सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 42 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
७२.
आपल्या अदृश्य स्पर्शाने माझं अस्तित्व
जागवणारा माझ्या अंतर्यामी आहे.
या डोळ्यावर आपली जादू टाकून
तो हसत हसत माझ्या ऱ्हदयातील
तारा छेडतो व सुख- दु:खाची धून वाजवतो.
सोनेरी-चंदेरी-निळे-हिरवे रंगांचे जाळे तो फेकतो.
ते रंग उडून जाणारे आहेत.
त्याच्या पायघड्यातील अडथळे ओलांडून,
स्वतःला विसरून मी त्याला पदस्पर्श करतो.
अनेक नावांनी, अनेक प्रकारांनी
आनंद व दु:खाच्या अत्युत्कट प्रसंगी
तो सतत अनेक दिवस,
अनेक युगं तोच माझ्या ऱ्हदय स्पंदनात असतो.
७३.
संन्यासात मला मुक्ती नाही.
आनंदाच्या सहस्र बंधनात मला स्वातंत्र्याची
गळाभेट होते.
हे मातीचं पात्र काठोकाठ भरण्यासाठी
अनेक रंगांची आणि अनेक स्वादांची मद्यं
तू सतत त्यात ओतत असतोस.
तुझ्या ज्योतीनं शेकडो निरनिराळे दिवे
मी प्रज्वलित करेन व तुझ्या
मंदिराच्या वेदीवर अर्पण करेन.
माझ्या संवेदनशक्तीचे दरवाजे
मी कधीच बंद करणार नाही.
पाहण्यात,ऐकण्यात, आणि स्पर्शात असणारा आनंद तुझाच असेल.
आनंदाच्या तेजात माझी सारी स्वप्ने खाक होतील.
प्रेमाच्या फळात माझ्या साऱ्या वासना पक्व होतील.
७४.
दिवस सरला, पृथ्वीवर अंधार झाला.
घागर भरून आणायला
नदीवर जायची वेळ झाली आहे.
पाण्याच्या दु:खमय संगीतानं
सायंकालीन हवा भरून गेली आहे.
सांजवेळी ती मला बोलावते आहे.
रिकाम्या गल्लीत पादचारी नाही.
वारा सुटला आहे,
नदीत पाण्याच्या लाटा उसळत आहेत.
मी घरी परतेन की नाही ठाऊक नाही.
मला कोण भेटेल कुणास ठाऊक?
फक्त नदीकिनारी उथळ पाण्यात
छोट्या नावेत कोणी अनोळखी
माणूस सारंगी वाजवतो आहे.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈