वाचताना वेचलेले
☆ “नाव नसलेले भांडे….” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
पूर्वी घराघरात एक पद्धत अस्तित्वात होती. ती पद्धत म्हणजे दुकानातून घरात वापरायची कोणतीही भांडी आणली की ती दुकानातून आणतांना त्यावर नावे घालून आणायची. भांडे लहान वा मोठे प्रश्नच नसे, त्यावर नांव हे असलेच पाहिजे. समजा बायको सोबत नसतांना नवरा एकटा दुकानात गेला व गरजेचे भांडे घेतले व घरी आला की गृहिणी भांडे नंतर पहायची. आधी त्यावर नांव काय घातले आहे की नाही ते पहात असे. त्या भांड्यावर तिला तिचे नांव दिसले की देव भेटल्याचा आनंद मिळत असे. नांव जर दिसले नाही तर मात्र काही खरे नसे, ती आल्या पावली नवऱ्याला परत दुकानात पाठवून त्यावर नांव घालून आणा असे सांगत असे किंवा स्वत: जाऊन नांव घालून आणून मगच ते वापरायला सुरवात करीत असे. आजही तुमच्या घरात नांव घातलेली खूप भांडी असतील पहा.
लग्नकार्यात वा अन्य प्रसंगी आलेली भांडी पहा, त्यात वर्गवारी होत असे, नांव घातलेली व नांव न घातलेली भांडी वेगळी केली जात असत. नांव असलेली भांडी वापरात घेतली जायची व नांव नसलेली भांडी प्रसंगा प्रसंगाने देण्या घेण्यासाठी वापरली जात असत. अशी ही नांव नसलेली भांडी या हातातून त्या हातात, या घरातून त्या घरात नुसती फिरत रहायची, उपयोग काहीच नाही.
असो हे सारे आले कशावरुन तर नांवावरुन. आता ती भांडी जरा घडीभर बाजूला ठेवा व विचार करा. आपला देह हे एक पंचमहाभूतांनी बनलेले भांडेच आहे. ते जन्माला येते तेव्हा त्यावर काही नांव नव्हते. ते असेच फिरत फिरत आपल्या घरात आले, मग त्या देहाला नांव दिले जाते ते मरेपर्यंत रहाते. पण देह संपला- नांव संपले – व बिना नावाचा आत्मा पुन्हा योनी योनीतून फ़िरायला जातो.
आता ही पळापळ थांबायला उपाय काय सांगितला आहे..? आपल्या संत, सत्पुरुष, गुरु, सद्गुरु, समर्थांनी सांगितले आहे की, ‘ जमेल तेव्हा जमेल तसे जमेल तितके देवाचे नाव घे. म्हणजे काय होईल ? देह पडला तरी देवाचे नाव तुझ्यासोबत येईल. ते नांव देवाने पाहिले की देव म्हणेल याच्यावर माझे नाव आहे, याला माझ्या घरात पाठवा. ज्या भांड्यांवर माझे नांव नसेल त्यांना पाठवून द्या या घरातून त्या घरात – म्हणजे या योनीतून त्या योनीत फ़िरायला.’
आपले काय होते माहिती आहे का ? आपण म्हणतो जमेल तसे, जमेल तेव्हा, जमेल तिथे नांव घे, नाम घे असे सांगितले आहे. झाले– आपण पळवाट शोधण्यात पटाईत. आपण म्हणतो जमेल तसे ना ! अहो नाही जमले त्याला आम्ही काय करणार. मग देव म्हणतो– हरकत नाही मग रहा फिरत निवांत घरोघरी, या योनीतून त्या योनीत…..
नाम घे असे देव कधीच सांगत नाही, तो म्हणतो हे सांगायचे काम मी माझ्या प्रतिनिधींना म्हणजे संत, सत्पुरुष, गुरु, सद़्गुरु, समर्थ यांना दिले आहे व ते काम ही मंडळी चोख करतात. माझे काम फ़क्त भांडे माझ्याकडे आले की त्यावर नांव आहे का ते पहायचे. नांव असेल तर माझ्यापाशी ठेवायचे व नांव नसेल तर पुढील प्रवासाला पाठवणे.
बघा – वाचा – व विचार करा.
लेखक – अज्ञात
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈