? वाचताना वेचलेले ??‍?

☆ समाराधना…अभय आचार्य ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆ 

समाराधना 

गोविंदरावांच्या समाराधनेच कौतुक हा गावातल्या गप्पांचा नेहेमीचा विषय. नित्य अन्न संतर्पण होत असे . दुपारी बारा वाजता पहिली पंगत बसली की  चार वाजून जाईस्तोवर पंगती सुरूच असत. स्वतः गोविंदराव पंगतीत फिरून सावकाश होऊ द्यात म्हणत असत . मोठे दत्त भक्त असा गोविंदरावांचा लौकिक होता . दत्त महाराजांच्या कृपेने मला काही कमी पडलं नाही, तेव्हा मी देखील दानधर्मात काही कमी करणार नाही हा त्यांचा विचार असे .

पंगतीत दत्त महाराजांची पदे म्हटली जात आणि अनेकदा स्वतः गोविंदराव गुरुचरित्रातील एखादा कथाभाग पंगतीत येऊन सांगत असत . त्याच गावी एक अत्यंत गरीब अशी म्हातारी राहत असे . फाटकं  तुटकं नेसून ती त्या वाडयाच्या दाराशी येऊन बसे. सर्व पंगती झाल्यावर उरलेले पदार्थ ती घेऊन जात असे .ती अन्न घेऊन जाताना नेहेमी म्हणे, “अरे दोघाना पुरेल इतकं दे रे बाबा. “  ती झोपडीत एकटीच राहणारी, मग दुसरा कोण हा प्रश्नच असे .असेल कोणा प्राण्यासाठी म्हणून सर्व दुर्लक्ष करीत . 

ती झोपडीत आल्यावर दार लावून घेत असे . झोपडीत एक जीर्ण अशी दत्त महाराजांची तसबीर होती . दत्त महाराजांना त्या अन्नाचा नैवेद्य दाखवीत असे. आणि म्हणे, “ दत्ता, दमला असशील ! ये S खा दोन घास माझ्या बरोबर “  एक मंद अशी चंदन सुगंधाची झुळूक त्या झोपडीत शिरे . एक दिवस चुकून दार लावायला म्हातारी विसरली आणि हे सर्व एका मनुष्याने पाहिले . त्याने ताबडतोब ही  बातमी गोविंरावांपर्यंत पोहोचवली . ‘ आपल्या अन्नातील उरलेल्या अन्नाचा नैवेद्य दत्त महाराजांना ???’  ही  कल्पनाच त्यांना सहन होईना . 

त्यांनी त्वरित  मुदपाकखान्यातील सर्व सेवकांना फर्मान सोडले, उद्यापासून त्या म्हातारीला काहीही देऊ नये. झाले — म्हातारीला दटावून सेवकांनी हाकलून दिले . आपल्याला खायला काही नाही 

यापेक्षा दत्त उपाशी या जाणिवेने म्हातारी कळवळली. इकडे दत्त महाराजांची नित्य पूजा करणाऱ्या पुजारीवर्गाला त्याच रात्री दत्त महाराजांचा दृष्टांत झाला, “ अरे मला उपवास घडतोय ,त्या गोविंदाला जाऊन सांग. “ गोविंदरावांना हा दृष्टांत निरोप मिळाला ,त्यांनी पुजारी आणि सेवक वर्गाला विचारले “ काल नैवेद्य होता ना ? “ ‘ हो ‘ असे उत्तर सर्वांकडून मिळताच ते विचारात पडले . 

दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच दृष्टांत आणि ह्या खेपेस दत्त महाराजांची मुद्रा क्रोधव्याप्त अशी . सकाळ होण्याची वाट न बघता पुजारी रात्रीच धावत वाड्यात आला . घामाने ओलाचिंब आणि अत्यंत घाबरलेला– हा काय प्रकार असावा हे जाणून घेण्यासाठी गावातील सर्वांना  सकाळी गोविंदरावांनी बोलावणे केले, तेव्हा तो म्हातारीच्या नैवेद्याची बातमी देणारा मनुष्य दिसला . तात्काळ काही तरी उमगून गोविंदरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते तडक म्हातारीच्या झोपडीकडे गेले . उपवासाने क्षीण अशा अवस्थेत म्हातारी निजूनचं होती.  तिचे पाय अश्रूंनी  धुवत गोविंदराव म्हणाले “ आजपासून नित्य नैवेद्य दाखवत जा–”.  झोपडीतील जीर्ण दत्त महाराजांच्या तसबिरीत एक बदल मात्र झाला होता. महाराजांच्या चेहेऱ्यावर मोहक हास्य दिसत होते– श्रीगुरुदेव दत्त !!!—

 – अभय आचार्य

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments