श्री सुहास सोहोनी
वाचताना वेचलेले
☆ मैफल तालांची… शंतनु किंजवडेकर ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆
(एक अल्लड बोल-अभिनय गीत)
असे एकदा स्वप्नी आले
तबला डग्गा बोलु लागले
नवथर बोटें नाचु लागली
तालांची मग मैफल सजली
***
त्रिताल बोले ‘धा धिं धिं धा’
जसा चमकतो रुपया बंदा
टाळी आणिक ‘खाली’ मधला
सम-प्रमाणी शासक खंदा
***
झप-तालाचे रूप-आगळे
दोन-तीनचे छंद-वेगळे
जणु-संवादे वंदी-जनांना
धीना-धीधीना तीना-धीधीना
***
रूपक हसे-गाली
पावलें सात-चाली
मारीतो गोड-ताना
तिंतिंना धीना-धीना
***
दादरा करीतो भलता नखरा
सहाच मात्रांत मारीतो चकरा
लाडीक स्वभाव मोहक दागीना
धाधीना-धातीना धाधीना-धातीना
***
केहेरवा म्हणे मी रंगीला
नर्तनातुनी करतो लीला
चला नाचुया एकदोन दोनतिन्
धागेनतिनकधिन् धागेनतिनकधिन्
***
एकताल मग हसुन बोलला
राजा मी तर मैफिलीतला
मी तर देतो भक्कम ठेका
चलन देखणे माझे ऐका
***
ताल-मंडळी खुशीत सगळी
तबल्यामधुनी बोलु लागली
समेवरी मग अचूक येता
स्वप्न संपले जाग जागली
स्वप्न संपले जाग जागली
***
– शंतनु किंजवडेकर
संग्राहक : सुहास सोहोनी
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈