डॉ. ज्योती गोडबोले
वाचताना वेचलेले
☆ प्रिय वपु, … लेखक – श्री बिपीन कुलकर्णी ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
वसंत पुरुषोत्तम काळे (व पु काळे)
(25 मार्च 1932 – 26 जून 2001)
प्रिय वपु,
२५ मार्च …. आज तुमचा वाढदिवस. आपल्या समाजात नावाच्या मागे कै. लागले की जयंती म्हणायची पद्धत, पण खरेच तुम्ही गेलात का ? ज्या नियती बद्दल तुम्ही एवढे लिहून ठेवलेत ती नियती अशी का रुसली तुमच्या वर आणि का ? आमच्या पासून केवळ ६८ व्या वर्षी हिरावून घेतले?
६८ हे जाण्याचे वय नक्कीच नाही, पण शेवटी ग.दि.माडगुळकर म्हणून गेले तसेच आहे.. ” पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” …
आज तुम्ही असतात तर आमच्यासारख्या असंख्य चाहत्यांनी, तुमच्या कुटुंबियांनी नक्कीच तुमचे सहस्त्रचंद्र दर्शन केले असते, पण आता या सगळ्या जर तर च्या गोष्टी. तुम्ही कुठे तरी लिहून ठेवले आहे ना ” परिचयाच्या किंवा नात्यातल्या माणसा पेक्षा, ४ तासाच्या प्रवासात भेटलेली व्यक्ती कधी कधी जवळची वाटू लागते” – वपु तुमचे आणि आमचे नाते तरी यापेक्षा काही वेगळे आहे का हो ? आम्हाला जेव्हा हवे असेल तेव्हा तुमचे कुठलेही पुस्तक उघडतो आणि मनसोक्त भेटतो– मग तुम्ही कधी प्रवासात भेटता, कधी घरीच रात्रीच्या वेळी उशिरा भेटता, कधी गाडीत भेटता तर कधी चक्क ऑफिसमध्ये भेटता. तुम्ही जसे आम्हाला भेटता तसे आम्ही पण तुम्हाला प्रत्येक कथेत भेटतोच ना ? तुम्ही प्रत्येक कथा आम्हाला समोर ठेवूनच लिहित होतात ना… तुम्ही तुमचे मन आमच्या जवळ मोकळे केलेत …. आणि आम्ही आमचे !! हिशोब पूर्ण !!!!
नरक म्हणजे काय ? तुम्ही ‘पार्टनर’ मध्ये किती मस्त एका ओळीत लिहून गेलात — ” नको असलेली व्यक्ती न जाणे म्हणजे नरक” – कसे सुचत होते हो इतकी सोपे लिखाण करायला ?
तसे तुम्ही व्यवसायाने वास्तूविशारद , नोकरी केली मुंबई महानगर पालिकेत आणि नाव कमावले साहित्य विश्वात ! तीनही गोष्टींचा एक दुसऱ्याशी अर्थाअर्थी संबंध नाही, पण वपु तुम्हीच हे करू शकत होतात.
कदाचित महानगरपालिकेतील नोकरीमुळे तुमचा संबंध समाजातील वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी आल्यामुळे नकळत कथेला विषय आणि खाद्य मिळत गेले…पण याचा अर्थ असा नव्हे की महानगर- -पालिकेमुळे तुम्ही साहित्यिक झालात… नसता मुंबई पालिकेतील प्रत्येक कर्मचारी कथालेखक झाला असता…. तुम्ही म्हणाला होतात न
“कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, पण गगनभरारीचे वेड रक्तात असावे लागते ” …
तुमच्या प्रत्येक कथेत आदर्श नवरा किंवा बायको डोकावते , आणि संपूर्ण कथा कायम मध्यमवर्गीय घराभोवती फिरत असते ? काय बरे कारण असावे > —
कदाचित तुम्ही जसे वाढलात त्या वातावरणाचा परिणाम असेल , आणि तुम्हाला सांगतो वपु, त्यामुळेच तुमच्या कथा आमच्या मनाला जास्त भिडल्या. आता हेच बघा न –
“किती दमता तुम्ही ?” या एका वाक्याची भूक प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला असते”…. या वाक्याचे महत्व कळण्याकरिता तुमच्या कथा वाचाव्या लागल्या?
तुम्ही अजून एक कलाकृती करून ठेवलीत , जे पुस्तक तुम्ही वडिलांवर लिहिलेत. त्याला खरेच तोड नाही. ” व पु सांगे वडिलांची कीर्ती “…। याला कारण प्रत्येकालाच वडिलांबद्दल भावना असतात, पण किती लोक समर्थपणे त्या जाहीर करतात ? तसेच साहित्य विश्वात वडील या विषयावर लिहिलेली पुस्तके अभावानेच आढळतात…. केवळ त्या एका गोष्टीमुळे पुस्तकाचे महत्व वाढत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वडील ही एक हळवी किनार असते … असंख्य आठवणी आणि भावना असतात. पण त्या तुम्ही कशा मांडता हे फार महत्वाचे…. तुम्ही तर लेखकच– पण त्याहून जास्त महत्वाचे ते एका लेखकाने एका चित्रकाराचे लिहिलेले चरित्र…
आपल्या सौ. चे ब्रेन ट्युमरचे आजारपण आणि त्याचा दुखद: शेवट , दिवस रात्र मृत्यूची टांगती तलवार….बायको ही सखी असते असे सांगत तुम्ही आम्हाला नवरा बायको या नात्याची PHILOSOPHY शिकाविलीत…. त्याच नात्याकरिता नियती इतकी निष्ठुरपणे का वागली तुमच्याशी ? कदाचित या अनुभवातून आयुष्याचं सार तुम्ही इतक्या सहज पणे सांगून गेलात – ” प्रोब्लेम कोणाला नसतात ? ते सोडवायला कधी वेळ, कधी पैसा तर कधी माणसे लागतात “
अंत्ययात्रेला जाऊन आल्यानंतर अथवा स्मशानातून परत आल्यावर थकवा येण्याचे कारण काय, किंवा मन सैरभैर का होते याचे उत्तर तुम्ही सहज देवून गेलात – “रडणाऱ्या माणसापेक्षा सांत्वन करणाऱ्यावर जास्त ताण पडतो ” – किती अचूक लिहून गेलात हो तुम्ही !
तुमचे लेखन जसे गाजले तसेच तुमचे कथाकथन गाजले. कथाकथनाने अख्या महाराष्ट्राला वेड लावले.
तुम्ही कथाकथन थेट साता समुद्रापार नेलेत …लंडन, अमेरिका , कॅनडा ला कार्यक्रम झाले …अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले — कर्तुत्व तुमचे पण मान आमची उंचावली !
महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळाले…तुमचे असंख्य चाहते धन्य झाले.
वपु तुमच्या दृष्टीकोनाला खरंच दंडवत ! आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन खरोखरच खूप काही शिकवणारा आहे…. पत्र हे संवादाचे सगळ्यात प्रभावी माध्यम … आणि मुख्य म्हणजे पत्र हे असे माध्यम की ज्यात फक्त दोन लोक संवाद साधतात…. तुम्ही म्हणून गेलाच आहात न की — ” संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात !”—–
— म्हणून हा पत्र प्रपंच ! तुम्ही आमच्यापासून खूप दूर गेलात, पण जिथे असाल तिथे नक्कीच सुखी असाल …तुमची कथा ऐकायला आता साक्षात पु ल , प्र के अत्रे , पु भा भावे, बाळासाहेब ठाकरे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, यासारखी दिग्गज मंडळी प्रेक्षक म्हणून असतील आणि तुम्ही म्हणत असाल —
—आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचंही तसंच आहे .
लेखक – श्री बिपीन कुलकर्णी
संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈