? वाचताना वेचलेले ?

मला आवडलेली बोधकथा… भाग -2 ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

(आणि मला विचारून एका पाकिटावर माझे नाव टाकले, आणि दुसऱ्यावर माझ्या पत्नीचे. माझ्या हातात ते सुपूर्द करून औषधी घेण्याची विधी आपण समजावलीत.” )

इथून पुढे —

“मी ताबडतोब ती औषधी घेतली. कारण त्याच्यामागे फक्त आपल्याला काही पैसे देणे हा उद्देश होता. परंतु आपण पैसे घेण्याला नकार दिला. ‘बस, ठीक आहे’ म्हणालात. जेव्हा मी आग्रह केला तेव्हा आपण म्हणालात की ‘ आजचे खाते बंद झाले आहे.’  मला काहीच समजले नाही. परंतू  या दरम्यान आपल्याकडे एक व्यक्ती आला. त्याने आपली चर्चा ऐकून मला सांगितले की, “ आजचे खाते बंद झाले म्हणजे वैद्य महाराजांना आजच्या दिवसाची घरेलू खर्चासाठी लागणारी राशी, जी त्यांनी भगवंताला मागितली होती, तेवढी भगवंताने त्यांना रोग्यांमार्फत दिली आहे. त्याशिवाय ते अधिक पैसे कुणाकडूनही घेत नाही. “ 

मी काहीसा परेशान झालो कारण मी माझ्या मनानेच लज्जित झालो. माझे विचार किती निम्न होते आणि हा सरलचित्त वैद्य किती महान आहे. मी जेव्हा घरी जाऊन पत्नीला औषधि दाखवली आणि सारा प्रसंग तिच्यासमोर उभा केला तेव्हा तिला भगवतदर्शनाचा आनंद झाला, तिच्या डोळ्यातून पाणी आले, मन भरून आले, आणि ती म्हणाली “ ते वैद्य म्हणजे कुणी व्यक्ती-माणूस नसून माझ्यासाठी तो देवतारूप माध्यम बनून आला आहे. आजवर एवढी सारी औषधी घेतली, एवढे वैद्य, हकीम, डॉक्टर झाले, आज मला माझ्या मनीची इच्छा पूर्ण करणारा भगवंत या वैद्याच्या रूपाने, या औषधी स्वरूपाने भेटला आहे. हे औषध माझ्या संततीसुखाचे कारण आहे, आपण दोघेही श्रद्धेने हे औषध घेऊ यात. “

कृष्णलाल वैद्याला पुढे सांगू लागला, “ आज माझ्या घरी दोन फूले उमलली आहेत. आम्ही दोघे पति-पत्नी हरघडीला आपल्यासाठी प्रार्थना करत असतो. इतक्या वर्षात व्यवसायामुळे मला वेळच मिळत नव्हता की  स्वतः येऊन आपल्याला धन्यवादाचे  दोन शब्द बोलावे म्हणून. इतक्या वर्षांनी आज भारतात आलो आहे आणि कार केवळ आणि मुद्दाम इथेच थांबवली आहे.” 

“ वैद्यजी आमचा सारा परिवार इंग्लंडमध्ये सेटल झाला आहे. केवळ माझी एक विधवा बहीण आणि तिची मुलगी इथे भारतात असते. आमच्या त्या भाच्चीचे लग्न या महिन्याच्या २१ तारखेला होणार आहे. का कोण जाणे जेव्हा-जेव्हा मी आपल्या भाच्चीसाठी काही सामान खरेदी केले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आपली ती छोटीशी मुलगी यायची, आणि मग प्रत्येक सामान मी डबल खरेदी करायचो. मी आपल्या विचारांना, तत्वाला, मूल्यांना जाणत होतो, की संभवतः आपण हे सामान न घेवोत, परंतू असे वाटत होते की माझ्या सख्ख्या भाच्चीच्याबरोबर मला नेहमी जो चेहरा दिसत आहे, ती पण माझी भाच्चीच तर आहे. माझे तिच्याशी एक नाते त्या भगवंताने असे जोडले आहे, आणि म्हणून आपण त्या नात्याला नकार देणार नाही, कारण माझ्या भाच्चीबरोबर या भाच्चीचा ‘भात भरण्याची’ माझी ज़िम्मेदारी त्याने मला दिली आहे.”

वैद्याचे डोळे आश्चर्याने उघडेच्या उघडेच राहिले आणि सौम्य आवाजात म्हणाले, ” कृष्णलालजी, आपण जे काही म्हणत आहात ते मला काहीच समजेनासे झाले आहे, ईश्वराची काय माया आहे हे त्याचे तोच जाणे. आपण माझ्या ‘श्रीमती’च्या हाताने लिहिलेली ही चिठ्ठीबघा ” असे म्हणून वैद्यांनी ती चिठ्ठी कृष्णलालजींना दिली. —– तिथे उपस्थित सारे ती चिठ्ठी बघून हैराण झाले, कारण ” लग्नाचे सामान” याच्यासमोर लिहिले होते ”हे काम परमेश्वराचे आहे, त्याचे तोच जाणे “

कंपित आवाजात वैद्य म्हणतात, ” कृष्णलालजी, विश्वास करा की, आजपावेतो कधीही असे झाले नाही की  पत्नीने चिठ्ठीवर आवश्यकता लिहिली आहे आणि भगवंताने त्याची व्यवस्था केली नाही. आपण सांगितलेली  संपूर्ण हकीकत ऐकून असे वाटते की भगवंताला माहित होते की, कोणत्या दिवशी माझी श्रीमती काय लिहिणार आहे. अन्यथा आपल्याकडून इतक्या दिवस आधीपासून या सामान खरेदीचा आरंभ परमात्म्याने कसा करवून घेतला असता?–वाह रे भगवंता, तू महान आहेस, तू दयावान आहेस. मी खरंच हैराण आहे की, तो कसे आपले रंग दाखवतो आहे.”

चातकाची तहान किती | तृप्ति करूनि निववी क्षिती ||१||

धेनु वत्सातें वोरसे | घरीं दुभतें पुरवी जैसें ||२||

पक्कान्न सेवुं नेणती बाळें | माता मुखीं घालीं बळें ||३||

एका जनार्दनीं बोले | एकपण माझें नेलें ||४||

वैद्यजी पुढे म्हणतात, ” जेव्हापासून मला समजू लागले, केवळ एकच पाठ मी वाचला आहे. सकाळी उठून तुझी भक्ती करण्यासाठी मी अजून जिवंत आहे, म्हणून त्या परमात्म्याचे आभार मानायचे, संध्याकाळी आजचा दिवस चांगला गेला म्हणून त्याचे आभार मानायचे, खाताना, झोपताना, श्वास घेताना, असा हरघडीला त्याचे स्मरण करायचे, त्याचे आभार मानायचे. 

दळिता कांडिता | तुज गाईन अनंता ||१||

न विसंबे क्षणभरी | तुझे नाम गा मुरारी ||२||

नित्य हाचि कारभार | मुखी हरि निरंतर ||३|| 

मायबाप बंधुबहिणी | तू बा सखा चक्रपाणि ||४|| 

*लक्ष लागले चरणासी | म्हणे नामयाची दासी |५||

— समाप्त —

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments