वाचताना वेचलेले
☆ अद्भूत ☆ सुश्री शुभा गोखले ☆
९२ वर्षांचे गुरुवर्य पंडित वसंतराव घोटकर हे वृद्धापकाळातील आजारामुळे कोमामध्ये होते. दहा एक दिवस वाट पाहिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचे पुत्र विवेक घोटकर यास सांगितले की गुरुजी आता काही तासांचेच पाहुणे आहेत, तेव्हा सर्व कुटुंबाला एकदा बघून जायला सांगा. हे कळताच दुसऱ्याच दिवशी गुरुजींचा पट्टशिष्य प्रकाश वाडेकर त्यांना भेटायला आला आणि त्यांच्या पायाजवळ बसून त्यांना “गुरुजी गुरुजी” अशी हाक मारु लागला. पण गुरुजी काही केल्या ओ देईनात. सुमारे अर्धा तास असाच गेला शेवटी प्रकाश म्हणाला की “ दादा मला तबला दे. मी गुरुजींच्या पायाजवळ बसून शेवटचा तबला वाजवतो, तेव्हडाच मला आशीर्वाद मिळेल. “ प्रकाशने असे म्हणताच विवेकदादाचा मुलगा शुभम हा तबला घेऊन आला, आणि प्रकाश गुरूजींच्या पायाजवळ बसून तबला वाजवू लागला. त्यांनी दिलेल्या वेगवेगळया चीज़ा एकानंतर एक वाजवू लागला आणि पाहतो काय?— गेल्या दहा दिवसांपासून बेशुद्धावस्थेत मौन असलेले गुरुजी हळुवारपणे पुटपुटले— ” कोण? प्रकाश? ” हे ऐकताच घरातील सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. सगळे जण आश्चर्यचकित होऊन तो चमत्कार पाहू लागले आणि आता गुरुजी फक्त उठलेच नव्हते, तर मृत्युशय्येवर असून सुद्धा चक्क तबला शिकवू लागले होते. सांगत होते, चुका दुरुस्त करत होते, आणि वाजवून सुद्धा दाखवत होते. आणि असेच जवळपास दहा – पंधरा मिनिटे शिकवून ते पुन्हा झोपी गेले ते सरळ पंचतत्वात विलीन होण्यासाठी – ईश्वराच्या चरणी जाण्यासाठी.
ही माहिती, सरस्वतीची उपासना काय असते? गुरु कसे असावे? भारताची गुरु-शिष्य परंपरा काय आहे? गुरु शिष्यांची श्रद्धा आणि प्रेम काय असते? याबद्दल बरंच काही सांगून जाते .
संग्रहिका : शुभा गोखले