाकव्याप्त काश्मीरासारख्या कधीच न मिटणाऱ्या, कायम सलत राहणाऱ्या जखमांची सर्वांगीण माहिती, हे सगळं काही बघायला मिळतं.
काश्मीरमध्ये दहशतवादाचा काळा कालखंड सुरू झाल्यानंतर आजतागायत त्या दहशतवादाची बदलत गेलेली रूपं, दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या एके ४७, एके ५६ रायफली, पिस्तुलं, ग्रेनेड्स, बॉम्ब्स सकट असंख्य शस्त्रांची माहिती, नकाशे, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली बोगस ‘करन्सी’, खंडणी उकळण्यासाठी त्यांनी छापलेली व आपल्या सशस्त्र दलांनी जप्त केलेली पावती पुस्तकं असंही सगळं बघायला मिळतं.
आजवर काश्मीरमध्ये चाळीस हजाराच्या वर ‘एके फोर्टी ४७’ आणि पंचवीस हजाराच्या वर ‘एके ५६’ जप्त करण्यात आल्या आहेत. दहशतवादी संघटना तिथे मृत्यूचे थैमान कसे माजवत होत्या त्यांची ही हादरवून टाकणारी माहिती अक्षरशः हलवून टाकते.
हे म्युझियम आम्हाला ज्याने फिरून दाखवलं तो हवालदार दिनेश याने तर आम्हाला ‘एके ४७’, ‘एके ५६ ‘वगैरे उघडूनही दाखवल्या आणि ‘एके ४७ ‘ दहशतवाद्यांमध्ये एवढी का लोकप्रिय आहे त्याचीही माहिती दिली.
त्याने दिलेल्या माहितीनुसार एके ४७ गंजत नाही, बिघडत नाही, अगदी चिखलात किंवा पाण्यात पडली तरी तिची भेदक क्षमता कमी होत नाही. त्यामुळे ती दहशतवाद्यांची लाडकी आहे.
मात्र या बंदुका नुसत्या प्रदर्शनात का मांडल्या आहेत, आपल्या सैनिकांना त्या दिल्या का जात नाहीत असा प्रश्न आमच्या मनात होता. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या ज्या गोळ्या आहेत त्या अर्थातच पाकिस्तानात बनतात आणि त्याच गोळ्या या रायफल्ससाठी लागतात. आपल्या देशात बनलेल्या गोळ्या त्यात चालत नाहीत. त्यामुळे त्या नुसत्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.
या व्यतिरिक्त ग्रेनेडस, क्षेपणास्त्र, बॉम्ब्स यांचे अर्धाकृती छेद तिथे ठेवण्यात आलेले आहेत.
तिथे मांडण्यात आलेला एक देखावा तर असा आहे की तो बघून भारतीय संस्कृतीचा आणि आपल्या सैन्याचा खूप अभिमान वाटतो.
तो देखावा म्हणजे, ते स्मारक आहे एका पाकिस्तानी सैनिकाचं ! कारगिलच्या युद्धात लढता लढता त्याने एकट्याने ज्या धैर्याने आणि शौर्याने भारतीय सैन्याचा मुकाबला केला ते बघून भारतीय सैन्यालाही त्याचं खूप कौतुक वाटलं. त्याच्या शरीराची भारतीय सैन्याच्या गोळ्यांनी चाळण झाली होती आणि तरीही तो एकटा लढत होता. शेवटी आपली एक गोळी त्याच्या डोक्यात लागली आणि तो मरून पडला. तो जी मशीनगन वापरत होता त्याच मशीनगनवर तो जसा पडला तसंच त्याचं स्मारक या म्युझियममध्ये आहे. त्याच्या बाजुलाच, त्याला कदाचित रसद वगैरे पोहोचवायला आलेल्या एका गावकऱ्याचंही शव दाखवण्यात आलेलं आहे. ही सगळी माहितीही तिथे प्रदर्शित करण्यात आलेली आहे.
या सैनिकाचं शौर्य पाहून भारतीय सेना एवढी खुश झाली की भारताने पाकिस्तानला असं पत्र लिहिलं की त्यांच्या या सैनिकाला त्यांनी ‘निशान ए पाकिस्तान’ हा पाकिस्तानचा सर्वोच्च किताब दिला पाहिजे.
‘कारगिलमधले सैनिक आपले नाहीत’, ‘पाकिस्तानचा त्यांच्याशी काही संबंध नाही’ अशीच भूमिका पाकिस्तानने सातत्याने घेतली असल्याने पाकिस्तानने हे मानायला नकार दिला. शेवटी भारताने लष्करी इतमामात व इस्लाम धर्माच्या पद्धतीनुसार त्याचे अंतिम संस्कार तर केले. पण भारताने सातत्याने त्याला ‘निशान ए पाकिस्तान’ दिला जावा म्हणून पाकिस्तान सरकारकडे पाठपुरावा केला आणि अखेर भारताच्या प्रयत्नांना यश आलं. ‘तो आपला सैनिक आहे’ हे अखेर पाकिस्तानने कबूल केलं आणि त्याला मरणोत्तर ‘निशान ए पाकिस्तान’ हा सर्वोच्च किताबही दिला!
‘मरणांतराणी वैराणी’ ही भारतीय संस्कृतीची उदात्त परंपरा आणि शत्रू असला तरी त्याच्या शौर्याचं कौतुक करण्याची भारतीय सैन्याची दिलदारी, उदारता या दोन्हींचं दर्शन या देखाव्यातून घडतं.
काश्मीरचे शेवटचे महाराजा, राजा हरिसिंग यांनी १९२४-१९२५ मध्ये बांधलेल्या दगडी इमारतीत हे म्युझियम आहे. हवालदार दिनेश कुमार म्हणून तेथे तैनात असलेल्या १५ कॉर्प्सच्या एका सैनिकाने आम्हाला इथली पूर्ण माहिती अत्यंत आत्मीयतेने दिली. ते सगळं बघत असताना एकाच वेळी अभिमान आणि सैन्याविषयीची कृतज्ञता मनात दाटून येत होती.
आपल्या सैनिकांच्या हौतात्म्याची ती गाथा लतादीदींनी अमर केलेल्या ‘ए मेरे वतन के लोगो’ या गाण्यातल्या
जब घायल हुआ हिमालय,
खतरे में पडी अजादी
सरहद पर मरने वाला
हर वीर था भारतवासी ….
या ओळींची आठवण करून देत होती आणि हात आपोआपच कृतज्ञतेने जोडले जात होते!
☆☆☆☆☆
हे म्युझियम बघायचे असेल तर [email protected] या मेल आयडीवर मेल टाकून प्रयत्न करू शकता. मात्र उत्तर लवकर मिळत नाही. कर्मचारी कमी आणि काम अफाट अशी तिथली स्थिती आहे!
लेखिका : सुश्री जयश्री देसाई
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈