सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आईचे काही फ़ेमस डायलॉग… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

आपल्या लहानपणीचे आईचे काही फ़ेमस डायलॉग …

 

१. आई भूक लागली …

“सारखं काय द्यायचं तुम्हाला खायला, आता मलाच खा”

( दहा मिनिटात आपल्यासमोर काहीतरी खायला असायचं तो भाग वेगळा)

 

२. सकाळची घाई गडबड आणि नेमकं गॅस सिलिंडर संपतं…अती त्राग्याने..” मरा, ह्या मेल्याला पण आत्ताच सम्पायचं होतं? एक एक दिवस अगदी परीक्षाच असते

( त्या परिक्षेत ती अगदी उत्तम पास होते तो भाग वेगळा)

 

३. आई वेणी घालून दे ना…

” एवढी घोडी झाली तरी आई लागते वेणी घालायला”

कृतःकोपा ने प्रेमळ धपाटा ..

( बोले पर्यंत वेणी घालून पण होते ते निराळं )

 

४. ” किती पसारा करता रे..आवरताना जीव मेटाकुटीस येतो, शिस्त नाही तुम्हाला, माझंच चुकलं, चांगले दणके द्यायला हवे होते..”

( तिच्या ही नकळत, रागाच्या भरात सर्व पसारा तीच आवरते)

 

५. पाणी प्यायला स्वयंपाक घरात गेलं की…

” दूध ठेवलय गं गॅस वर, लक्ष ठेव, माझी पाठ वळली की

पळून जाऊ नकोस, मी आलेच पटकन.

( गॅस इतका बारीक ठेऊन जाते, की ती परत आली तरी

किमान दहा मिनिटं तरी दूध तापायला लागतील , पण आपल्याला चांगलीच ओळखून असते त्यामुळे..)

” आणि ढणढण्या गॅस ठेऊ नकोस, दूध करपतं”

( काय बिशाद आपली गॅस मोठा करण्याची)

 

६. परीक्षेला जाताना…

” सगळं व्यवस्थीत घेतलंस ना? पेपर आधी नीट वाच,

धांदरटपणा करु नकोस “

( जगातल्या तमाम आयांना, आपलं परीक्षेला बसणारं

मुल धांदरट का वाटतं, हे न उलगडणारं कोडं आहे, अगदी मी आई झाले तरी)

 

७. आपण बाहेर जाताना…

“लवकर ये, उशीर करु नकोस…जास्त उशीर केलास तर दार उघडणार नाही “

आपल्याला यायला उशीर होतोच..

काळवंडलेल्या चेहर्याने दार उघडताच..

” कित्ती उशीर, काय झालं? सगळं ठीक आहे ना?”

( काळजीने प्रश्नांच्या सरबत्तीत, दार उघडणार नव्हती हे विसरुनच जाते)

 

काय अजब रसायन असतय ना आई म्हणजे?

आपल्याला म्हणते सुट्टी असली तरी लवकर उठावं 

आणि बाबांना म्हणेल, झोपू द्या हो एकच दिवस मिळतो..

 

आपल्याला म्हणते, असं घाबरून कसं चालेल?

आणि स्वतः मात्र सारखी घाबरते..

( हे घाबरणं आपल्यासाठी होतं हे आपल्याला कळे पर्यंत मात्र एक तप उलटतं)

 

पिढ्यांपिढ्या थोडया फार फरकाने हे संवाद असेच चालू रहातील, कारण आई सगळयांची सारखीच असते..आई ही आईच असते..

ती काल ही अशीच होती, आज ही अशीच आहे आणि उद्या पण अशीच राहील..

कारण आई ही फक्त आईच असते… कायम..

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments